कल्याण स्टेशनजवळील बाजारपेठेतील ज्वेलर्समध्ये बुरखाधारी महिलेची दहशत; खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून हातचलाखी दाखवत अंगठी केली लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण रेल्वे स्थानक आणि एसीपी कार्यालयाच्या काही पावलांवर असलेल्या ज्वेलर्स दुकानात एका बुरखाधारी महिलेने बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने दागिने पाहताना तिने हातचलाखी करत खोटी अंगठी ठेवत 60 हजारांची खरी सोन्याची अंगठी लंपास केली असून, तिच्या हातचलाखी ने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे ही महिला सीसीटीव्हीत कैद झाली असून, गुन्हा दाखल होऊनही आठवड्यानंतरही ती अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसून ही महिला इतर दुकानांमध्येही फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. यामुळे कल्याण बाजारपेठेतील ज्वेलर्समध्ये भीतीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई करून या महिलेला अटक करावी, अशी मागणी केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील एसीपी कार्यालयाच्या बाजूला लागून असलेल्या संघवी ज्वेलर्समध्ये एका बुरखाधारी महिलेने चोरट्या पद्धतीने 60 हजारांची सोन्याची अंगठी लंपास केली आहे. या महिलेने खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला आणि कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवले. दागिने पाहताना तिने हातचलाखी करत खोटी अंगठी ठेवली आणि खरी सोन्याची अंगठी घेऊन पसार झाली.
या घटनेचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेबरोबर एक लहान मुलगीही असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. गंभीर बाब म्हणजे या ज्वेलर्स दुकानापासून अगदी काही पावलांवर एसीपी कार्यालय आहे. तरीही पोलिसांना अद्याप आरोपी महिला सापडलेली नाही. दरम्यान, ही महिला इतर दुकानांमध्येही गेल्याचे फुटेज समोर आले असून, अन्य दुकानदार सतर्क झाले आहेत. सध्या या घटनेमुळे कल्याण बाजारपेठेतील ज्वेलर्समध्ये भीतीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई करून या महिलेला अटक करावी, अशी मागणी केली आहे.