श्रेयसने निर्जीव दगडांना केले "जिवंत", तेंडोलीतील युवा चित्रकाराच्या कलेचा नेत्रसुखद चमत्कार
प्रत्येक कलाकाराला नेहमीच नाविन्याचा ध्यास असतो. तो सतत प्रत्येक गोष्टींमध्ये वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या नजरेला जे दिसत नाही ते कलाकाराला दिसते, असे म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. अगदी निर्जीव गोष्टीलाही जिवंतपणा आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. असाच एक युवा चित्रकार श्रेयस सर्वेकर याने आपल्या कलेतून निर्जीव दगडांना अक्षरशः जिवंत केले आहे. कुडाळ तालुक्यातील तेंडोली खरावतेवाडी येथील श्रेयश मेघ:श्याम सर्वेकर या युवा कलाकाराने आपली कला निसर्गातील निर्जीव दगडांवर साकारली आहे. दगडांमध्ये त्याने प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहूब चित्रे रेखाटली आहेत.
श्रेयसने तेंडोली तळेवाडी येथील ओम गजानन आमराई येथे कोरोना काळापासून या सुबक कलाकृती रेखाटल्या आहेत. श्रेयसने दगडांवर रेखाटलेली ही प्राण्यांची चित्रे बोलकी आहेत. त्या चित्रांमध्ये जिवंतपणा दिसतो. हत्ती, वाघ, सिंह, हरीण, गवारेडा, सांबर, ससा, खार, कुत्रा, सरडा, अजगर अशी अनेक प्राण्यांची चित्रे त्याने हुबेहूब रेखाटले आहेत. त्यामुळे तेंडोली पंचक्रोशीत येणाऱ्या पर्यटकांना श्रेयसने काढलेल्या प्राण्यांच्या चित्रांसोबत कुतूहल वाटणे आणि त्यांना चित्रांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही.