लोकसंदेश न्यूज नेटवर्क
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेत तीन मोठे बदल, शेवटपर्यंत साथ देणाऱ्या 'मावळ्यांच्या' निष्ठेचं सोनं झालं...
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पडझड झालेला शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी बाहेर पडले होते. त्यामुळे संबंधित नेत्यांची पदे रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळाले आहे. तर शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांच्या मुलावर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष कोणाचा, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. निवडणूक आयोगानेही तत्परतेने हालचाली करत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पक्षात कशाप्रकारे उभी फूट पडली आहे, हे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असणे आवश्यक आहे. त्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या नेत्यांना आपल्या बाजुला वळवून उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची मानसिकता बदलण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता.
हा धोका वेळीच ओळखून आता उद्धव ठाकरे यांच्याकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पराग लीलाधर डाके यांची शिवसेनेच्या सचिवपदी वर्णी लागल्याची चर्चा आहे. तर विधानसभेत आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरणाऱ्या भास्कर जाधव आणि संसदेत शिवसेनेचा किल्ला लढवणाऱ्या अरविंद सावंत यांना नेतेपद देऊन दोघांचेही प्रमोशन करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात २९ ऑगस्टला फैसला
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणामुळे अनेक कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. या सगळ्याचा गुंता सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी या घटनापीठासमोर पहिली सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावेळी हे घटनापीठ कोणता अंतरिम निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई