SANGLI : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्या सन्मानाची संधी हे माझे भाग्य - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्या सन्मानाची संधी हे माझे भाग्य - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्या सन्मानाची संधी हे माझे भाग्य
- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी




ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते सन्मान

सांगली दि. : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. सांगलीतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने (वय 99) यांच्या घरी जावून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी माधवराव माने यांची प्रेमाने आणि आदराने गळाभेट घेत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपण दिलेले योगदान अतुलनीय आहे. या योगदानाबद्दल आपला सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आपली भेट घेण्याची संधी मला मिळाली हे माझे सौभाग्य आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.


जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांची त्यांच्याघरी भेट घेऊन शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देवून सन्मान केला. यावेळी श्री. माने यांचे कुटुंबिय मुलगा अनिल माने, सून भारती माने, कन्या सुनंदा जाधव व संगीता पाटील, जावई प्रा. एकनाथ जाधव व विश्वासराव पाटील, पुतण्या श्रीकांत जाधव, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे सन्मती गौंडाजे, नगरसेवक कल्पनाताई कोळेकर, राजू कुंभार व गजानन मगदूम, अप्पर तहसिलदार डॉ. आर्चना पाटील, अनिल शिंदे, बळीराम पवार आदि मान्यवर उपस्थित होते.



यावेळी माधवराव माने यांनी स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देताना महात्मा गांधींनी ब्रिटीशांना चलेजावचा नारा दिल्यानंतर ग्रामीण भागांमध्ये तीव्र झालेली स्वातंत्र्य चळवळ, तासगाव मोर्चा, वडूजचा संग्राम, क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नेतृत्व आणि प्रतिसरकारची कामगिरी, लुटमाऱ्या करून जनतेला हैराण करणाऱ्या दरोडेखोरांचा केलेला बंदोबस्त या बद्दलच्या जाज्वल्य स्मृतिंना उजाळा दिला. यावेळी त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती सप्ताहात त्यांच्या सच्चा सैनिकाचा प्रशासनाच्या वतीने सत्कार होत आहे याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन दिले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली