MUMBAI जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना शिष्यवृत्ती देणार - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना शिष्यवृत्ती देणार - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार



MUMBAI 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या
७५ मुलांना शिष्यवृत्ती देणार- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


  मुंबई, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानमार्फत जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी येत्या तीन वर्षात शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कांदळवन क्षेत्रात ७ हजार ५०० नवीन रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


            महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची पाचवी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जैवविविधता विषयातील या ७५ विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचा उपयोग महाराष्ट्रासाठी करणे गरजेचे असेल. प्रत्येक वर्षी साधारण २५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असून तीन वर्ष हा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी प्रत्येक वर्षी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.




कांदळवन संरक्षणासाठी देशभरातील सर्वोत्तम पद्धतीचा अभ्यास करण्यात येणार


            कांदळवन संरक्षणासाठी देशभरातील सर्वोत्तम पद्धतीचा अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानने यासाठीचा आवश्यक अभ्यास करून त्याचा अहवाल महिन्याभरात वनविभागाला सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले.

शाळेपासून कांदळवनाचे महत्व पटवून देण्यात येणार

            जैव विविधता आणि कांदळवनाचे महत्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांना होणे गरजेचे असल्याने यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक असून महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानने याबाबत योग्य ती कार्यवाही सुरू करावी. याशिवाय कांदळवन म्हणजे नेमके काय, याची जपणूक कशी करावी, कांदळवन संवर्धनासाठी काय करण्यात येत आहेत याची माहिती देणारे लेख वेळोवेळी वृत्तपत्र आणि मासिकांमधून प्रसिद्धीला देण्यात यावेत.याशिवाय या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात यावा अशा सूचना दिल्या.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सागरी जीव बचाव वाहन लवकरच दाखल होणार

            राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सागरी जीव बचाव वाहने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यापैकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सागरी जीव बचाव वाहन लवकरच दाखल होणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी सागरी जीव बचाव वाहन खरेदी करण्यात आले आहे. सध्या हे वाहन बचाव वाहनात परिवर्तित करण्याचे काम सुरू असून ही सर्व वाहने अत्याधुनिक, सुसज्ज आणि गतिमान असणार आहेत.

कांदळवन क्षेत्रांत असणार सीसीटीव्हीची नजर

            वन मंत्री म्हणाले की,कांदळवन क्षेत्रांत सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. भिवंडी परिक्षेत्र, पश्चिम व मध्य मुंबई, नवी मुंबई व ठाणे खाडी, फ्लेमिंगो अभयारण्य परिक्षेत्र येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. साधारणपणे १०६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येतील.

            महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतरित मार्गाचा अभ्यास करणे, ठाणे खाडी येथे फ्लेमिंगो अभयारण्य उभारणे, ऐरोली येथे गस्तीसाठी सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक बोट, कांदळवन संरक्षण आणि संवर्धन यासाठी सुरक्षारक्षक यांची नेमणूक, आवश्यक तेथे कांदळवन यांची जपणूक करण्यासाठी भिंत घालणे असे विषय प्राधान्याने मार्गी लावण्यात यावे, अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

            या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल.पी. राव, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. क्षे. ही. पाटील. मत्स्यविकास आयुक्त अतुल पाटणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, पर्यावरण संचालक नरेंद्र टोके, डेप्युटी कमांडंट कोस्टगार्ड आशुतोष आदी उपस्थित होते

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई