लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
ऊस वाहतुकीसाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या
पशुधनाचे लसीकरण अनिवार्य- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 27, : 15 ऑक्टोंबर 2022 पासून या वर्षीचा गाळप हंगाम चालू होणार असल्याने ऊस तोड मजुरांबरोबर मोठ्याप्रमाणावर जिल्ह्याबाहेरील पशुधन आपल्या जिल्ह्यात येते. अशा परजिल्ह्यातून येणाऱ्या पशूधानाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यात 85 टक्के लसीकरण झाल्याने लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे. परजिल्ह्यातून लसीकरण न झालेले पशुधन जिल्ह्यात आल्यास त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दरदुष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा परिषदचे पशुवैद्यकीय अधिकारी किरण पराग, साखर उपसंचालक एस. एन. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी संपुर्ण जिल्हा नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून जनावरांचे बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांच्या जत्रा भरविणे, प्रदर्शन आयोजित करणे तसेच पशुधनाची वाहतुक या सारख्या बाबींवर बंदी घालण्यात आली आहे. साखर कारखान्यांनी कोणत्या जिल्ह्यातून त्यांच्याकडे ऊस वाहतुकीसाठी येणाऱ्या पशुधनाच्या अनुषंगाने त्यांच्याकडील याद्या पशुसंवर्धन विभागाला द्याव्यात संबधित पशुसंवर्धन विभागाने संबधित जिल्ह्यांना कळवून त्यांच्या लसीकरणाबाबतची माहिती घ्यावी. पशुधन साखर कारखान्यांच्या ठिकाणी आल्यानंतर देखील या साथरोग प्रादुर्भावाचा विचार करता
कारखान्यांच्यास्तरावर आवश्यक ती खबरदारी घ्यावी. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा. कोणतीही अडचण आल्यास जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे सांगून साथ रोग प्रादुर्भाव रोखणे व नियंत्रण यासाठी सर्व कारखान्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी एकाद्या जनावर बाधित झाल्यास त्वरित उपचार होणे आवश्यक आहे. योग्य वेळेत केलेल्या योगय उपचारांनी लम्पी चर्मरोग बरा होतो. असे सांगून साखर कारखान्यांवरील पशूधनासाठी शासकीय व्हेटरनरी डॉक्टर्स सातत्याने संपर्क ठेवणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत....
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ,सांगली
www.nisargbhumi.com