SANGLI: जिल्ह्यातील उद्योजकांच्या निर्यात वाढीसाठी कृती आराखडा तयार करा -जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: जिल्ह्यातील उद्योजकांच्या निर्यात वाढीसाठी कृती आराखडा तयार करा -जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीSANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील उद्योजकांच्या निर्यात वाढीसाठी कृती आराखडा तयार करा -जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली जिल्ह्यात बरेच लहान, मोठे उद्योग बऱ्याच वर्षापासून सुरू असून यामधून वेगवेगळी उत्पादने होत आहेत. या उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असून ही कार्यशाळा आपल्या सर्वांना दिशा देईल. जिल्ह्यातील उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी सर्व उद्योजकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यातील उद्योगांच्या उत्पादनाच्या निर्यात वाढीसाठी जलद कृती आराखडा तयार करून जिल्ह्यातून उत्पादनांची जास्तीत जास्त निर्यात करण्यावर भर देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दिली.निर्यात प्रचालनाला गती मिळण्यासाठी निर्यात विषयक कार्यशाळा जिल्हा उद्योग केंद्र सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग सहसंचालक पुणे एस. एस. सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, व्यवस्थापक एम आर मेडीदार व टी एन खांडेकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी निर्यातदार उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळासह अन्य आवश्यक बाबी पुरविण्यासाठी उद्योगांच्या गरजेनुसार जलद कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. सन 2021-22 मध्ये सांगली जिल्ह्यातून 3 हजार 705 कोटी रूपयांची निर्यात झाली आहे. जिल्ह्यात जवळपास 101 मोठे उद्योग तर 43 हजार लघु उद्योग आहेत. यामधून जवळपास 3 लाखापर्यंत रोजगार मिळाले आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे. गेल्या दोन वर्षात कोविडचा उद्योगांवर परिणाम झाला. निर्यात वाढविण्यासाठी उद्योगांना काही अडचणी असतील तर त्या त्यांनी मांडाव्यात. जिल्हा प्रशासन स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी, आवश्यक मदतीसाठी प्रयत्नशील राहील.


काही धोरणात्मक बदल करणे आवश्यक असल्यास शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. उद्योजकांनी त्यांच्या अडचणींबरोबरच त्या सोडविण्यासाठी काही सूचना असल्यास त्याही सांगाव्यात. अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उद्दिष्टे ठेवून पुढे जावूया. जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून विविध प्रशिक्षण संस्थाव्दारे प्रशिक्षण दिले जात आहे. उद्योजकांनी त्यांच्याकडील स्कील गॅप भरून काढण्यासाठी आवश्यक ट्रेड सुचवाव्यात. त्यानुसार कौशल्य विकास विभागाकडील प्रशिक्षण संस्थाव्दारे आवश्यकतेनुसार ट्रेडबाबतचे प्रशिक्षण देवून स्कील्ड मनुष्यबळ उपलब्ध करता येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध उद्योजकांकडील उत्पादनांची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.


उद्योग सहसंचालक एस. एस. सुरवसे यांनी निर्यातीला चालना देण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील उद्योगांचा आढावा घेऊन शासन स्तरावर उद्योगांसाठी राबवण्यात येणारे योजना, क्लस्टर याबाबत माहिती दिली.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू विशद केला.


या कार्यशाळेत उद्योजकांसाठी विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कृषी उत्पादन निर्यात संबंधी जिल्हा उद्योग जिल्हा कृषी अधिकारी श्री. नागरगोजे, निर्यात सवलत योजनेसंबंधी केशव ताम्हनकर, डिजिटल मार्केटिंग विषयी यशांक गोकाणे, निर्यात वृद्धीसाठी केंद्रीय योजनांची माहिती ईईपीसी च्या नितू सिंग यांनी दिली. यावेळी 20 निर्यातदार उद्योजकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. उद्योजक संजय अराणके यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या.

या कार्यक्रमास सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय खांबे, उपाध्यक्ष विनोद पाटील, कृष्णा व्हॅली चेंबरचे विजय चिपलकट्टी, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे रंगराव इरळे यांच्यासह के.एस.भंडारे अतुल पाटील, धनंजय नवांगुळ, योगेश राजहस, हर्षल बाफना, मनोज झंवर यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. खांडेकर यांनी मानले तर सूत्रसंचालन गणेश निकम यांनी केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.

__________________________________________________________ 

या बातमीचे प्रायोजक आहेत.. संपूर्ण भारतात कार स्पेअर पार्टस सप्लाय करणारी कंपनी... महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, सांगली.

             www.caroldpat.com
 


__________________________________________________________