SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
बालगृहातील मुलांचे पालन, पोषण, संगोपन व पुनर्वसन स्वत:च्या मुलांप्रमाणे करा...
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली येथील बालगृहांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली भेट
सांगली दि. 8 : महिला व बाल विकास विभागाच्या सांगली येथील वेलणकर बालगृह, भारतीय समाज सेवा केंद्राचे शिशुगृह, दादू काका भिडे मुलांचे निरीक्षण व बालगृह या संस्थाना तसेच बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती यांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भेट देवून मुलांचे संगोपन, शिक्षण व पुनर्वसनाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी बालगृहातील मुलांचे पालन, पोषण, संगोपन व पुनर्वसन हे आपल्या स्वत:च्या मुलांप्रमाणे करण्यात यावे, असे निर्देश दिले.
यावेळी जिल्हास्तरीय त्रैमासिक तपासणी समितीच्या सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष निवेदिता ढाकणे, जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य विभागाच्या डॉ. वैशाली पाटील, बाल न्याय मंडळाच्या प्रतिनिधी डॉ. जयश्री श्रेणीक पाटील, अशासकीय सदस्या उर्मिला पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, बालगृहातील मुलांच्या कौशल्य विकासासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागाची मदत घेण्यात यावी. सर्व बालकांचे आधार कार्ड, बँक अकाँउंट, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड काढण्यात यावे. जिल्ह्यातील देणगीदारांमार्फत प्रत्येक मुलांचा जीवन विमा उतरविण्यात यावा. मुलांची नियमित आरोग्य तपासणी करावी. बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळांनी मुलांच्या विकास व पुनर्वसनाकरीता आपल्या पदाचा योग्य तो वापर करावा. जिल्ह्यातील अनाथ, निराधार, निराश्रीत बालक योजनांपासून वंचित राहू नये याबाबतची दक्षता घेण्यात यावी, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बालगृहांची सखोल तपासणी करून बालगृहांनी मुलांचे सर्व दस्तावेज डिजीटल स्वरूपात जतन करून ठेवण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच बालगृहातील मुलांशी संवाद साधून त्यांची प्रेमाने विचारपूस केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली