सहकारतपस्वी गुलाबराव पाटील: सहकार क्षेत्रातले थोर विचारवंत, उत्कृष्ट संसदपटू गुलाबराव पाटील यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सहकारतपस्वी गुलाबराव पाटील: सहकार क्षेत्रातले थोर विचारवंत, उत्कृष्ट संसदपटू गुलाबराव पाटील यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे.

           सहकारतपस्वी गुलाबराव पाटील

सहकार क्षेत्रातले थोर विचारवंत, उत्कृष्ट संसदपटू गुलाबराव पाटील यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटकातल्या बेनाडी या छोट्या गावात गुलाबराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे घर हे वारकरी संप्रदायातले. या वातावरणाचा त्यांच्यावर चांगला संस्कार झाला. उच्च शिक्षणासाठी ते राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानात आले. तिथे त्यांची सामाजिक कामाची जडणघडणही झाली.
 महाविद्यालयीन जीवनातच समाजाला परिवर्तन देणारी प्रबोधनाची शिदोरी त्यांनी आत्मसात केली. शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. कोल्हापुरात त्यांनी वकिलीची पदवी घेतली. पुढे ते साताऱ्याला वकिली करण्यासाठी गेले. वकिलाच्या अंगी लागणारी तडफ, उत्तम भाषा, तत्परता आणि बुद्धिमत्ता त्यांच्या ठायी होती. त्यामुळे ते अल्पावधीतच नावारूपास आले. या काळात ते यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई आणि वसंतदादा पाटील यांच्या संपर्कात आले. त्यांच्या सामाजिक कामात ते मदत करू लागले. पुढे त्यांच्याच विनंतीवरून ते वकिली सोडून सांगलीला आले. तिथे त्यांनी सामाजिक जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. काही कालावधी उलटल्यानंतर त्यांची सांगलीचे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. आपल्या उत्कृष्ट कामातून त्यांनी पारदर्शी कारभाराचे दर्शन सांगलीकरांना घडवले. शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना त्यांनी तयार केली. एक कुशल आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांनी तिथे काम केले.


गुलाबरावांच्या कामाचा आवाका फार मोठा होता. अवघ्या दोन वर्षातच त्यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. चौदा वर्षे ते या बँकेचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेळी - मेंढी पालन, कुक्कुटपालन यासाठी त्यांनी गरजूंना आर्थिक मदत केली. द्राक्ष बागांसाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला. सहकारातील त्यांच्या कामाची व्याप्ती वाढतच चालली होती, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सहकारी बँकांना एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. राज्यभर अनेक प्रयोग राबवले. सहकारातून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात समृध्दी येऊ शकते, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून उभ्या महाराष्ट्राला दिला. त्यांच्या या कामामुळे सहकाराला बळकटी मिळाली. या चळवळीत राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी यशस्वीरित्या काम करून दाखवले. सहकार क्षेत्रातले एक अभ्यासू विचारवंत म्हणून केलेल्या कार्याचा अनुभव विचारात घेऊनच त्यांची महाराष्ट्र राज्य बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड त्यांनी सार्थ करून दाखवली.

राज्यसभेवर खासदार म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. त्यांनी सभागृहात कृषी विषयक धोरणांवर बोलताना आपली मते ठामपणे मांडली. व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची लुटमार होते, त्यासाठी शेतीमालाचे भाव बांधून दिले पाहिजेत, यासाठी आग्रह धरला. ॲग्रिकल्चर प्राईस कमिशन नियुक्त करताना त्यावर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेच पाहिजेत हे सरकारला ठासून सांगितले. देशातल्या सध्याच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुलाबरावांच्या या भूमिकेची आठवण आल्यावाचून राहत नाही. राज्यातील विकास योजनांसाठी मंजुरी मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. राज्यसभेतील एक अभ्यासू खासदार अशी त्यांची प्रतिमा होती. त्याकाळी ब्रिटिश सरकारच्या कॉमनवेल्थ संबंधित विभागाने ब्रिटनच्या संसदीय कामकाज पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ बोलावले होते. त्यात गुलाबरावांचा समावेश होता.

गुलाबरावांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले. अत्यंत शिस्तबद्ध सैनिक या नात्याने त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पक्ष बांधणीचे कार्य हाती घेतले. आपल्या पक्षाची भूमिका समजावून सांगण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर तळागाळात जाऊन दौरे केले. प्रचार दौरा असो की, पक्ष बांधणीच्या बैठका असोत, त्यांची भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण असत. त्यांच्या कामाचा झंझावात आणि भाषणांचा घणाघात लोकांच्या मनावर परिणाम करून जायचा. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून ते कुठलेही काम मनापासून करायचे. दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. आपल्या कामातून त्यांनी त्यांचा दृढविश्वास मिळवलेला होता.

महाराष्ट्रात विधानपरिषदेवर आमदार म्हणूनही त्यांनी काम केले. पक्षाची ध्येय धोरणे राबवताना त्यांनी लोकांच्या हिताची कामे केली. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतली. राज्यातल्या आजारी साखर कारखान्यांना ऊर्जा देण्याचे काम त्यांनी केले. शेती आणि उद्योग याचा विचार प्राधान्याने केला.

एका छोट्या गावातून जन्माला आलेल्या गुलाबराव पाटील यांनी देशव्यापी कार्य केले. यावरूनच त्यांच्या ठायी असलेल्या गुणांची प्रचिती येते. निष्कलंक चारित्र्य, नि:स्वार्थी वृत्ती, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जिद्द या गुणांच्या जोरावर ते सहकार, समाजकारण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रात यशस्वीरित्या काम करू शकले. त्यांचा सहकारातला विचार आजही या चळवळीला आणि त्यात काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शक असाच आहे.

-----------------------------------------------------------
                   लेखक :बाळासाहेब गुरव
----------------------------------------------------------


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली