विश्रामबाग रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाचा तिढा सुटला सायकल, अपंगांची सायकल आणि पादचारी वाहतुकीस मान्यता मिळणार: पृथ्वीराज पाटील यांची माहिती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विश्रामबाग रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाचा तिढा सुटला सायकल, अपंगांची सायकल आणि पादचारी वाहतुकीस मान्यता मिळणार: पृथ्वीराज पाटील यांची माहिती




लोकसंदेश प्रतिनिधि सांगली 

विश्रामबाग रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाचा तिढा सुटला
सायकल, अपंगांची सायकल आणि पादचारी वाहतुकीस मान्यता मिळणार: पृथ्वीराज पाटील यांची माहिती


विश्रामबाग रेल्वे पुलाखालील रेल्वे गेट एलसी नं. 130 येथे पादचारी वाहतूक तसेच सायकल आणि अपंगांची सायकल यांच्या वाहतुकीसाठी मान्यता देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेठकीत घेण्यात आल्याचे सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.  गेल्या अनेक वर्षापासुन हा प्रश्न उपस्थित झाला होता.  तो तिढा सोडविण्यास या बैठकीला यश आले त्यामुळे या भागातील नागरीकांची येण्याजाण्याची सोय झाली आहे.  या भुयारी मार्गातुन दुचाकी वाहतुक करता येणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले असलेचे त्यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात गुरूवार दि. 18 मे, 2023 रोजी एक व्यापक बैठक झाली.  बैठकित झालेले निर्णय असे - रेल्वे गेट जवळ जिन्याच्या ठिकाणी रॅम्प करण्यास मान्यता दिली आहे.  त्यामुळे तेथुन पादचारी, सायकल व अपंगांची सायकल यांना जाण्या येण्यास सोईचे होणार आहे.  या मार्गावरील दोन्ही बाजुच्या डी. पी. रोडचा सर्व्हे सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा आणि महानगरपालिकेने डी. पी. रोडचे मार्किंग करून द्यावे.  यामध्ये काही अतिक्रमणे आढळून आल्यास ते महानगरपालिकेने दूर करावे.  भविष्यात विश्रामबाग मध्ये डी. पी. रोड साठी जागा संपादित करता आली तर त्या ठिकाणी आणखी एका बॉक्सचे प्रोव्हिजन करता येईल. त्यातुन दुचाकी वाहतुक सुरू करता येईल, परंतु, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे महानगरपालिकेने प्रस्ताव सादर करावा.  वारणाली पाटबंधारे हा 100 फुटी रस्ता भुयारी मार्गापासुन जातो ती जागा रेल्वेच्या अख्त्यारीत येते महानगरपालिकेने ठराव करून त्या जागेची मागणी करावी व फक्त रस्त्याच्या वापरासाठी ती महानगरपालिकेला मिळावी असा प्रस्ताव त्यांनी तयार करावा.  
श्री. पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीला मी स्वतः, मध्य रेल्वेचे डेप्युटी चिफ इंजिनिअर सागर चौधरी, मिरज रेल्वेचे कार्यकारी अभियंता शंभू चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमर नलवडे, माजी आमदार शरद पाटील, नगरसेवक विष्णु माने, कल्पना कोळेकर, विश्रामबाग एल सी 130 रेल्वेगेट संघर्ष कृती समितीचे रविंद्र खराडे, अरूण कुलकर्णी, भूषण साळवी, सचिन लाड, प्रभाकर स्वामी, गिरीश कुलकर्णी, अपंग सेवा संस्थेच्या निर्मला कुलकर्णी आणि इतर प्रमुख लोक उपस्थित होते. 
विश्रामबाग रेल्वे उड्डान पुल झाल्यानंतर हे रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद होणार होते. परंतु, त्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचे ठरले तेथून फक्त पादचारी यांच्यासाठीच तो मार्ग खुला ठेवण्यात आला होता. या रेल्वेगेट जवळील पोलीस लाईन, विद्या विहार कॉलनी, विद्यानगर, वारणाली, झेडपी कॉलनी, अष्टविनायकनगर, जिजामाता कॉलनी, किर्लोस्कर कॉलनी, जयहिंद कॉलनी, ट्रॅफिक पोलिस ऑफिस, एस. पी. ऑफिसमध्ये येणारे नागरीक यांची खुपच अडचण होत होती.  शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, तेथील व्यावसायीकांचीही अडचण झाली होती. त्यामुळे या भागातील नागरीकांनी विश्रामबाग एल सी 130 रेल्वेगेट कृती समिती स्थापन केली. या समितीने 17 एप्रिल, 2023 रोजी लाक्षणिक आंदोलन केले होते.  या आंदोलनाला मी स्वतः तसेच महापौर दिग्विजय सुर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार शरद पाटील उपस्थित होतो.  त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून त्यांना बैठक घेवून या संदर्भात निर्णय घेण्यास सांगू अशी ग्वाही मी आंदोलकांना दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना पत्र दिले.  त्याची दखल घेवुन जिल्हाधिकारी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.  
कृति समितीची ब-याच दिवसांपासुनची ही मागणी होती.  तसेच यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला होता.  
ते म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या बैठकीत रेल्वेच्या अधिका-यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले होते.  या ठिकाणची वाहतुक कायम बंद करावी असे त्यांचे मत होते.  भुयारी मार्गासाठी जो उतार लागतो त्यासाठीची जागा अत्यंत कमी असल्याने अडचणी आहेत असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, या ठिकाणी पादचारी, सायकल आणि अपंगांची सायकल यांना ये-जा करता यावे असे नियोजन करावे.  असे त्यांच्या निदर्शनास आणुन दिले.  भुयारी मार्गातील जिन्याच्या ठिकाणी रॅम्प करावे असेही सुचविले त्यावर या सर्व गोष्टींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी असा निर्णय झाला त्यानंतर लगेचच रेल्वे अधिकारी, मी स्वतः तसेच कृती समितीच्या लोकांनी पाहणी केली.  त्यानंतर रेल्वे अधिका-यांनी वरील प्रमाणे वाहतुकीस मान्यता देण्याची तयारी दर्शविली.  
रेल्वे अधिकारी येत्या 3 ते 4 दिवसात भुयारी मार्गाचा प्लॅन तयार करून काम सुरू करतील आणि लवकरच हा मार्ग वरील प्रमाणे वाहतुकीस खुला होईल असेही त्यांनी सांगितले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.