जयपाल फराटे अण्णा :शेतकऱ्यांच्या शोषणाला लगाम घातलेला लोकनेता काळाच्या पडद्याआड..--- प्रा. एन.डी.बिरनाळे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जयपाल फराटे अण्णा :शेतकऱ्यांच्या शोषणाला लगाम घातलेला लोकनेता काळाच्या पडद्याआड..--- प्रा. एन.डी.बिरनाळे



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

जयपाल फराटे अण्णा :शेतकऱ्यांच्या शोषणाला लगाम घातलेला लोकनेता काळाच्या पडद्याआड..
--- प्रा. एन.डी.बिरनाळे
=
अन्नदाता शेतकऱ्यांना त्यांचं शोषण थांबून त्यांच्या वाट्याला स्वाभिमानी, निर्भय व प्रतिष्ठित जीवन  यावं यासाठी स्वतःला कायम मरणाच्या दाढेत ढकलणारा.. बळीराजाला बलवान करणारा लोकनेता जयपाल फराटे अण्णा यांचे निधन शेतकऱ्यांना पोरके करुन गेले.... 
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
---------------------------------------------


धर्मपरायण व सुसंस्कृत स्व. सिध्दाप्पा आणि स्व. गोदाबाई या शेतकरी दांपत्याच्या पोटी दि.१ जून, १९३९ रोजी कृष्णामाईच्या काठावरील मौजे डिग्रज मध्ये त्यांचा जन्म झाला. 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कसबे डिग्रज येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून त्यांनी जुनी अकरावी उत्तीर्ण केली . वडील सिध्दाप्पा देशप्रेमाने लष्करात भरती झाले. घरच्या आठ एकर शेतीची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्विकारली. 

अन्नदाता शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजऱ्यातून मुक्त होऊन ग्रामस्वराज्य साकार झाले पाहिजे यासाठी भारतीय टपाल सेवेतील क्लासवन अधिकाऱ्याची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून असंघटित शेतकऱ्यांना संघटीत करुन शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी  देशभर शेतकऱ्यांचे जाळे विणणाऱ्या शरद जोशींनी ऊस व कांदा दरवाढीसाठी नाशकात आंदोलन सुरू केले. त्याच्या वृत्तपत्रातील बातम्या वाचू सन १९८१ मध्ये शरद जोशींची त्यांनी पुण्यात भेट घेऊन येताना संघटनेच्या कामासाठी रु.१००० /-ची देणगी दिली तेंव्हा पासून संघटनेच्या कामात झोकून देऊन समरस व एकरुप झाले . गेल्या ४० वर्षात त्यांनी पायाला भिंगरी बांधून असंघटीत बळीराजाला संघटीत करून पाईकांची संख्या वाढवली. ऊस, कापूस,सोयाबीन, कांदा, दूध दरवाढ आंदोलनात लाठ्या काठ्या खाल्ल्या परंतु यत्किंचितही डगमगला नाही.

छ.शिवबांच्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसारखी बळीराजांची लढवय्या फौज त्यांनी उभी केली. 

गेली ४० वर्षे त्यांनी फराटेंचा कमी आणि शेतकरी संघटनेचा संसार अधिक नेटाने केला. १९८२ मध्ये गोपीनाथ धारिया यांच्या नेतृत्वाखालील निपाणीच्या तंबाखू आंदोलनात सांगली भागातील निष्ठावंत कार्यकर्ते घेऊन उडी घेतली. यामुळे असंघटित तंबाखू उत्पादक शेतकरी संघटीत होऊ लागला. 

वसंत-यशवंत लिफ्ट इरिगेशनचे सेक्रेटरी म्हणून काम करताना २५ वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारपड होऊन नापिक का होतात याचा बारकाईने त्यांनी अभ्यास केला आणि क्षारपड जमिन सुधारणेची योजना शासनासमोर मांडली. कृत्रिम निचरा प्रणाली विकसित केली आणि शासनाकडून या योजनेसाठी मोठा निधी खेचून आणला. वारणा - पंचगंगा व कृष्णा खोऱ्यातील सुमारे १५ ते २० हजार एकर क्षारपड नापिक जमिनीवर पुन्हा जोमाने पिके डोलू लागली. अण्णांनी केलेली आहे ही हरितक्रांती ऐतिहासिक स्वरुपाची आहे. अनेक अल्प व अत्यल्प आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांचे संसार उभे करण्याचा पराक्रम त्यांचाच. हे अण्णांचे मौजे डिग्रज भूषण काम महाराष्ट्राला पथदर्शी ठरले आहे. 

ऊसाची ८६०३२ आणि सोयाबीनचे अधिक उत्पादन देणारे वाण सांगली जिल्ह्य़ात पहिल्यांदा त्यांनीच आणली. त्यामुळे अधिक उत्पादनाने शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला.

महाबीज बियाणे प्लाॅटच्या माध्यमातून पिक उत्पादन वाढीचा प्रयोग करून असंख्य शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता त्यांनी आणली. अण्णांच्या संघटन कौशल्यावर शरद जोशी फिदा झाले आणि त्यांनी संघटनेच्या उच्चाधिकार समितीचा सदस्य, सांगली जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशा अवघड जबाबदाऱ्या अण्णांवर सोपवल्या आणि  हा विश्वास सार्थ ठरवत तेवढ्याच ताकदीने अण्णांनी त्या पार पाडताना आपले खमके नेतृत्व सिध्द करणारे सिध्दाप्पा पुत्र ही बिरुदावली सार्थ ठरवली. 

नोव्हेंबर २००२ मध्ये ऊसाला टनाला रु४६०/-दर जाहीर झाला.अन्नदाता शेतकऱ्यावरील या अन्यायाविरुद्ध अण्णा पेटून उठले व नावरसवाडी ते कर्नाळ कवठरस्ता डिग्रज फाटीवर रास्ता रोको आंदोलन केले. आठ दिवस चाललेले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी मौजे डिग्रज गावात मध्यरात्री घुसून लोकांना अमानुषपणे मारहाण केली. सारा गाव एकत्र येऊन आण्णांना अटक होऊ दिली नाही. या घटनेने ते गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनला.बेकायदेशीरपणे अटक  करण्यात आलेल्या गावकऱ्यांची सुटका केल्याशिवाय इथून हलणार नाही असा खणखणीत इशारा दिल्यानंतर डॉ. पतंगराव कदम यांच्या मध्यस्थीने सर्वांची सुटका करण्यास जिल्हा प्रशासनाला त्यांनी भाग पडले. त्यावेळी अण्णांचा खरा स्वाभिमानी बाणा आणि बळीराजावरील  प्रेम आणि वात्सल्य छ. शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राने अनुभवला. ऊसाला रु. ४६० वरुन सुमारे दिड हजार टनाला दर मिळू लागला.  इथेच अण्णा मौजे डिग्रज भूषण आणि शेतकऱ्यांचा कल्याणकर्ता ठरले. 

अण्णा अथकपणे चार दशके 'आहे रे विरुद्ध नाही रे' या लढ्याचे नेतृत्व करताना शेतकऱ्यांच्या बांधावर फिरले . डोळसपणे त्यांच्या समस्यांशी एकरुप होऊन त्या सोडवण्यासाठी मोर्चे, आंदोलने, अर्ज विनंत्या याचा धुमधडाका लावला आणि शोषण व्यवस्थेला लगाम घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाचे लाभ बळीराजांच्या पदरात टाकण्याचे ऐतिहासिक पुण्यकर्म केले आहे हे महाराष्ट्र आणि मौजे डिग्रज कधीच विसरणार नाही. या सामान्य शेतकऱ्यांच्या समतेच्या लढ्यामुळे शेतकरी खडबडून जागा झाला.. आपल्या हक्कासाठी.. घामाच्या दामासाठी स्वाभिमानी होऊन रस्त्यावर उतरला हे अण्णांच्या शक्तीशाली व कुशल नेतृत्वामुळे घडले आहे याचा मौजे डिग्रज गावाला अभिमान तर आहेच त्याचबरोबर महाराष्ट्रही अण्णांचे योगदान कायम स्मरणात ठेवणार हे मात्र नक्की 

त्यांनी बंद अवस्थेत असलेल्या कामधेनू सहकारी दूध उत्पादक पुरवठा संस्थेत लक्ष घातले आणि गावातील पशुधन वाढवून अत्यल्प दूध संकलन असलेल्या संस्थेचा कायापालट केला. आजमितीस या संस्थेचे साडेपाच ते सहा हजार लिटर दूध संकलन व मौजे डिग्रज, कर्नाळ, पद्माळे आणि नावरसवाडी ही संकलन केंद्रे... हा घागर ते टँकर असा विस्तार त्यांच्याच खमक्या नेतृत्वाखाली शक्य झाले हे मान्य करावे लागेल.

 'फुकटात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तर गाठ माझ्याशी आहे' असा मोहिमेवरील सैन्याला सज्जड दम देणाऱ्या छ. शिवाजी महाराजांच्या शेतकरी प्रेमाचे अण्णा प्रतीक बनून राहिले व महात्मा जोतिबा फुले यांनी दिलेल्या 'शेतकऱ्यांचा आसूड'बनून अन्नदात्याचे शोषण करणाऱ्या साखर सम्राटांचा कर्दनकाळ ठरले म्हणून चाळीस वर्षांपूर्वीचा रु३०० ऊसाचा दर आज तीन हजारहून अधिक रकमेच्या घरात पोहचला. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून समतेची लढाई यशस्वी करणाऱ्या या शेतकरी चळवळीचे भारतीय स्वातंत्र्याचा लढा, फ्रान्स, अमेरिका व रशियन राज्यक्रांतीच्या लढ्याशी साधर्म्य असलेला आहे.शेतकरी संघटना, शरद जोशी आणि फराटे अण्णा यांचे कार्य ही वर्गविरहित, शोषणमुक्त समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी केलेली क्रांतीच आहे. 

अण्णा असंघटित शेतकऱ्यांचा आवाज बनले.. त्यांच्या रास्त मागण्यांच्या प्रश्नावर रान उठवणारा सजग नेता म्हणून उभा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. 

अण्णांच्या धडाकेबाज आंदोलनामुळे भांडवलशाही प्रवृत्तीची झोप उडाली.. त्यांच्या शोषण व्यवस्थेला धक्का देण्याचे धाडस अण्णांनी केले. शोषितांचा वाली म्हणून ख्यातकीर्त झाले.अण्णांचे  सर्वांत मोठे यश म्हणजे असंघटित बळीराजाला जात.. धर्म.. पंथ व भाषाभेद विसरायला लावलं. त्यांना संघटीत केलं.. हे करताना जाती- पातीच्या भिंती जमीनदोस्त करून शेतकरी ही एकच जात.. त्यांचे शोषण होता कामा नये.. यासाठी शेतकरी चळवळ टिकली पाहिजे यासाठी त्यांनी अविश्रांत लढा दिला .त्यांच्या या मानवतावादी कार्याचे पोवाडे मौजे डिग्रजच काय तर उभा महाराष्ट्र कायमच गात राहिल. 

असंघटित शेतकऱ्यांना  संघटनेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची प्रेरणा देणं हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे.. या कामी ते कमालीचे यशस्वी झाले. हे पुरोगामी महाराष्ट्राचे व विशेषतः मौजे डिग्रज गावचे खरे भूषण आहे. अण्णा हे कुशल शेतकरी संघटक ही बिरुदावली मिरवण्यासाठी पात्र झाले. 

शेतकरी शेतात राबतोय म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेची चाकं फिरत राहतात. सबंध देशाची प्रगती व अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शासनाने शेतकऱ्यांना मुबलक पाणी, मनुष्यबळ, भांडवल व हक्काची बाजारपेठ व हमीभाव दिलाच पाहिजे हा त्यांचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान आहे. त्यांचे कार्य हे तिरंग्याचा आणि संविधानाचा सन्मान करणारे आहे. जागतिकीकरणाच्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत व उन्नत शेती करावी.. ज्या ज्या वेळी शोषण करणारी व्यवस्था डोकं वर काढते त्या त्या वेळी जागृतपणे ती ठेचून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कायम संघटीतपणे लढा दिला पाहिजे हा अण्णांचा विचार महाराष्ट्र मजबूत करणारा आहे. 
वडील सिध्दाप्पांनी लष्करात भरती होऊन भारताचे संरक्षण केले. अण्णांनी घरची शेती सांभाळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या रानातील मातीचे महत्त्व वाढवले.. पुत्र अनिल आणि दिपक  शेतीचे वैभव वाढवत आहेत. त्यांच्या संघटनात्मक शेतकरी व समाजसेवेचा वारसा पुत्र सुनिल नेटाने पुढे नेत आहेत. ही खरी अण्णांची स्मृती आहे. देशाचा.. शेतकऱ्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी फराटेंचा संसार समर्थपणे सांभाळलेल्या स्व. आक्काताई फराटे यांनी अण्णांना खंबीरपणे साथ दिल्याने जयपाल अण्णा मौजे डिग्रज भूषण ठरतात अशी  गावकऱ्यांची सद्भावना आहे. 

 गेल्या चाळीस वर्षात शेतकरी संघटनेचे नेते म्हणून ज्या खस्ता अण्णांनी खाल्ल्या आणि बळीराजाला अच्छे दिन आणले त्याबद्दल समस्त मौजे डिग्रज गावच्या वतीने मौजे डिग्रज भूषण जीवन गौरव पुरस्कारांने सन्मानित करुन शेतकरी चळवळीतील खंदे शिलेदार मा. खा.राजू शेट्टी, मा. आमदार उल्हास पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, मा. रघुनाथ दादा पाटील, मा. संजय कोले, मा. महेश खराडे व मा. विशालदादा पाटील यांच्या हस्ते व उपस्थितीत तमाम मौजे डिग्रज ग्रामस्थांच्या वतीने  गौरवपूर्वक  मानपत्र बहाल करण्यात आले होते. ते मानपत्र शब्दबद्ध करण्याची सेवा आम्हाला करता आली. 
त्यावेळी त्यांच्या कार्यावर आम्ही मनोगत व्यक्त केले होते. 

अण्णांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी प्रार्थना करतो 🙏💐

प्रा. एन.डी.बिरनाळे 
सांगली..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.