आरोग्यपूर्ण, विकसित सांगलीचा संकल्प पृथ्वीराज पाटील ः ‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली’ उपक्रमास आजपासून प्रारंभ ......

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आरोग्यपूर्ण, विकसित सांगलीचा संकल्प पृथ्वीराज पाटील ः ‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली’ उपक्रमास आजपासून प्रारंभ ......आरोग्यपूर्ण, विकसित सांगलीचा संकल्प 

पृथ्वीराज पाटील ः ‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली’ उपक्रमास आजपासून प्रारंभ 


..
काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आज वाढदिवस. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीविषयी, तसेच भविष्यातील संकल्पाविषयी झालेला संवाद... 
........... 

प्रश्न: वडील गुलाबरावांचा कोणता विचार पुढे न्यावा वाटतो? 

उत्तर: माझे वडील हे राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्त्व होतं, मात्र त्यांनी आम्हाला नेहमीच साधेपणाची शिकवण दिली. खासदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार, तसेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा अशी कोणतीच ओळख आम्ही कधी पुढे रेटली नाही. मी डॉक्टर व्हावं, असं घरच्या सर्वांचं मत होतं. मला कमी मार्क मिळाले, तेव्हा वडिलांनी ठरवलं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून सहज मला जागा मिळाली असती. घरच्या सर्वांचा आग्रह वडिलांनी डावलला. तेव्हा मला त्यांनी, ‘तुझ्यासाठी शब्द टाकला तर ज्यांना प्रवेश मिळाले नाहीत त्यांच्यावर अन्याय होईल. तो मी करणार नाही,’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मग मी भारती विद्यापीठात डिप्लोमा आणि डिग्री केली.     प्रश्न : शिक्षणानंतर पुढचा प्रवास कसा होता


श्री. पाटील ः बी. फार्म.नंतर राज डिस्ट्रिब्युटर नावाने फार्मास्युटिकल एजन्सी सुरू केली. माझे मोठे बंधू तो व्यवसाय पाहायला लागले. मात्र त्यावेळी माझं शिक्षण चालू होतं. त्यामुळे मी ठरवलं की, आपली डिग्री झाल्यावर आपण यात लक्ष घालूया. मात्र तो व्यवसाय चार-पाच वर्षे चालला. मात्र नंतर तो काही कारणास्तव बंद करावा लागला. त्यानंतर मी माझ्या सर्व बी. फार्म., डी. फार्म. आणि औषध विक्रेते मित्र यांना एकत्र करून सहकारी तत्त्वावर सिंबायोसिस फार्मास्युटिकल या नावाने पहिला सहकारी औषध निर्मिती प्रकल्प आम्ही उभा केला. तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. सहकार तत्त्वावरचा हा राज्यातला पहिला औषधनिर्मिती प्रकल्प आहे. विलासरावांनी अशा सहकारी कंपन्यांमधून ज्या औषधांची निर्मिती होईल, ती सरकार प्राधान्याने घेईल. 


प्रश्न : शिक्षण क्षेत्रातील वाटचाल कशी झाली? 


उत्तर: आमच्या सर्व शैक्षणिक संस्थांचा व्याप आम्ही गेल्या पंचवीस वर्षांत उभा केला आहे. बऱ्याच जणांना वाटते की, या संस्था वडिलांनी उभ्या केल्या. त्या मी चालवत आहे. खूप संघर्षातून आम्ही होमिपॅथी कॉलेज सुरू केलं. एकवेळ तर कॉलेज बंद होतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी सात विद्यार्थी होते, तीन शिक्षक होते आणि दोन शिक्षकेतर कर्मचारी होते. त्या वेळी अनेकांनी हे कॉलेज एखाद्या संस्थेला देऊन टाका. मात्र आम्ही जिद्द सोडली नाही. कितीही संकट आली, तरी डगमगायचं नाही, असं मनाशी पक्कं केलं. मग नंतर ते मदनभाऊ पाटील यांच्या वसंतदादा डेंटल कॉलेजमध्ये तात्पुरतं सुरू केलं. पुढे होमिओपॅथी कॉलेजला मंजुरी मिळण्यासाठी तर प्रचंड कष्ट घ्यावे लागले. मंत्रालयात सचिवांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक अधिकारी व्यक्तींशी चर्चा झाल्या. पतंगराव कदम साहेबांनी पुढे आम्हाला मदत केली आणि त्यातून आज तुम्हाला जशी दिसतेय, ती परिपूर्ण शिक्षणसंस्था आकाराला आली. 


       प्रश्न : पुढचे संकल्प कोणते आहेत?

श्री. पाटील ः आजवरच्या वाटचालीबद्दल मी समाधानी आहे. आता सांगलीसाठी मला ठोस काम करायचे आहे. ‘ब्रँड सांगली’ उपक्रम त्याची सुरवात आहे. सांगलीतील काही मूलभूत प्रश्न हातात घेऊन, ते सोडवण्यासाठी मी पुढाकार घेतो आहे. ‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली’ या कन्सेप्टवर आपण आता काम सुरू केलं आहे. हे शहर सर्वार्थाने पुढे जात राहावं, हे माझं ध्येय आहे आणि त्यासाठी फाउंडेशन, कॉलेज आणि माझ्या राजकीय करिअरच्या माध्यमातून जे काही करणं शक्य आहे, ते ते सर्व करणार आहे. 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.