*आर्थिक उन्नती हाच खरा ग्रामधर्म आपुला II*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

*आर्थिक उन्नती हाच खरा ग्रामधर्म आपुला II*लोकसंदेश न्यूज नेटवर्क

आर्थिक उन्नती हाच खरा ग्रामधर्म आपुला II

आपल्याकडे संत संस्कृतीची उज्वल परंपरा आहे. त्याद्वारे सर्व जाती जमातींना समता, न्याय व स्वातंत्र्याची मूल्ये जोपासली गेली आहेत. त्याचबरोबर व्यसनमुक्ती, मानवता, बंधुभाव, प्रेम, भक्तिमार्ग व शांततेचा संदेश देऊन समाजमन सुसंस्कारित करण्याची मोलाची भूमिका बजावली आहे.

परंतु श्रीसंत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे
"ऐसे कैसे झाले भोंदू I कर्म करोनी म्हणती साधू l तुका म्हणे सांगू किती l जळो तयांची संगती l ,
आज संताच्या बुरख्यातील ढोंगी महाराज, गुरु, साधू, बुवा, महंत यांनी या क्षेत्राचे बाजारीकरण केले आहे. त्याकडे नंतर वळतो.

*संत संस्कृतीमुळे, मुख्यतः ग्रामीण भागामध्ये एक नुकसान झाले आहे. त्यामुळे "नाही रे" वर्गाची, (ज्यांचे हजारो वर्षांपासून शोषण होत आहे) अन्याया विरुद्ध लढण्याची क्षमता, कुवत, आक्रमकता व ईर्षा बोथट, मवाळ केली आहे.*

प्रथम स्पष्ट करू इच्छितो की मी नास्तिक नाही. मी श्रद्धेने देवांचे स्मरण, नमन करतो.

"आपल्या वाटेला आलेले दुःख, दारिद्र्य हे पूर्वजन्मातील पातकाचे फळ असून, कोणालाही दोष न देता ते आनंदाने भोगावे" या तत्त्वज्ञानामुळे घात झाला आहे. शोषणकर्त्यांचे फावले आहे.

"नशिबात असेल तरच मिळते" या दैववादामुळे रोज मरणाचं कष्ट करण्यासाठी मानसिकरित्या आपल्याला तयार केले आहे.

सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांच्या इतर अभंगापेक्षा प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक "ठेविले अनंते तैसेची रहावे I चित्ती असो द्यावे समाधान II " हेच नसानसात बिंबवले आहे. त्यामुळे प्रयत्नवादाची कास सोडून प्रारब्धावरच जास्त श्रद्धा झाली आहे. 'देईल माझा हरी' यामुळे महत्वकांक्षाची उर्मी दाबली गेली आहे.

खरी गरज आहे आपल्या आर्थिक उन्नतीसाठीचा ध्यास घेण्याची. त्यामध्ये शिक्षण आपोआप आलेच. *पैसा आणि ऐहिक सुखासाठी प्रयत्न करण्यामध्ये काहीच चूक नाही. 'अर्थ' हे गीतेत सांगितल्याप्रमाणे, चार पुरुषार्थांपैकी एक आहे.*

*आर्थिक उन्नती हाच खरा ग्रामधर्म आहे.*

*तरी ग्रामस्थांनो, तुमचे कीर्तन, पारायण, वारी, हरिपाठ, काकड आरती, नामस्मरण, पोथी पुराण वाचन, भजन, दिंडी, अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसाद जेवणावळी संपल्या असतील तर वेळ काढून तुमच्या दारिद्र्याच्या कारणांचा शोध घ्या. अन्याया विरुद्ध संघर्ष करा.*

काही लोक म्हणतात 'हे भक्त संसार सांभाळून देवधर्म करतात'.  'संसार सांभाळून' म्हणजे काय? फाटके धोतर व बायकोला झिजलेली साडी. स्वतःला वाचता पण येत नाही किंवा अर्धशिक्षित. ग्रामीण भागात असंख्य लोक आहेत जे वेदना सहन करत आजारपण, दुखणे औषधाविना अंगावर काढत आहेत. नवीन पिढीने तरी नवविचार करण्याची जरुरी आहे.

वैराग्यमूर्ती श्री. गाडगे महाराजांनी "भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, निराश्रीतांना आधार, गरीब मुला मुलींचे लग्न व शिक्षणावर" भर देत अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केला होता. या तर किमान गरजा आहेतच. त्याशिवाय आर्थिक समृद्धीही पाहिजे.
'गरिबाला खडकाळ जमिनीवर शांत झोप लागते व श्रीमंत माणूस मऊ गादीवर पण रात्रभर तळमळत असतो' हे भ्रामक व दिशाभूल करणारे वाक्य आहे.

सध्या दैववाद, अंधश्रद्धा वाढीसाठी शासन स्तरावरून खतपाणी मिळत आहे. आध्यात्मिक कार्यक्रमाच्या पोस्टरवर राजकीय नेत्यांचे फोटो झळकत आहेत. धर्मामध्ये राजकारणाची लुडबुड चालू आहे.

भाजप प्रणित शिवपुराण सप्ताहामध्ये पंडित (?) प्रदीप मिश्रा हे व्याख्याना मध्ये सांगतात "तुमच्या मुलाने वर्षभर शाळेचा अभ्यास केला नाही तरी हरकत नाही. शंकरच्या पिंडीवर बेलपत्र वाहा, तो 100% पास होईल. नोकरी लागत नाही त्यांनी धतूरा वाहा". अशा कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने समुदाय असतो.

वर्ष श्राद्ध सारख्या धार्मिक कार्यक्रम घरगुती पद्धतीने करा. *त्यासाठी कर्ज काढून, कीर्तन आयोजित करून, गाव जेवण करून पैशाची उधळपट्टी का करता?* (सोबतचे कार्टून पहा).

श्रीसंत तुकाराम म्हणतात "सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता!"
म्हणजे बहुमतापेक्षा मला जे वेगळे वाटत आहे ते सत्य मी माझ्या अनुभवावर पारखून, चिकित्सा दृष्टिकोनातून विचार करूनच स्वीकारेल.

सोबत: कार्टून 

सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे                                            
अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स    9881495518
Coordinator- Task Force Sugar Core Committee (समन्वयक, टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी) 
Coordinator, Executive Steering committee for Carbon Credit (For farmers)
समन्वयक, दूध संघर्ष महाअभियान 

माझ्या इतर लेखांसाठी पहाः Blogger deshmukhsk29.blogspot.com
किंवा
www.facebook.com/satish.deshmukh.184

You Tube Channel: https://youtube.com/@satishdeshmukh4600

फेसबुक ग्रूपः शेतकऱ्यांचा सत्याचा आसुड: https://www.facebook.com/groups/505953798352097/

एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!
02/01/2024

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.