इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या*


सांगली जिल्ह्याच्या तासगावच्या पट्ट्याने संपूर्ण जगावर आपलं नाव लौकिक केलय...

इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या...

जेव्हा संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडला होता. भारतीयांना आपल्या भविष्याची खात्री नव्हती, गोऱ्यांची क्रूरता निष्पाप भारतीयांचं जगणं मुश्किल करून टाकत होती होती, अशा काळात सांगलीच्या एका चुणचुणीत तरुणाने थेट ब्रिटिश राजकुमाराचीच गाडी विकत घेऊन अख्ख्या इंग्लंडमध्ये ती दिमाखात फिरवली. आपल्या या कृतीने त्यांनी गोऱ्यांच्या मनात खदखद निर्माण केली. त्यांच्याच घरात घुसून भारताचा झेंडा फडकविला. त्याचे हे कार्य त्याकाळात कोणत्याही क्रांतिकारी घटनेपेक्षा कमी नव्हते.


कोण होता कोण हा तरुण? तो कोणी क्रांतिकारक नव्हता, की स्वातंत्र्यसेनानी नव्हता. तो होता सांगलीतील तासगावातला भालचंद्र गरवारे अर्थातच आबासाहेब गरवारे.

गरवारे म्हटलं की आठवतं ते पुण्यातलं गरवारे कॉलेज आणि गरवारे चौक. यापलीकडे आपल्याला काय माहितीये? मित्रांनो पुण्यातल्या या कॉलेजला गरवारे नाव का दिलं गेलं? ते कॉलेज आबासाहेबांनी उभं केलं का? तर नाही. त्या कॉलेजचे संस्थापक आबासाहेब गरवारे नव्हते, मग का बरं गरवारे नाव दिलं गेलं असेल? जे जाणून घेण्यासाठी आपल्याला शंभर वर्ष मागं जावं लागेल.


तासगाव मध्ये 21 डिसेंबर 1903 रोजी एका शेतकरी कुटुंबात भालचंद्रचा जन्म झाला. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे कसेबसे 6वी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. पूर्ण कसले सहावीच्या मार्कलिस्टवर नापासचा शेरा मिळाला. भालचंद्रच्या वडिलांचं नाव दिगंबर गरवारे. वडिलांनी भालचंद्रला मुंबईला पाठवले. या सहावी नापास भालचंद्राने 1918 साली म्हणजे वयाच्या जेमतेम 15 व्या वर्षी मुंबईच्या झगमगाटात पहिलं पाऊल टाकलं.


ब्रिटिशांचं वर्चस्व असणाऱ्या मुंबईत वावरणं थोडं कठीणच होतं. मुंबईत ब्रिटिशांनी लोकांचं जगणं नकोस करून टाकलं होतं. रस्त्यावरुन एखादा गोरा अधिकारी जात असेल, तर लोक जिथे जागा मिळेल तिथे लपून बसायचे, कारण गोरे कधी काय करतील याचा काही नेम नव्हता. अशा परिस्थितीत भालचंद्र एका गॅरेजमध्ये काम करू लागला. गॅरेजमध्ये राहून तो गाड्या रिपेअरिंगची कामे शिकू लागला. मनापासून काम करून तो चारचाकी आणि दुचाकी गाड्या रिपेयरची कामे शिकला. गॅरेजमध्ये असताना भारतीयांचे होणारे हाल त्याने उघड्या डोळ्यांनी पहिले होते. पण बिचारा एकटा भालचंद्र ब्रिटिशांविरुद्ध कसा आवाज उठवणार होता, त्यामुळे आपण आणि आपलं काम इतक्यापुरताच तो मर्यादित राहायचा. ब्रिटिशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणामुळे पुढच्या काही वर्षात ही वाहनं भारतीयांची गरज बनणार हे त्याने तेव्हाच हेरलं होतं. गॅरेजमध्ये काम करून भालचंद्रच्या ओळखी वाढल्या. 


वयाच्या 17 व्या वर्षी  गिरगावमध्ये डेक्कन मोटार एजन्सीची स्थापना करून तो जुन्या गाड्या खरेदी-विक्री करणारा एजंट बनला. सोबतच तो स्पेअर पार्ट, टायरची वगैरे विक्री करू लागला. थोड्याच दिवसात या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला. त्याच्या गोडाऊनमध्ये आता गाड्यांना जागा नव्हती. सर्वसामान्य माणसापासून ते मुंबईतल्या राजे-रजवाड्यांपर्यंत सगळेजण डेक्कन मोटार एजन्सीमधून गाड्या घेऊ लागले. मुंबईत गाडी घ्यायचं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव डेक्कन मोटार एजन्सी. एजन्सीचा नावलौकिक वाढला होता. त्यासोबतच भालचंद्र गरवारे मुंबईचे आबासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. आबासाहेबांना पत, प्रतिष्ठा मिळू लागली. खिशात एक रुपयाही नसताना मुंबईत आलेला भालचंद्र आता आबासाहेब झाला होता. ब्रिटिशदेखील आबासाहेबांकडूनच गाड्या विकत घेऊ लागले. 

एकदा एक ब्रिटिश अधिकारी आबासाहेबांकडे गाडी खरेदी करण्यासाठी आला, गाड्यांची किंमत पाहून तो ब्रिटिश म्हणाला, ‘We get cheaper cars in England than here and now prices have fallen considerably due to the recession there.’ हे ऐकताच आबासाहेबांनी त्याच्याकडून अजून माहिती काढून घेतली, इंग्लंडमध्ये कमी किमतीतल्या गाड्या मिळतात हे ऐकल्यावर त्यांना वेध लागले ते इंग्लंड दौऱ्याचे. व्यवसायातून आलेल्या पैशांतून त्यांनी तडक इंग्लंड गाठले. इंग्लंडमधील पहिली सेकंड हँड गाडी त्यांनी 40 पौंडला विकत घेतली. हळूहळू त्यांनी एकापेक्षा एक चांगल्या दर्जाच्या सेकंड हँड गाड्या विकत घेतल्या. सेकंड हँड गाड्यांच्या दुनियेत आबासाहेबांनी लंडनमध्ये चांगलाच जम बसविला आणि तिथूनच ते नवनवीन बनावटीच्या जुन्या गाड्या भारतात पाठवू लागले.

आबासाहेबांनी केवळ गाड्यांचाच व्यवसाय केला नाही, तर त्यांनी प्लॅस्टिक बनविणारे कारखाने देखील विकत घेतले. ज्याकाळात भारतीयांना प्लॅस्टिक म्हणजे काय? हे देखील माहीत नव्हतं, अशा काळात आबासाहेबांनी भारतात प्लॅस्टिक बटणं, नायलॉन यार्न, प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट अशी प्लॅस्टिकची अनेक उत्पादने घेऊन गरवारे मोटर्स, गरवारे प्लॅस्टिक, गरवारे वॉल रोप्स, गरवारे  नायलॉन्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन अशा अनेक कंपन्यांची उभारणी केली. या व्यापारात त्यांनी भरपूर पैसा कमविला. ज्या गोऱ्यांनी भारतीयांचे जिणे हराम करून सोडले होते. त्या गोऱ्यांची नाचक्की करायचं हे आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं. लंडनमध्ये असताना बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन प्रिन्स ऑफ वेल्सची,  इंग्लंडच्या राजपुत्राचीच गाडी विकत घेतली. ती गाडी आणि त्यावर एक गोरा शोफर ठेऊन ते ताठ मानेने लंडनमध्ये फिरू लागले.

इतकंच नाही तर १९३४ साली त्यांनी लंडनमध्ये ३ एकर जमीन आणि काही अन्य मालमत्ता २२०० पौंडाला खरेदी करून त्या मालकालाच आपल्याकडे नोकरीस ठेवले. जेव्हा भारतात गुजराती, मारवाडी उद्योगपतींचा जन्म होऊ लागला होता, महाराष्ट्रात परप्रांतीय आपल्या उद्योगाचे बस्तान बसवत होते. त्याकाळात सांगलीच्या या तरुणाने चक्क इंग्लंडमध्ये आपल्या व्यवसायाचे बस्तान बसवलं. त्यांनी केलेला प्रत्येक उद्योग हा भारतीयांची अस्मिता जपण्यासाठीचा एक प्रयत्न होता.

जे ब्रिटिश भारतीयांना गुलाम म्हणून वागवत होते, त्याच ब्रिटीशांना आबासाहेबांनी त्यांच्यात घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून आपल्या पदरी ठेवून एक स्वाभिमानी, यशस्वी, देशप्रेमी मराठी उद्योजक बनण्याचा मान मिळविला होता. आबासाहेबांनी केवळ उद्योगच केला नाही, तर आपल्या कर्तुत्वाने ब्रिटीशांना तोंडात बोटं घालायला लावली. आबासाहेबांनी केवळ व्यापारच नाही केला तर शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देखील सढळ हाताने मदत केली. भारत स्वतंत्र झाल्यावर 1959 साली त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेरीफ म्हणजे नगरपाल. आबासाहेबांनी पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला चांगलीच आर्थिक मदत केली आणि त्यामुळेच संस्थेने कॉलेज आणि हायस्कूलला 1945 साली आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे दिली. मुंबई university च्या अंतर्गत त्यांनी सांगलीत मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले,

त्यांच्या याच कार्यकर्तुत्वामुळे त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच 1971 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीतील एका खेड्यातल्या मुलाचा गॅरेजमध्ये काम करण्यापासून ते पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यापर्यंतच प्रवास खरच विस्मयकारक होता. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं आपण यशवंतराव चव्हाणांच्या अतुलनीय कामाबद्दल अनेकदा म्हणतो, पण मित्रांनो हा भालचंद्र नामक सह्याद्री देखील हिमालयाच्या प्रत्येक अडिअडचणीत धावून गेला होता हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्या विचारांची ज्योत आज प्रत्येकाने आपल्या मनात निरंतर तेवत ठेवली पाहिजे....

 भारतीयांसाठी त्यातून मराठी माणसा साठी एक प्रेरणादायी व गौरवास्पद माहिती...

                    संपादकीय....

सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुका या तालुक्याची ख्याती पूर्ण जगभरात आहे....


तासगाव वेगवेगळ्या करण्यासाठी प्रसिद्ध आहे जसे द्राक्ष बेदाणे हळद याची फार मोठी बाजारपेठ तासगाव आहे ..

        

  या तालुक्याला सर्कशीच तासगाव  ..


भारतातील पहिल्या सर्कशीची सुरुवातच तासगाव मधूनच झाल्यामुळे तासगावला "सर्कशीचे तासगाव म्हटल जायचं..


आबासाहेब गरवारे हे तासगाव चे असल्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे... जे जगभरात गरवारे उद्योग समूहांमधून प्रसिद्ध आहेत...
तशी तासगावची ख्याती म्हणजे या तासगाव मधून वेगवेगळे व बलाढ्य नेते ज्यानी महाराष्ट्रावर राज्य केले, 


जसे स्वर्गीय आर आर आबा पाटील ,


दिनकर आबा पाटील, खासदार संजय काका पाटील, वि.स. पागे व असे ज्ञात व अज्ञात व्यक्तींनी तासगाव  मधून संपूर्ण भारतात  जगभरात उद्योग व वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात  एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे..
तासगाव मधून हळद द्राक्ष व बेदाण्याची निर्मिती असल्याने त्याची प्रसिद्धी संपूर्ण जगभरात आहे ..
तासगाव तालुक्यातून आमचे गलाई बांधव संपूर्ण भारतात व जगामध्ये आपापले व्यवसाय करून तासगावचं नाव उज्वल करत आहेत..
मात्र तासगाव तालुक्यातील ह्या  व्यक्ती कधी ही प्रसिद्धीस आलेल्या नाहीत..

आम्ही मनेराजुरीचे असल्यामुळे आम्हाला याबाबतीत  अभिमान आहे
अशा या ज्ञात व अज्ञात तासगाव करांचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींना आमच अभिवादन...
संपादक...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.