सांगलीत दीडशे वर्षांत अनेकदा आले महापूर ऐतिहासिक कागदांमध्ये महापूरांची माहिती :मानसिंगराव कुमठेकर ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीत दीडशे वर्षांत अनेकदा आले महापूर ऐतिहासिक कागदांमध्ये महापूरांची माहिती :मानसिंगराव कुमठेकर ...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगलीत दीडशे वर्षांत अनेकदा आले महापूर
ऐतिहासिक कागदांमध्ये महापूरांची माहिती  
मानसिंगराव कुमठेकर
.


मिरज:दरवर्षी जून-जुलै महिना उजाडला आणि एकसारखा पाऊस पडू लागला की महापूराच्या भितीने सांगलीकरांच्या उरात धडकी भरते. पण, सांगलीकरांना महापूर काही नवीन नाही. गेल्या दीडशे वर्षांत पाच-सहा वेळा त्यांनी महापूराचा अनुभव घेतला आहे. सन 1853 आणि 1856 साली सांगली आणि परिसरात आलेल्या महापूराची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यावेळी सांगलीतील नागरिकांनी दैना आणि पूराच्या पाण्याचे वर्णन या कागदपत्रांत आहे.  

    सांगलीकरांनी महापूराचा असा अनुभव अनेकदा घेतला आहे. सन 1853, 1856, 1914, 1962, 2005, 2019 आणि 2021 यावर्षी सांगलीत महापूर येऊन मोठे नुकसान झाले. पाच-सहा दिवस सांगलीचा व्यवहार ठप्प झाला.

सन 1853 आणि 1856 सालातील सांगली आणि परिसरात आलेल्या महापूराची कागदपत्रे नुकतीच उजेडात आली आहेत. (मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात ही कागदपत्रे आहेत.) महापूराने तत्कालीन नागरिकांची कशी दैना उडविली? याचे साद्यंत वर्णन मोडी लिपीतील या कागदपत्रांत आहे.

   सन 1853 साली जुलै महिन्यात दक्षिण महाराष्ट्रात कृष्णाकाठच्या सर्वच क्षेत्रात पाऊस पडला. कृष्णेच्या पाण्याने साताऱयापासून कर्नाटक सीमेपर्यंत काठालगतच्या गावांची धूळधाण उडविली. नरसिंगपूर, ताकारी, तुपारी, दहय़ारी, बोरगांव, खेड, पुणदी, शिरगांव, आमणापूर, बुरली, नागराळे ही गावे पाण्याने वेढली. त्यापैकी काही गावांत तर पाणी शिरून हाहाकार माजला. अंकलखोप, तावदरवाडी, भिलवडी येथेही महापूर आला. जुलै महिन्याच्या ज्येष्ठ पौर्णिमेलाच पावसाने आपले रंग दाखवायला सुरूवात केली होती. या पौर्णिमेला मोठा पाऊस येऊन सांगलीजवळ नाव बुडाली. नंतर संततधार पावसाला सुरूवात होऊन महापूर आला. 
या महापूराने सांगलीतही थैमान घातले. जुने गावं तर पाण्यात संपूर्ण बुडालेच. शिवाय श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेंबानी बांधलेला गणेशदुर्ग पाण्याखाली गेला. त्यावेळचे सांगलीचे अधिपती आपल्या कुटुंबासह मिरजेत राहावयास गेले. सांगलीच्या सर्व पेठा बुडून हजारो रूपयांचे नुकसान झाले. वारणातीराची सर्व खेडी बुडाली. त्यावेळचे सांगली संस्थानचे फडणीस बळवंतराव यांच्या घराच्या तिमजल्याला पाणी लागले. अनेक वाडे आणि घरे ढळासळली. सांगली, मिरज, कोल्हापूर या भागातील कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्याकाठची सर्व गावे बुडाली. 
   तत्कालीन रंगराव शाहीराने सन 1853 च्या या महापूराचे वर्णन एका पोवाडय़ात केले आहे. त्यावरून तत्कालीन पूराची भीषणता लक्षात येते. या महापूराने सांगलीत जी हानी झाली, वाडे, घरांचे नुकसान झाले, त्याचे काम पुढे वर्षभर सुरू होते. या महापूराने सांगलीतील गणपती मंदिरासमोर मोठा खळगा पडला. तो भरून काढण्याचे काम सन 1854 च्या मार्च महिन्यात हाती घेण्यात आले. 23 मार्च 1854 च्या नोंदीत म्हटले ‘श्रीगणपतीचे देवळापुढे सालगुदस्ता श्री कृष्णाबाईस महापूर अतिशय येऊन खलगा भाला दीड भाला सुमार पडला. वडर याजकडून 1200 रूपये मक्त्याने भरविला. त्यात थोरला हौद चुन्याचा पडला होता, तो काढावयास राजश्री दादा कारभारी हे जाऊन बसऊन बाहेर माणसे वगैरे लाऊन काढीला.’

सन 1853 च्या महापूरानंतर सांगलीत सन 1856 साली पुन्हा महापूराने थैमान घातले. 23 जुलै 1856 रोजी पाऊस पडण्यास सुरूवात झाली. पाणी इतके वाढले की ते मारूतीच्या देवळापर्यंत आले. 24 जुलैच्या 1856च्या नोंदीत म्हटले आहे, ‘आज कृष्णाबाईस पाणी चढले आहे. मारूतीचे रस्त्यानजीक आले आहे. पाऊस आज दोन दिवस बराच लागोन राहिलेल्या पेरण्या सर्व जाहल्या व होत आहेत. 23 जुलै रोजी सुरू झालेला हा पाऊस कमी अधिक प्रमाणात 27 जुलैपर्यंत सुरूच होता. त्यामुळे कृष्णेच्या पाण्याच्या पातळीत वाढच होत होती. 27 जुलै रोजी पावसाने कहर केला. दुपारनंतर तो मुसळधारपणे सुरू झाला. त्या दिवशी रात्रभर हा पाऊस पडला. पहाटे थोडी विश्रांती घेऊन तो पुन्हा 28 जुलैला दिवसभर सुरूच होता. त्यामुळे कृष्णेच्या पातळीत मोठी वाढ झाली. सुर्योदयापासून पाण्याच्या पातळीत सतत वाढच होत होती. पाणी गावात शिरणार या भितीने लोकांनी गावाबाहेर जाण्यास प्रारंभ केला. गणेशदुर्ग किल्ल्यासमोर पाणी कमरेएवढे आले. लोक या पाण्यातून आपल्या मुलाबांळासह खणीवर रहावयास गेले.

27 जुलै 1856 च्या नोंदीत म्हटले आहे, ‘आज दोन दिवस पाऊस बारीक मोठा पडत आहे. परंतू आज दोनप्रहरपासून एकसारखा मध्यरात्रपर्यंत पडत आहे. फार चांगला आहे.’ 28 जुलै च्या नोंदीत म्हटले आहे,‘ पाऊस कालपासून एकसारखा आज अस्तमानपर्यंत लागून श्री कृष्णाबाईस पाणी चढु लागले. सकाली सुर्योदयास पाणी पोटाबरोबर होते. ते आज दुपारपर्यंत आठ हात उंची पाणी चढले. रात्रीतून तीन हात चढले. गावातील बहुत गरीब लोकांनी खणीवर घरे शुद्रांची आहेत आहेत, तेथे गेले किल्ल्यापुढून जाणेस मार्ग कंबरभर पाण्यातून.’
संपूर्ण गावात पाणी शिरले होते. याची पाहणी करण्याकरिता तत्कालीन अधिपती श्रीमंत धुंडीराव उर्फ तात्यासाहेब पटवर्धन हे 29 जुलै रोजी किल्ल्यातून नावेत बसून मारूतीचे देवळापर्यंत पाणी पाहून आले. भाऊसाहेब पटवर्धन हेही नावेत बसून कारभारी हरिहरराव दादा यांना घेऊन गावातून फेरफटका मारून, पाण्याची मौज बघून आले. हा महापूर सन 1853 च्या महापूरापेक्षाही मोठा होता. 29 जुलैच्या नोंदीत म्हटले आहे, ‘पाणी दोन प्रहरपर्यंत चढले. सन ईहीदे खमसैन साली पाणी आले, त्याप्रमाणे आले आज अर्बा साली पाणी येऊन फार नाश जाहला. त्यापेत्रा साडेतीन हात उंची पाणी आले. परंतू माणूस फार घाबरे जाहले.’
शहरातील सर्व लोकांनी आपल्या कुटुंबाला खणीवर पाठवण्यास सुरूवात केली. सांगलीचे तत्कालीन कारभारी गेंडरावजी यांनीही सकाळीच आपल्या बायकामाणसांना खणीवर पाठवून दिले होते. 29 जुलैपासून पाऊसाने उघडीप दिली. कृष्णेच्या पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली. त्यावेळच्या नोंदीत म्हटले आहे,‘काल अस्तमानपासून पाऊस राहिला तो आजही नाही. पाणीही चार घटका दिवस पासून उतरत आहे. आज रात्री उजाडेपर्यंत अडीच हात उंची पाणी उतरले. या काळात सांगली दरबारच्या सर्व कचेऱया बंद होत्या.

सन 1856 मध्ये सांगलीत हा महापूर आला. गावात पाणी शिरल्याने तेथे साथीचे आजार पसरू लागले. पटकीची साथ आली. 29 जुलैलाच दोन व्यक्ती पटकीने मरण पावल्या. त्याचा उल्लेख करताना म्हटले आहे, ‘गावात तुटक तुटक पटकीचा उपद्रव होऊन आज पाहटेस रामा वणजारी व दामोदर नाईक परांजपे याचा भाऊ असे वारले. चार पाच प्रहरात वारले’ 
30 जुलै रोजी ‘कृष्णाबाईचे पाणी आज व काल पाच सहा उंचीची उतरले. आणखीही उतरत आहे,’ अशी नोंद आहे. पुढे सन 1861 सालीही सांगलीत महापूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची नोंद आढळते. 23 जून 1864 रोजी ही पाऊस पडून महापूराची स्थिती निर्माण झाली. त्यावेळच्या नोंदीत म्हटले आहे, ‘मृगाचा पाऊस तिसरे प्रहरी चांगला पडला. येकंदर मृग नक्षत्र सालमजकूरी पडले. त्यात सदर दिवशी कवलापूर व कुपवडे वगैरे गावी पाऊस पडून वोतास पाणी मोठे आले होते. ते असे की कृष्णाबाई पात्रामधे दोन हत्तीचे अंगाइतके पाणी पलीकडील दरडीस ओघळत होते. त्यामुळे दरडीस धके लागून दरड घासून गेली.’
सन 1853 आणि सन 1856 च्या सांगलीतील महापूरानंतर सन 1914 साली मोठा महापूर आला. त्यानंतर 1962 आणि 2005 साली पुन्हा महापूराच्या आठवणी ताज्या केल्या. आजही जास्त पाऊस पडून कृष्णेचे पाणी वाढू लागले की, सांगलीकर धास्ती घेतात. परंतू अनेकदा आलेले महापूर सांगलीकर पुन्हा नव्या दमाने उभे राहिलेले इतिहासातील नोंदीवरून दिसतात.

        राजांनी केली कृष्णेची पूजा..

सन 1856 साली आलेल्या महापूरामध्ये कृष्णेचे पाणी गावात आल्यावर तत्कालीन संस्थानाधिपती श्रीमंत धुंडीराव उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांनी आपल्या पत्नीसह कृष्णेच्या पाण्याची पूजा केली. तिला पातळ आणि खण वाहिले. दक्षिणा ठेवली. 29 जुलै 1856 रोजी त्यांच्या दैनंदिनीत ‘पाणी आले म्हणजे असे करावयाचा सांप्रदाय आहे’ असे म्हटले आहे.

©मानसिंगराव कुमठेकर
9405066065

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.