खामगाव-शेगाव मार्गावर अपघातग्रस्त कारमध्ये सापडली ७० लाखांची रोकड

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

खामगाव-शेगाव मार्गावर अपघातग्रस्त कारमध्ये सापडली ७० लाखांची रोकड

LOKSANDESH NEWS 




                     खामगाव-शेगाव मार्गावर अपघातग्रस्त कारमध्ये सापडली ७० लाखांची रोकड 



खामगाव-शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजसमोर ५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजता कार आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यावेळी कारमध्ये ७० लाख ४ हजार ५०० रुपये रोख असलेले दोन पोते आढळले. रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला दिल्याचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणिककुमार लोढा यांनी सांगितले.

शेगाव तालुक्यातील लासुरा येथील सूरज साहेबराव बोदडे (२५) हे दुचाकी क्रमांक एमएच-३४, एपी-४५११ ने खामगावकडे जात होते. सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या कार क्रमांक एमएच-२१, डीएफ-३४४४ ने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. दरम्यान शेगाव ग्रामीण पोलिस अपघातस्थळी दाखल झाले.




 त्यांनी संबंधित कारची झडती घेतली, त्यामध्ये १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली दोन पोते रोख रक्कम आढळून आली. त्याची पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली. त्याचे छायाचित्रणही केल्याचे अपर अधीक्षक लोढा यांनी सांगितले.

 ती रक्कम ७० लाख रुपयांपेक्षाही अधिक आढळली. याप्रकरणी कारचालक भागवत ज्ञानदेव आडेकर, नरेश खंडेराव गाडे, दोघेही रा. जालना यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. २ घटनास्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशासाठी व कुठून नेली जात होती, याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे. अपघातग्रस्त कारमालकाचे ऑनलाईन रेकॉर्ड पाहिले असता मालक म्हणून शरद बागोरिया, जालना असे नाव दाखवले जात आहे. त्या वाहनावर अतिवेगाने चालवल्याचे दोन दंडही प्रलंबित आहेत.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली