धुळे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या येवल्याच्या तरूणाला धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची सध्याच्या बाजारात किंमत २ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई शहरातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली.
सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील चक्करबर्डी परिसरात एक जण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयीतास शिताफिने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव गणेश सुरेशसिंग परदेशी (रा. बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला, जि. नाशिक) असे सांगितले. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला. याबाबत पोहेकॉ रविकिरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश परदेशी याने हा गांजा शिरपूर तालुक्यातील पिरपाणी येथील सुनिल पावरा याच्याकडून खरेदी केल्याची कबुली देत तो गांजा तारगल्ली, येवला येथील विष्णु बडोदे उर्फ पंडोरे याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी यावेळी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली