"कम ऑन किल मी", नाना पाटेकरांच्या चित्रपटातील संवाद म्हणत उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान!*
*Uddhav Thackeray :* शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडी आणि नेत्यांच्या पळवा-पळवीच्या राजकारणावरून भाजपा आणि एकनाथ शिंदे गटावर टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत चाललेल्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी शेठजींचे दिल्लीतील नोकर आणि नोकरांचे नोकर प्रयत्न करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील एका संवादाचा आधार घेत त्यांनी एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान दिले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?...
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना प्रेरित करताना म्हटले, 'मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकू, असे जर कुणाला वाटत असेल तर ते होणार नाही. असे प्रयत्न करणाऱ्या भाजपाचे नामोनिशाण आम्ही महाराष्ट्रातून पुसून टाकू. आज मी तयारीनिशी उभा आहे. तुमची (कार्यकर्ते) तयारी कितपत आहे?'
यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, '१९९२ च्या काळात मुंबईत दंगली उसळल्या होत्या. देशद्रोह्यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. छातीचा कोट करून शिवसैनिकांनी मुंबई वाचवली. तेव्हा एक व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंकडे आली, त्यांनी म्हटले बाळासाहेब आता बस झाले. पुरे झाले. ती व्यक्ती आज हयात आहे. मी त्यांचे नाव सांगणार नाही. त्यावर बाळासाहेबांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील एक डायलॉग ऐकवला होता.'
गद्दारांच्या समोर उभा राहून मी सांगतो,
COME ON KILL ME pic.twitter.com/sucCELq74x
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 19, 2025
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'नाना पाटेकर त्या चित्रपटात गुंडासमोर उभे राहून म्हणतात, 'कम ऑन किल मी'. त्याप्रमाणेच मीही गद्दारांसमोर उभा राहून म्हणतो, 'कम ऑन किल मी'. असेल हिंमत तर या अंगावर. पण अंगावर येणार असाल तर येताना रुग्णवाहिका घेऊन या. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल.'
*मनसेशी युती करण्याचे दिले संकेत*
राज ठाकरेंशी संभाव्य युतीबाबतही उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले. ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत. काय होणार? होणार का? मी म्हणतो होणार की नाही होणार, ते लवकरच सर्वांना कळेल. तुमच्या (कार्यकर्ते) सर्वांच्या जे मनात आहे, राज्याच्या मनात जे आहे, तेच मी करेन."
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.