भाजपा सांगली शहर जिल्ह्यात सांगली मध्य मंडल व सांगली उत्तर मंडला च्या नवीन कार्यकारिण्यांची घोषणा...
*आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप...
*सशक्त संघटना, सक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण*
*सांगली, दि. २५ जुलै २०२५ –*
भाजपाच्या संघटनात्मक बांधणीला चालना देण्यासाठी सांगली शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मध्य मंडल आणि सांगली उत्तर मंडल यांच्या नवीन मंडल कार्यकारिणी ची औपचारिक घोषणा करण्यात आली. या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे प्रदान करण्यात आली.
हा कार्यक्रम संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा होता. कार्यकारिणीमध्ये नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देत अनुभव व युवा जोम यांचा समन्वय साधण्यात आला आहे.
कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते मोहन वाटवे, मध्यमंडळ अध्यक्ष अमित देसाई, सांगली उत्तर मंडळ अध्यक्ष राहुल नवलाई यांच्यासह विविध मंडळांतील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत म्हटले, "भाजपाच्या संघटनाची ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकारिणी ही पक्षाची रचना मजबूत करणारे आधारस्तंभ आहेत. बूथ पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करत त्यांच्या माध्यमातून भाजपाची विचारधारा घराघरात पोहोचवणे हेच खरे काम आहे."
जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, "पक्षाची रचना ही तळागाळातील कार्यकर्त्यांवर आधारित असते. आज जाहीर झालेली कार्यकारिणी ही केवळ नेमणूक नसून, पक्षाच्या विश्वासाचा एक भाग आहे. या कार्यकारिणीतील प्रत्येकाने निष्ठेने व कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडावी."
या कार्यक्रमातून भाजपाच्या सांगली शहर जिल्हा संघटनेच्या भविष्यातील वाटचालीस नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी जयघोष करत नविन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.