*💥एकनाथ खडसेंना अस्मान दाखवण्याचा भाजपने चंग बांधला, 'असे' होऊ शकतात पराभूत...* ---

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

*💥एकनाथ खडसेंना अस्मान दाखवण्याचा भाजपने चंग बांधला, 'असे' होऊ शकतात पराभूत...* ------------
मुंबई : राष्ट्रवादीने जशी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून भाजपने खडसेंना अस्मान दाखविण्याची तयारी सुरु केली आहे. काहीही करून एकनाथ खडसे यांना पराभूत करायचे, असा चंग भाजपने बांधला आहे. त्यासाठी डावपेच आखले आहेत. पक्षातील शीर्षस्थ नेत्यांनी खडसेंना मानणाऱ्या आमदारांना सूचना केल्या आहेत. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत देखील मविआला पराभवाचा धक्का द्यायचा भाजपचा मनसुबा आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी झालेल्या राजकारणामुळे शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचा फडणवीसांचा मानस होता. सगळे डावपेच वापरुन आपल्या चाणाक्ष खेळीच्या बळावर फडणवीसांनी तसा करिश्मा करुनही दाखवला. आता तोच करिश्मा विधान परिषद निवडणुकीत खडसेंना पाडून फडणवीसांना करुन दाखवायचा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यसभा निवडणूक निकालात भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला. आवश्यक संख्याबळ नसतानाही फडणवीसांच्या अचूक नियोजनाने धनंजय महाडिकांच्या कपाळी विजयी टिळा लागला. राज्यसभेनंतर अगदी १० दिवसांनीच विधान परिषद निवडणूक होत असल्याने भाजप एकदम जोशात आहे. त्यात खडसेंना पराभूत करण्याचं आमचं नियोजन आहे, असा मनसुबा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलून दाखवला आहे. खडसेंना पाडण्याचे डावपेच आखले गेले आहेत, फक्त अंमलबजावणी होणे बाकी आहे, असं भाजपमधील एका आमदाराने खासगीत बोलताना सांगितलं. खडसे 'असे' होऊ शकतात पराभूत... विधानसभेतील संख्याबळानुसार उमेदवाराला निवडून येण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आहे. उमेदवारांना विजयी होण्यासाठी हा मतांचा कोटा पूर्ण करावाच लागेल. राष्ट्रवादीकडे ५३ आमदार आहेत. रामराजे नाईक निंबाळकर निवडून गेल्यानंतर २६ मतं शिल्लक राहतात. त्यात हायकोर्टाने तुरुंगात असलेल्या मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारल्याने मविआची २ मते कमी झाली आहेत. म्हणजे मतांचा कोटा देखील कमी होऊन तो २५ इतका असेल. मात्र गुप्त मतदान पद्धती असल्याने राष्ट्रवादीची मतं फुटली तर खडसेंना मोठा धक्का बसेल. त्यात राष्ट्रवादीने निंबाळकरांसाठी एक-दोन मतांनी कोटा वाढविला तर खडसेंना आणखी मतं कमी पडतील. अपक्ष आणि छोट्या पक्षांना भाजपने आपल्या बाजूने घेऊन दहाव्या जागेसाठी प्रसाद लाड यांच्यासाठी मतं खेचल्यास काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यासह खडसेंनाही धक्का बसेल. खडसेंनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आणि राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातावर बांधल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतही दिलं. पण राज्यपालांनी त्या यादीचा निकाल अद्यापही लावला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आता खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली. सध्याच्या घडीला फडणवीसांचे कट्टर राजकीय शत्रू खडसेंना पराभूत करण्यासाठी भाजपची फळी शक्त ते प्रयत्न करेल तर खडसेंना निवडून आणून फडणवीसांना शह देण्याचा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रयत्न करतील. महाविकास आघाडी चुकीतून काही शिकणार? विधान परिषद निवडणुकीतही आपले सर्व उमेदवार निवडून आणू, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. विधानपरिषद निवडणुकीचा पॅटर्नही राज्यसभेप्रमाणेच आहे. या निवडणुकीतही पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या आधारे उमेदवारांची निवड होते. तसेच हे मतदान गुप्त पद्धतीने होते. राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या खेळात आपला हातखंडा असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी राज्यसभेप्रमाणेच अचूक नियोजन करून विधानपरिषदेच्या पाचही जागांवर चमत्कार करुन विजय खेचून आणला तर ती महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी नामुष्की ठरेल. त्यामुळे आता महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधानपरिषदेत सुधारणार का, हे पाहावे लागेल.

Loksandesh News Media Pvt. Ltd. Mumbai.