Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली सिव्हिलसाठी २३३.३४ कोटींच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता.

सांगली सिव्हिलसाठी २३३.३४ कोटींच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता.


SANGLI 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी.

५०० खाटांची सोय, सुसज्ज चार मजली इमारत, निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आणि अद्यावत शवागार होणार...

                    पृथ्वीराज पाटील यांची माहिती


सांगली  येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार (सांगली सिव्हिल ) रुग्णालयाच्या ५०० खाटांची सुविधा असलेल्या चार मजली सुसज्ज इमारतीसाठी तसेच निवासी डॉक्टरांसाठी तीन मजल्यांचे वसतिगृह आणि अद्ययावत शवागार बांधण्यासाठी २३३.३४ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलची सध्याची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे, तसेच आहे त्या, यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. खाटांच्या अपुऱ्या संख्येमुळे गोरगरीब रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत असल्याचे देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून आपण निदर्शनास आणून दिले होते. या हॉस्पिटलच्या ठिकाणी नव्याने ५०० खाटांची सोय असलेली अध्यावत चार मजली इमारत उभी करण्यात यावी, त्याचबरोबर निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत आणि अध्यावत शवागाराची गरजही पूर्ण करावी अशी मागणी मंत्री देशमुख यांची २१ ऑक्टोबर २०२० रोजी प्रत्यक्ष भेट घेतली होती, आणि सिव्हिल हॉस्पिटलमधल्या अडचणी सविस्तरपणे मांडलेल्या होत्या.


    पश्चिम महाराष्ट्रासाठी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील रुग्णही मोठ्या संख्येने येतात. कोरोना काळात तर या हॉस्पिटलवर खूप मोठा ताण पडला. यंत्रणा अपुरी पडू लागली, त्यामुळेच या हॉस्पिटलचे अध्यावतीकरण झाले पाहिजे, त्यासाठी संबंधित विभागाची बैठक लावण्यात यावी अशी मागणी केली होती.

ते म्हणाले, या भेटीनंतर ना. देशमुख यांनी  २३ नोव्हेंबर २०२१ रोजी एक तातडीची बैठक घेतली. बैठकीला मी स्वतः, तसेच वैद्यकीय शिक्षण सचिव, मिरज मेडिकल कॉलेजचे डीन आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

     त्यावेळी त्यांनी नव्या हॉस्पिटलसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मी स्वतः तसेच हॉस्पिटलचे अधिष्ठाता, मिरजेच्या मेडिकल कॉलेजचे डीन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांनी चर्चा करून प्रस्ताव तयार केला आणि तो त्यांच्याकडे पाठवला. ते म्हणाले, हा प्रस्ताव पाठवल्यानंतर मंत्री महोदयांनी आणखी एक बैठक घेतली. त्यावेळी प्रस्तावात काही सुधारणा सुचवण्यात आल्या. त्यातील त्रुटी दूर करून परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आला. नंतर तो मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला आणि त्यासाठीच्या खर्चाला तत्वतः मंजुरी मिळाली.

पाटील म्हणाले, या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांनी गेले चार महिने मंत्री  देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

 त्यामुळेच या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. आता लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सध्याच्या हॉस्पिटल जवळ असलेल्या मोकळ्या जागेत नव्या सिव्हिल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होईल आणि अध्यावत इमारत उभी राहील. साधारणपणे ५२ हजार, ६७३ स्क्वेअर मीटरचे बांधकाम होणार आहे. या हॉस्पिटलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांची, तसेच कर्नाटकातील रुग्णांचीही मोठी सोय होणार आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली