रत्नागिरी : एसटीच्या महाकार्गोमधून अवैध लाकूड वाहतूक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रत्नागिरी : एसटीच्या महाकार्गोमधून अवैध लाकूड वाहतूक



RATNAGIRI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी देवरुख,

रत्नागिरी : एसटीच्या महाकार्गोमधून अवैध लाकूड वाहतूक


देवरुख : एसटीच्या मालवाहतूक महाकार्गोमधून कापलेल्या लाकडाचे ४०० घनफूट लाकडाच्या ओंडक्यांची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचा प्रकार शनिवारी (ता. २) उघडकीस आला. याप्रकरणी गाडीचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, वनविभागाकडून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. 



अधिक माहिती अशी की,
आटपाडी  (जि. सांगली) एस.टी. डेपोच्या माल वाहतूक गाडी (एमएच १४, बीटी ०६२६) मधून
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील साखरपा तपासणी नाका येथे देवरुख वनविभागाच्या नाकाबंदी वेळी  येणाऱ्या एसटीच्या कार्गो मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता या गाडीत विनापरवाना ४०० घनफूट लाकूड आढळून आल्याची  माहिती वनखात्याने दिली.



आटपाडी (जि. सांगली) एस.टी.डेपोच्या माल वाहतूक गाडीमधून (एमएच १४, बीटी ०६२६) इंजायली जातीचा कापलेल्या लाकडाचे ओंडके नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास साखरपा येथील नाक्यावर तपासणी सुरू केली. यावेळी साखरपा नाक्यावर नियुक्त वनरक्षक सूरज तेली यांनी एसटीची महाकार्गो बस तपासणीसाठी थांबवली. यामध्ये कापलेले लाकडाचे ओंडके आढळले. गाडीचे चालक इराण्णा सतीश इंडे (वय ३४) यांच्याकडे वन विभागाचा वाहतूक परवाना आहे का, याबाबत चौकशी केली; परंतु त्यांच्याकडे संबंधित परवाना नव्हता. याप्रकरणी चौकशीसाठी संशयित चालकासह मालवाहतूक एस.टी. गाडी ताब्यात घेण्यात आली. चालकाविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. ही महाकार्गो बस तुळसणी (ता. संगमेश्वर) येथून हे लाकूड घेऊन जात होती.

 हे लाकूड तुळसणी येथील मुकादम मिल येथून गोकुळ शिरगाव येथे जाणार होते. हा माल मुकेश पटेल (रा. सरुड, ता. शाहूवाडी, कोल्हापूर) यांच्या मालकीचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे आता यामागे असलेल्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुरज तेली, नानू गावडे, सागर गोसावी, संजय रणधीर यांनी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख वनपाल तौफिक मुल्ला करत आहेत.

वनविभागाचे जनतेस आवाहन ....
वनविभागाने तमाम जनतेस आव्हान केले आहे की अशी कोठे विनापरवाना लाकूड वाहतूक होत असेल, आपल्याकडे माहिती असेल तर वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर किंवा नजीकच्या वन विभागाच्या कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन वनविभागातर्फे रत्नागिरीचे प्रादेशिक वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी केले आहे. 

अनेक गाड्या जातात विना तपास ?

 कर्तव्यदक्ष वनविभागाने केलेली कारवाई कौतुकास्पद असली तरी मुर्शी चेक नाक्यावरून अनेक विना पास गाड्या लाकूड वाहतूक करतात. शेतातील एखादे लाकडाचे ओंडके शेतकरी घरी घेऊन जात असताना हजारो प्रश्न उभे करणाऱ्या विभागाने या सरकारी खात्यावर कधी व काय कारवाई करणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे
 
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.