अन्यायावर दाद मागण्यासाठी ग्राहकाने स्वत: जागृत असणे आवश्यक : एडवोकेट वर्षा शिंदे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अन्यायावर दाद मागण्यासाठी ग्राहकाने स्वत: जागृत असणे आवश्यक : एडवोकेट वर्षा शिंदे




अन्यायावर दाद मागण्यासाठी  ग्राहकाने  स्वत: जागृत असणे आवश्यक : एडवोकेट वर्षा शिंदे

            सांगली  दि. 24 :  ग्राहकाने आपल्यावर जर अन्याय झाला असेल  तर वेळेत  दाद मागण्यासाठी  आणि न्याय मिळण्यासाठी स्वत: जागृत होणे गरजेचे असल्याचे मत ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या माजी सदस्या ॲड. वर्षा शिंदे यांनी केले.

     

      राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात ग्राहक आयोगातील प्रकरणांचा प्रभावीपणे निपटारा या विषयावर आयोजित कार्यशाळेत ॲड. वर्षा शिंदे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा ग्राहक मंच प्रबंधक नागेश कुनाळे, ॲड. मुक्ता दुबे, ॲड. भारती सोळवंडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


            ॲड. वर्षा शिंदे म्हणाल्या,  ग्राहकाला आपल्या अधिकाराची माहिती असणे, व फसवणूक झाल्यास त्याची दाद कशी मागणे व त्याला आवश्यक असणारे पुरावे काय आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे.   तक्रार निवारण आयोगाकडे हस्तलिखीत तक्रारही दाखल करू शकतो. तक्रार दाखल करताना विलंब टाळण्यासाठी त्यासोबत पुरावे जोडावेत. जलदगतीने निपटारा होण्यासाठी येणारे अडथळे आपणच दूर करायला हवेत. न्याय मिळण्यासाठी विलंब होवू नये यासाठी आपण सजग असणे आवश्यक आहे. तडजोडीनेही तक्रारींचा निपटारा करता येवू शकतो. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या न्याय निर्णयावर निकाल लागल्यापासून 30 दिवसाच्या आत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपिल करू शकतो. आयोगाच्या आदेशाचे पालन विहीत वेळेत न केल्यास संबंधितावर आयोगामध्ये फौजदारी दाखल करू शकतो तसेच शिक्षा व दंडाची तरतूदही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            जिल्हा ग्राहक मंच प्रबंधक नागेश कुनाळे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रारी दाखल करण्याची पध्दती, निकालाची अंमलबजावणी व स्वरूप या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना ऑनलाईन वस्तू खरेदीत जरी फसवणूक झाली तरीही तक्रार दाखल करता येईल असे सांगितले.

            ॲड. मुक्ता दुबे यांनी ग्राहक व विमा संरक्षण, तक्रारी व उपाय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना विम्याचे विविध प्रकार या विषयक माहिती सांगून अटी व शर्ती वाचूनच विमा घ्यावा, असे सांगितले. तसेच शेतकरी अपघात विमा प्रकरणे, कृषी बियाणे खरेदीवेळी फसवणूक, ऑनलाईन खरेदी संबंधातील फसवणूक, विमा संबंधी प्रकरणे, फसवणूक, वैद्यकीय उपचारादरम्यान झालेला निष्काळजीपणा, बँक, पतसंस्था, सहकारी संस्था, बचत गट, विज पुरवठा व वीज बिल आदिंबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करता येते. 5 लाखांच्या आतील दाव्यांकरीता कोणतेही शुल्क नसल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

            ॲड. भारती सोळवंडे यांनी ग्राहक संरक्षण परिषद संरचना व कार्यपध्दती, सुधारित तरतुदी व फायदे या विषयक सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार सुरक्षितता, माहिती जाणण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार, मत मांडण्याचा अधिकार, उपाययोजना करण्याचा हक्क,  ग्राहक शिक्षण, मुलभूत गरजा, निरोगी वातावरण असे अधिकारी प्राप्त झाल्याचे सांगितले. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरही जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार नोंदवू शकतो, असे सांगितले.

            वैध मापन शास्त्र अधिकारी बी. पी. पवार यांनी वैध मापन शास्त्र यंत्रणे विषयी सविस्तर माहिती देवून वस्तू खरेदी करताना काळजी घ्यावी तसेच फसवणूक होत असल्यास तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच प्रत्येकाने प्रमाणित केलेले वजन काटे वापरावे. अप्रमाणित वजन काटे वापरण्यास प्रतिबंध असून असे अप्रमाणित वजन काटे वापरल्यास कायद्याने दंडाची व शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचा हेतू विशद करून ग्राहकांचे प्रबोधन व्हावे यासाठी दरवर्षी ग्राहक दिन साजरा केला जातो असे सांगितले. तसेच फसवणूक होवू नये यासाठी कायद्याची माहिती सर्वांना असणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यशाळेच्या माध्यमातून ग्राहकांना सशक्त बनविण्यासाठी मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सूत्रसंचालन अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा अध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी यांनी केले. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे भास्कर मोहिते तसेच समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य, स्वस्त धान्य दुकानदार, विविध कार्यालयांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.