पुलवामाबाबतच्या खुलाशानंतर शहिदांच्या कुटुंबियांच्या तीव्र प्रतिक्रिया; केली 'ही' मोठी मागणी...
नवी दिल्ली : पुलवामात शहीद झालेल्या ४० जवानांच्या घटनेबाबत जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतेच अनेक खळबळजनक खुलासे केले होते. एका मुलाखतीत हे खुलासे करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता या हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांनी याबात मोठी मागणी केली आहे.*
द वायरच्या वृत्तानुसार, पुलवामात शहीद झालेल्या सीआरपीएफचा जवान भागीरथ यांच्या वडिलांनी सांगितलं की, २०१९ मधील या घटनेपासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मलिकांच्या खुलाशानंतर आपल्या शंकेला पुष्टी मिळाली आहे. हा सरकारद्वारे रचला गेलेला राजकीय स्टंट होता असंही त्यांनी म्हटलं आहे. मला शंभर टक्के खात्री आहे की हा हल्ला सत्तेत कायम राहण्यासाठीच केला गेला. २०० किलो आरडीएक्स जवानांची बस उडवते त्यावेळी पंतप्रधान काय करत होते? ते झोपले होते का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे.
तसेच आणखी एक शहीद जीतराम यांचा भाऊ विक्रम यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. विक्रम यांनी सांगितलं की त्यांचं कुटुंब अजूनही त्यांच्या भावाच्या दुःखात आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली आहे केवळ त्यांनाच माहिती आहे की हे दुःख काय असतं. पण विक्रम यांनी हा मुद्दाही मांडला की मलिक यांनी त्याचवेळी हे का सांगितलं नाही.
सरकारच्या अकार्यक्षमतेमुळं जवानांचा मृत्यूशहीद रोहिताशच्या कुटुंबियांनी देखील सरकारच्या अकार्यक्षमतेमुळं आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानं आपल्याला आता इतर जवानांची काळजी वाटतेय असं म्हटलं आहे. शहीद जवानाचा भाऊ जितेंद्रनं म्हटलं की, गृहमंत्रालयानं विमानाची मागणी फेटाळायला नको होती, त्यांची मागणी पूर्ण करणं हे सरकारचं काम आहे. मलिकांबाबत बोलताना जितेंद्र म्हणाले की, ते कोणालाही घाबरत नाहीत त्यांनी जे सांगितलं ते खरंच असेल असं मला वाटतं.
दरम्यान, दि टेलीग्राफनं देखील पुलवामा हल्ल्यातील काही शहीदांच्या कुटुंबियांशी बातचित केली. यामध्ये बंगालचे शहीद जवान सुदीप विश्वास आणि बबलू संतरा यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. सुदीप यांचे वडील सन्यासी विश्वास यांनी म्हटलं की, या चार वर्षात मी सुरक्षा व्यवस्थेतील चुकांबाबत अनेकदा ऐकलं आहे. पण आत्तापर्यंत ठोसपणे काहीही समोर आलं नव्हतं. आमचा मुलगा २८ व्या वर्षी शहीद झाला. सुदीपची बहिण झुंपा यांनी म्हटलं की, केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी. पण आमच्यासाठी हे महत्वाचं आहे.
शहीद जवान बबलू यांच्या ७१ वर्षीय आई बोनोमाला संतरा आणि त्यांच्या पत्नी मीता यांनी सांगितलं की, आम्हाला खरं जाणून घ्यायचं आहे. पण यामुळं काहीही बदलणार नाही. मोठ्या बर्फवृष्टीमुळं सैन्याची वाहतूक ठप्प झाली होती, हा निर्णय माझ्यासाठी गुपितच बनला आहे, असं मीता यांनी म्हटलं आहे. माजी लष्कर प्रमुखानं उपस्थित केले प्रश्नविशेष म्हणजे, मलिक यांच्या खुलाशानंतर माजी लष्करप्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी यांनी पण जवानांच्या मृत्यूला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोषी मानलं आहे. तसेच टेलिग्राफशी बोलताना म्हटलं की, पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या दोघांनीही आपल्या गुप्तचर यंत्रणांची जबाबदारी घ्यायला हवी ज्यामुळं ही घटना झाली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली