आज कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांची ६४ वी पुण्यतिथी. त्यांच्या अमर स्मृतीस विनम्र अभिवादन ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आज कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांची ६४ वी पुण्यतिथी. त्यांच्या अमर स्मृतीस विनम्र अभिवादन ...




कर्मवीर भाऊराव पाटील..महाराष्ट्राचे नशीब घडवलेला शिल्पकार..! सेवाभावी जैन संस्कारांची बहुजनांना लाभलेली सर्वोत्तम भेट..!!
--प्रा. एन. डी. बिरनाळे
महामंत्री, दक्षिण भारत जैन सभा.
=========


आज कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांची ६४ वी 
 पुण्यतिथी. त्यांच्या अमर स्मृतीस विनम्र अभिवादन 

कर्मवीर अण्णांचे आजोबा स्व. देवगोंडा पाटील हे नांदणी मठाचे कारभारी होते.. जैन समाजातील न्यायनिवाडा करुन समेटावर सही करण्याचा प्रसंग आल्यानंतर त्यांना निरक्षर असल्याचे मनाला लागले.. तडक घरी येऊन पायगोंडाची (कर्मवीर अण्णांचे वडील) शेती बंद करुन आष्टयाला शाळेत घातले..


 पायगोंडा त्या काळातील व्हर्नाक्युलर सातवी पास होऊन महसूल खात्यात नोकरीला लागले.. वडिलांची बदली विट्यात झाली.. अण्णांची मराठी पाचवी पूर्ण झाली.. शेजारी अबकारी इन्स्पेक्टर जहांगीर रस्तुमजी ठाणावाला होते.. त्यांना मूलबाळ नव्हते.. भाऊरावांचा त्यांना खूप लळा लागला होता.. त्यांनी सूचना केली भाऊरावांचा इंग्रजी शाळेत घाला. १९०२ मध्ये भाऊराव राजाराम हायस्कूल मध्ये दाखल झाले. १९०५ मध्ये जैन बोर्डिंग सुरू झाले. याच बोर्डिंग मध्ये विद्यार्थी म्हणून असताना अण्णांना सामाजिक आणि शैक्षणिक कामाची प्रेरणा मिळाल्याचे दक्षिण भारत जैन सभेच्या सा. प्रगतीच्या १९०८ च्या अंकात संपादकीय टिप्पणीत नमूद आहे .. बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांना धान्यफंड व द्रव्यफंड जमवण्यासाठी पाठविण्याचा ठराव झाला, त्याप्रमाणे श्री जंबू मारुती करंडे वाटेगावकर आणि श्री. भाऊ पायगोंडा पाटील ऐतवडेकर यांनी दिपावलीच्या सुट्टीत मौजे वाटेगाव, वाळवे, बुर्ली, आष्टे, डिग्रज,ऐतवडे या भागात प्रवास करुन सार्वजनिक सभा घेऊन लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले होते.. या कामातून त्यांच्यात नेतृत्व विकसित झाले.. स्व.दिवाणबहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांना त्यांनी गुरू मानले होते.१९४४ साली सांगली येथे भरलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या ४१ व्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. दक्षिण भारत जैन सभा व प.पू.गुरुदेव समंतभद्र महाराजांनी निर्माण केलेल्या सर्व शिक्षण संस्था यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.

भाऊराव हे बाळासाहेब खानविलकर यांच्या ओळखीने छ. शाहू महाराजांच्या राजवाड्यात विद्यार्थी विभागात राहत होते त्यावेळी त्यांच्या मनावर छ. शाहू महाराजांचे कार्य आणि सत्यशोधक समाज चळवळीचा पगडा बसला.. १९१० मध्ये कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भ. गोमटेश महामस्तकाभिषेक सोहळ्यात भाऊरावांनी स्वयंसेवक विभागाचे नेतृत्व केले होते.. त्यावेळी ते फक्त २३ वर्षाचे होते.. विशालकाय ५७ फूटी भ. गोमटेश मूर्तीसमोर '' या भव्य दिव्य मूर्तीसारखेच विशाल कामगिरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही '' अशी प्रतिज्ञा भाऊरावांनी केली होती. आणि रयत उभी करून ती पूर्णही केली.. शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक स्व.डाॅ.विलास संगवे यांनी त्यांच्या.. 'जैन संस्कृती :परंपरा व प्रभाव' या ग्रंथात कर्मवीर भाऊराव पाटील ही दक्षिण भारत जैन सभेने महाराष्ट्राला दिलेली अमोल देणगी आहे असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.दुधगाव येथे वसतिगृहाच्या कामात कुदळे, आडमुठे, हेरवाडे, वाडकर, कोले, जैन पाटील इ. जैन समाजातील लोकांनी खूप मोठी मदत केली.. जैन बोर्डिंग साठी द्रव्यफंड गोळा करण्यापासून सुरु झालेला अण्णांचा सार्वजनिक जीवनातला  बाहुबली ब्रम्हचर्याश्रम.. श्रवणबेळगोळ.. दुधगाव मार्गे कराड तालुक्यातील काले येथे सत्यशोधक परिषदेत १९१९ मध्ये 'रयत शिक्षण संस्थेच्या स्थापणेपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर असा होता.. छ. शाहू महाराजांच्या कार्याचे जीवंत स्मारक म्हणजे' रयत शिक्षण संस्था 'असा गौरवपूर्ण उल्लेख अण्णा करतात. रयत शिक्षण संस्था स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्र म्हणावा तसा प्रगत नव्हता..छ. शिवाजी महाराज हे अण्णांचे आदर्श.. महाराज जनतेला' रयत' म्हणून संबोधत.. म्हणून अण्णांनी संस्थेला रयत हे नाव दिले.राजमाता जिजाऊ, म. जोतिबा फुले, क्रांतीमाता सावित्रीबाई फुले, छ. शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, छ. शाहू महाराज, म.गांधी यांच्या कार्याचा दूरगामी परिणाम व प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्यावर होता... बहुजन समाजातील दारिद्र्यात खितपत पडलेल्या मुलांना एकाच ठिकाणी ठेवून कमवा व शिका योजनेतून त्यांना शिक्षण देऊन स्वावलंबी व स्वाभिमानी बनविले.. म्हणून महाराष्ट्रातील बहुजन समाजातील मुलानी बंगले बांधले, गाड्या घेतल्या, बॅंकेत लाखो रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या.. मुलाबाळांना डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, उद्योगपती, आमदार, खासदार, मंत्री, कुलगुरू केले.. सामान्य माणूस प्रतिष्ठित झाला.. त्याला संविधानाचे लाभ मिळाले.. कर्मवीर भाऊराव पाटील हे इतके पराक्रमी होते जर त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला असता तर त्यांनी गडगंज संपत्ती मिळवली असती.. जहागिरदार झाले असते.. ज्याप्रमाणे बहुजन हितार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायाधीशांची नोकरी नाकारली त्याप्रमाणे भाऊरावांनी कूपर, किर्लोस्कर यांच्या नोकर्‍या सोडल्या..  रयत माऊली लक्ष्मीबाई यांनी बहुजन समाजातील लेकरांचे शिक्षण उत्कृष्ठपणे व्हावे यासाठी मंगळसूत्रासह ८० तोळे सोने मोडून संस्थेसाठी पैसा खर्च केला कारण त्यांना छ. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे सुराज्य करायचे होते.. त्यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण कार्य पुढे न्यायचे होते.. आज महाराष्ट्रातील पूज्य बापूजी साळुंखे यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि अण्णांची रयत शिक्षण संस्था ही दोन महाराष्ट्राची फुप्पुसे आहेत.. या संस्थांच्या जडणघडणीत बापूजी आणि अण्णांनी व आजी माजी गुरुदेव कार्यकर्ते आणि रयत सेवकांनी जो त्याग केला आहे तो अजोड आहे. या दोन्ही शिक्षण संस्थांच्या शाखा या सर्व महाराष्ट्राच्या रक्तवाहिन्या आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य सांभाळण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना अण्णांच्या सान्निध्यात गुरुकुलात शिकतोय.. घडतोय असे वाटावे व शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांचा सन्मान व हक्क अबाधित ठेवण्याची व्यवस्था मजबूत करताना ना कोणाची अडवणूक, ना कोणाची पिळवणूक, ना कोणाचे शोषण इथे महाराष्ट्रात सर्वांचाच सन्मान ही सद्भावना बळकट व्हावी. आणि हेच खरे अण्णांना अभिवादन ठरेल..

अण्णांच्या या स्मृतीदिनी आपण मनाशी पक्कं ठरवू या.. या महाराष्ट्रात विशेषकरून शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचे, चारित्र्याचे, शैक्षणिक मूल्यांचे अवमूल्यन होऊ नये.आदर्शांची तोडफोड होऊ नये., शिक्षण व्यवस्था ही ऐदी, ऐतखाऊ, व्यसनी व वाममार्गी लोकांच्या हाती जाऊ नये याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी.. कर्मवीर की जय म्हणणे.. हे फार सोपं आहे.. कर्मवीर जगणं अवघड आहे याची जाणीव आता आपल्याला कोरोनासारख्या अनपढ विषाणूने करुन दिलीच आहे.. अण्णांच्या कार्यात धर्माचा, जातीचा, पातीचा, पंथाचा अडसर कधीच नव्हता.. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एकाचवेळी राजमाता जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा फुले,क्रांतीमाता सावित्रीबाई फुले,महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणी अहिल्याबाई होळकर, अण्णासाहेब लठ्ठे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व संत यांच्या विचारांचे नियतीने बहुजन हितासाठी कौशल्यपूर्ण व बेमालूमपणे केलेले मिश्रण होय. अण्णांनी समता व राष्ट्रीय एकात्मता जीवापाड जपली. आपल्या देशातील युवावर्गाला घाम गाळून पोट भरा, कोणाच्याही पोटावर मारू नका, लोकांची घरे उभी करा हा संदेश त्यांनी दिला. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई यांना त्रिवार मुजरा......

प्रा.एन.डी. बिरनाळे
महामंत्री, 
दक्षिण भारत जैन सभा 
८८८८४७५५५२
९मे,  २०२३
(कॉपीराइट सुरक्षित आहे)

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली