मिरजेसाठी स्वतंत्र अतिक्रमण हटाव अधिकारी नेमा...
अतिक्रमणामुळे शहराला बकाल स्वरूप...
अन्यथा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा..
लोकसंदेश मिरज प्रतिनिधी: इरफान बारगीर
मिरज शहरातील प्रमुख चौकात विनापरवाना हातगाड्यांचा सुळसुळाट, विनापरवाना डिजिटल फलक, शहरातील गायब झालेले फुटपाथ, बेकायदेशीर लोणी बाजार याबाबत अतिक्रमण हटाव पथक गंधाराच्या भूमिकेत आहे. शहरासाठी स्वतंत्र सक्षम अतिक्रमण हटाव पथक अधिकारी नेमण्याची मागणी मिरज सुधार समितीने महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास महापालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा सुधार समितीने दिला आहे.
शनिवारी आयुक्त सुनिल पवार हे मिरज विभागीय कार्यालयात आले असता मिरज सुधार समितीचे अध्यक्ष असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जहीर मुजावर, सौ. गीतांजली पाटील, राकेश तामगावे, सलीम खतीब, राजेंद्र झेंडे, श्रीकांत महाजन, वसीम सय्यद आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातील सर्वच रस्त्याचे फुटपाथ गायब आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यावरून जावे लागत असल्याने अपघात घडत आहेत. गांधी चौक, भाऊराव पाटील चौक, दत्त चौक, शास्त्री चौक, जवाहर चौकासह सर्वच ठिकाणी बेकायदेशीर हातगाड्या मुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विनापरवाना डिजिटल फलकामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. काही ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याबाबत आयुक्तांचे स्पष्ट लेखी आदेश असताना सुध्दा सद्याचे अतिक्रमण हटाव पथक निष्क्रिय ठरले आहेत. म्हणून शहराला पूर्ण वेळ स्वतंत्र सक्षम अतिक्रमण हटाव पथक अधिकारी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. अन्यथा पुन्हा मिरज महापालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही सुधार समितीने दिला आहे. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होत्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.