लोकसंदेश न्यूज नेटवर्क
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवा नाहीतर बोर्ड परीक्षेला इमारत व मनुष्यबळ देणार नाही..
-------रावसाहेब पाटील खजिनदार
सांगली दि.१८: कंत्राटीकरण, खासगीकरण, शाळा बंद धोरण, समूह शाळा, पवित्र पोर्टलचे अपयश, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती नाही अशा अनेक प्रश्नामुळे शिक्षण क्षेत्रात सावळा गोंधळ उडाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने तातडीने महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाशी चर्चा केली पाहिजे. अन्यथा महामंडळ अध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार फेब्रुवारी /मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेला इमारती व मनुष्यबळ देणार नाही असा निर्णय घेण्यात येईल असा इशारा महामंडळ खजिनदार रावसाहेब पाटील अण्णा यांनी दिला. माजी केंद्रीय मंत्री व महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे येथील श्री. खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी येथे झालेल्या महामंडळ पदाधिकारी व विभागीय पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील शाळांना वीज व पाणी बिल आकारणी घरगुती दराने करणे, शाळा महाविद्यालयांच्या इमारतीवरील कर राज्यातील सर्वच जिल्ह्य़ात माफ होण्यासाठी सुसूत्रता आणणे, अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक भरतीला दिलेली घटनाबाह्य स्थगिती उठवणै.. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयाकडे रिक्त असलेली सहायक प्राध्यापकाची पदे तातडीने भरण्यासाठी विद्यापीठे व शिक्षण संस्थांना आदेश देणे इ. ठराव रावसाहेब पाटील यांनी मांडले व ते एकमताने मंजूर करण्यात आले. हे सर्व प्रश्न महाराष्ट्राचे शिक्षण उध्वस्त करुन बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडवणारे आहेत. खा. सुप्रियाताई सुळे यांच्याशी चर्चा करून इमारत व मनुष्यबळ न देणेबाबत परीक्षा आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असे विजय नवल पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी इमारत व मनुष्यबळ देणार नाही असे जाहीर करताच शासनाने प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले परंतु ते पाळले नाही. यावेळी मात्र राज्यभर शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांत असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून निर्णय घ्यावेत असेही रावसाहेब पाटील म्हणाले.
यावेळी चर्चेत कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे सांगली,सरकार्यवाह रविंद्र फडणवीस नागपूर,उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी व पुणे विभागाचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर, नाशिक विभागीय अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व सेक्रेटरी निंबा नांद्रे, नागपूर विभाग कार्यवाह किशोर मासूरकर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली