तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणत हॉटेल मालकाने स्वतःच्या पोटात चाकू मारून आत्महत्येचा केला प्रयत्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणत हॉटेल मालकाने स्वतःच्या पोटात चाकू मारून आत्महत्येचा केला प्रयत्न



ओंकार पोतदार - वाई प्रतिनिधी

तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणत हॉटेल मालकाने स्वतःच्या पोटात चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. थकीत कर्ज प्रकरणी पतसंस्थेने कायदेशीर प्रक्रिया करत स्थावर मालमत्तेचा ताबा घेताना हा प्रकार घडला.
याप्रकरणी हॉटेल मालक उदय विनायक गोलांडे (वय ४९, रा. शिरवळ ता. खंडाळा) याच्याविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर गोलांडे यांच्या पत्नी चक्कर येऊन पडल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. याबाबत अधिक माहिती अशी की, उदय गोलांडे यांनी शिरवळ येथील सदगुरू हरीबुवा महाराज नागरी सहकारी संस्थेतून सन २०१९ मध्ये हॉटेल गुरुकृपा व राहते घर असलेली स्थावर मालमत्ता तारण ठेऊन २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज थकीत गेल्याने पतसंस्थेने कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सातारा जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्तात गोलांडे यांच्यामिळकतीचे कब्जा प्रक्रिया सुरू केली. यावेळी गोलांडे यांनी तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणून हॉटेलमधील चाकू घेत स्वतःच्या पोटात मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे व उपस्थितांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. वसुली अधिकारी सम्राट भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस ठाण्यात उदय गोलांडे विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे अधिक तपास करीत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.