दक्षिण भारत जैन सभेतर्फे स्व. रावसाहेब दादांना श्रध्दांजली...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दक्षिण भारत जैन सभेतर्फे स्व. रावसाहेब दादांना श्रध्दांजली...लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

दक्षिण भारत जैन सभेतर्फे स्व. रावसाहेब दादांना श्रध्दांजली...

सांगली : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा) यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दक्षिण भारत जैन सभेला पर्यायाने जैन समाजाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली.  दादांनी समाजाला दाखवलेली दिशा आणि त्यांच्या विचारावर आपण मार्गक्रमण करून  समाजाची प्रतिष्ठा अबाधित राखणे, समाजासाठी त्यांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन द.भा.जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. 
दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने  शेठ रा.ध.दावडा दि.जैन बोर्डिंगमध्ये आयोजित केलेल्या श्रध्दांजली सभेत अनेक मान्यवरांनी स्व.रावसाहेब दादांविषयीच्या आठवणीनीतून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. 
यावेळी ते पुढे म्हणाले, दादांचे अकाली निधन हा जैन समाजासाठी मोठा मानसिक धक्का आहे. प्रत्येकाला दादा आापले वाटायचे. सामाजिक हिताच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिले.  एक सर्वमान्य आदर्श समाजनेता कसा असावा हे दादांनी आपल्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. 
सुरूवातीला दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी यांच्याहस्ते स्व. रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन व एकवेळ  णमोकार महामंत्राचे पठण झाले. दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी प्रास्ताविक आणि समारोपामध्ये  दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने  द.भा.जैन सभा परिवारावर व समाजासाठी दिलेल्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त करून त्यांना श्रध्दांजली वाहिली. 
चेअरमन रावसाहेब जि.पाटील म्हणाले, दादांनी परिणामांची चिंता न करता समाजहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. स्तवनिधी व हुबळी बोर्डिंगचा प्रश्न, शिष्यवृत्ती निधीमधील वाढ, सभा व शाखांचे आर्थिक स्थैर्य, सांगलीतील द.भा.जैन सभेचे ऐतिहासिक शताद्बी त्रैवार्षिक अधिवेशन हे त्यांच्यामुळेच शक्य झाले. त्यांच्यातील प्रचंड ऊर्जेने प्रत्येकजन प्रेरित होत असे. दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. 
व्हा.चेअरमन दत्ता डोर्ले म्हणाले,  महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन समाजाला एकसंघ ठेवणारा  दुवा म्हणजे दादा होते. ते कर्नाटकाचा अभिमान होते. हुबळी बोर्डिंगच्या आजच्या वैभवामागे दादांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. सभा ही काही लोकांची न राहता ती सर्वांची  असल्याचे दादांनी कृतीतून दाखवून दिले. 
खजिनदार संजय शेटे म्हणाले,, सभेला दादांच्या रूपाने एक कणखर नेतृत्व लाभले. दादा पुढील दहा वर्षाचे नियोजन करीत आणि त्यासाठी ठोस पावले उचलत. 
सहखजिनदार अरविंद मजलेकर म्हणाले, 36 वर्षापूर्वी वीराचार्यांच्या आकस्मात जाण्याने समाज सैरभैर झाला होता त्यानंतर तीच परिस्थिती दादांच्या जाण्याने आम्हाला जाणवते आहे. लहान-थोर सर्वांना एक हवहवंस व्यक्तिमत्व  होते. समाजातल्या सर्व प्रश्नांची जाण दादांना होती.
ॲड. विजयकुमार सकळे म्हणाले, समाजाची आन,बान आणि शान म्हणून दादा आपल्या कृतीतून व निर्णयातून दाखवून दिले. ते फक्त जैनांचे नव्हते तर बहुजनांशीही त्यांची घट्ट नाळ जोडली गेली होती. 
गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेच्यावतीने पृथ्वीराज पाटील (बाबा) यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्यासह महामंत्री दादासाहेब पाटील-चिंचवाडकर, एक्झि.ट्रस्टी राजेंद्र झेले, महिला महामंत्री सौ. कमल मिणचे, पदवीधर संघटनेचे चेअरमन प्रा.ए.ए.मुडलगी, सेक्रेटरी प्रा.आप्पासोा मासुले, वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील, इचलकरंजी बोर्डिंगचे सेक्रेटरी बी.बी.हुपरे, ॲड.कुबेर शेडबाळे,  कळंत्रे श्राविकाश्रमच्या चेअरमन अनिता पाटील, अरूण पाटील, जैन बोर्डिंगचे चेअरमन प्रा.राहुल चौगुले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकांत चौगुले, डॉ. अशोक नाईक, डॉ.जयपाल चौगुले, श्री. श्रीपाल चौगुले आदीनी श्रध्दांजली वाहिली. 
शेवटी णमोकार महामंत्राने  श्रध्दांजली सभेची सांगता झाली. 
श्रध्दांजली सभेस दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, इचलकरंजी आदि सर्व शाखा व विभागाचे पदाधिकारी,सदस्य तसेच परिसरातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.