श्री कल्लेश्वर हायस्कूल, टाकवडे विद्यालयामध्ये कर्मवीर जयंती उत्साहात साजरी...
महाराष्ट्रातील थोर शिक्षण महर्षी व आधुनिक ज्ञानभगीरथ पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती *श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे* येथे अगदी उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रारंभी स्कूल कमिटी सदस्य श्री. यशवंत पाटील, मुख्याध्यापक श्री.भोसले ए. जी. यांच्या शुभ हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कर्मवीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध वेशभूषा परिधान करून सामील झालेले होते. महाराष्ट्र, केरळ, गुजरात राज्यातील पोशाख केलेले विद्यार्थी व आदिवासी वेशभूषेत आलेले विद्यार्थी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. विविध ठिकाणी गावातील असंख्य ग्रामस्थ, गृहिणी व माजी विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून कर्मवीरांना अभिवादन केले. मनोवेधक सजावट, ठेका धरायला लावणारी वाद्ये आणि कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांची वेशभूषा केलेल्या श्रीवर्धन कोळी व कु.संतोषी वडर या विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी- विद्यार्थिनींचे आकर्षक झांज पथक व लेझीम पथक, कर्मवीरांच्या कार्याचे गुणगान गात विठ्ठल रुक्मिणी व पालखीसह वारकरी दिंडी रूपात सामील झालेले विद्यार्थी, विविध महापुरुष व आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या परिपूर्ण वेशभूषेत आलेले विद्यार्थी यामुळे टाकवडे गावातील वातावरण कर्मवीरमय झाले होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आण्णासाहेब भोसले, श्री. चंद्रकांत कागवाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. संगिता खोत, कलाशिक्षक श्री. आनंदा गायकवाड, गुरुकुल प्रमुख श्री. चंद्रकांत शेटे व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कर्मवीर जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.