LOKSANDESH NEWS
सुरत बायपासवर जबरी लुटमार करणारी टोळी जेरबंद
धुळे शहरातील सुरत बायपास महामार्गावर मध्यरात्री पायी चालणाऱ्या व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवून त्याच्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवत रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केला. याप्रकरणी दोन तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून 22 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी आनंदा मोरे हे सुरत बायपास रस्त्यावरुन पायी जात असताना चार जण दोन मोटारसायकली वर त्यांच्याजवळ आले. लिफ्ट देण्याचा बहाणा करत त्यांना दुचाकीवर बसवले. हॉटेल चंद्रदिप जवळ पोहोचताच, त्यांनी मोरे यांना शस्त्राचा धाक दाखवत खिशातील 3 हजार रुपये रोख, विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता फोन पे अॅपचा पिन नंबर मिळवून त्याच्या खात्यातून 7200 रुपये उडवले.
या प्रकारानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे चैतन्य जगदीश पाटील आणि विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे यांना चितोड गावाजवळील शांतुशा नगरमधून ताब्यात घेतले. दरम्यान दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिले.