मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर झाडल्या गोळ्या

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर झाडल्या गोळ्या

LOKSANDESH  NEWS 



 मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर झाडल्या गोळ्या


 मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे. 

प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवर बापाने लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून तिचा खून केला. या गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासरा जखमी झाला आहे. ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगर परिसरात शनिवारी (ता. २६) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

     तृप्ती अविनाश वाघ (वय 24) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ (वय 28, दोघे रा. करवंद, शिरपूर, सध्या वास्तव्यास असलेले कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी वडील किरण अर्जुन मंगले (वय 48, रा. शिरपूर) याला हा विवाह पसंत नव्हता. बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते. बहिणीच्या हळदीसाठी लेक आणि जावई त्याठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली होती. 

हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून त्यानी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली. तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वडील आणि मुलगी समोरासमोर आले. तृप्तीला पाहताच तिच्या वडिलाने रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला पण त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. 

 अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या बापाला मारहाण केली. दरम्यान, शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली