निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या बीडचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीड पोलिसांनी रणजित कासले यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं.
रणजित कासले गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. दोन दिवसांपूर्वी रणजित कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत लवकरच मी शरण येणार असल्याचे सांगितले होते. काल रात्री पुण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पुण्यातील किंवा बीड मधील पोलिसांना शरण जाणार असल्याचे म्हटलं होतं मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेंना ताब्यात घेतलं. काल ते दिल्लीवरून पुण्यात आले. पुणे एअरपोर्टबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पुण्यातील एका हॉटेलवर मुक्काम करायला गेले. पत्रकारांशी संवाद साधताना रणजित कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते.
पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजित कासले यांनी सांगितलं होतं. पण ते पुणे पोलिसांकडे शरण आले नाही. शेवटी आज पहाटे रणजित कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता पोलिस रणजित कासले यांना चौकशीसाठी बीडला घेऊन जाणार आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली