LOKSANDESH NEWS
साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्था बंद, व्यवहार ठप्प झाल्याने पोलिसात तक्रार
वैजापूर शहरातील साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील व्यवहार ठप्प झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ठेवीदार हे आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी चकरा मारत आहेत. अनेक दिवस बँकेत चकरा मारल्यानंतर अखेर आज ठेवीदारांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या बँकेतील बहुतांश ठेवीदार शेतकरी हे जरूळ येथील असल्याची माहिती समोर येत आहे.
50 हून अधिक शेतकरी वैजापूर पोलिस ठाण्यात आल्याने पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेण्यात सुरवात केली आहे. या बँकेचे वैजापूर, शिऊर, छत्रपती संभाजीनगर सह एकूण 7 शाखा असल्याची माहिती समोर येत असून वैजापूर पोलिस ठाणे हद्दीतील फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी वैजापूर पोलिस ठाणे येथे आपले जबाब नोंदवावे असे आवाहन ही पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी केले आहे. तर प्रकरणाची चौकशी करून पोलिस अधीक्षक यांना अहवाल पाठवून त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करणार असल्याचेही कौठाळे यांनी प्रसंगी सांगितले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली