अवकाळी पावसाचा पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात कहर: अल्पभूधारक शेतकऱ्यांचा दिडशे क्विंटल कांदा सडला
साक्री तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पिंपळनेर परिसर तसेच देशशिरवाडे, सामोडे, बल्हाणे, शेवगे, कुडाशी आणि पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने साक्री तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे उन्हाळी कांद्यासह इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतशिवारात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
साक्री तालुक्यातील चिकसे येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष खैरनार यांच्या एक एकरातील उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी सुमारे 160 ते 180 क्विंटल कांद्याची लागवड केली होती, ज्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले होते. मजुरांची टंचाई असतानाही जास्त मजुरी देऊन त्यांनी कांदा काढला होता. मात्र, काढलेला कांदा शेतातून चाळीत पोहोचण्यापूर्वीच अवकाळी पावसाने थैमान घातले. प्लास्टिकच्या कागदाने झाकलेला असूनही, शेतात साचलेल्या पाण्यामुळे त्यांचा संपूर्ण कांदा खराब झाला आहे.
या नुकसानीबाबत बोलताना देशशिरवाडे येथील नुकसानग्रस्त शेतकरी पुंडलिक वसंत शिंदे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे पश्चिम पट्ट्यातील अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.