ड्रोन कार्यप्रणाली, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई, दिवसरात्र गस्त ठरली प्रभावी; मत्स्यव्यवसाय आयुक्तांची माहिती
ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे. सन 2024-25 या मत्स्य वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन 71,303 मे. टन एवढे झाले आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले की, सन 2023-24 मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पान 67,907 मे. टन होते. तर सन 2024-25 मध्ये जिल्ह्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये 3,396 मे. टनने वाढ झाली असून, हे मत्स्योत्पादन 71,303 मे. टन एवढे झाले आहे. विभागामार्फत होणारी दिवस, रात्र सागरी गस्त व ड्रोनव्दारे होणारी देखरेख यामुळे मासेमारीवर नियंत्रण येत असून कृत्रिम भित्तीका पाखरण तसेच खोल समुद्रातील मासेमारीमुळे मत्स्योत्पादनामध्ये वाढ झाल्याचे तावडे यांनी सांगितले. ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय मंत्री नितेश राणे यांनी घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि. 09 जानेवारी 2025 पासून ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली.
तेव्हापासून या यंत्रप्रणालीव्दारे अनधिकृत मासेमारी नौकांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून, आज अखेर एकूण 367 अनधिकृत मासेमारी नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 82 नौकांवरील प्रतिवेदन निकाली काढण्यात आली असून, सदर नौकांवर रक्कम 31 लाख 19 हजार रुपये एवढी शास्ती आकारण्यात आली आहे असे आयुक्तांनी सांगितले. मत्स्योत्पादनामध्येही सद्यस्थितीत संवर्धक केंद्रित होत असून, भविष्यामध्ये मत्स्योत्पादनामध्ये वाढ होणे दृष्टिने विभाग कार्यरत आहे, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले. तर हर्णे, साखरीनाटे आणि मिरकरवाडा बंदरे विकसित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./