LOKSANDESH NEWS
गोंदिया जिल्ह्यात रब्बी धान कापणीला सुरुवात, मजुरांच्या टंचाईमुळे यंत्रसहाय्याची मागणी वाढली
गोंदिया जिल्ह्यात रब्बी धान कापणीला सुरुवात झाली असून, यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान लागवड करण्यात आली होती. सध्या शेतकऱ्यांकडून कापणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, कापणीसाठी मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत.
गेल्या काही वर्षांत कापणीच्या हंगामात मजुरांची संख्या घटल्याने आणि मजुरीचे दर वाढल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हार्वेस्टरच्या मदतीने कमी वेळात व कमी खर्चात मोठ्या क्षेत्रातील धान कापणी करणे शक्य होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या यंत्रांची मागणी वाढली आहे. गोंदिया जिल्ह्यात विविध भागांत हार्वेस्टरच्या सहाय्याने धान कापणी केली जात असून, त्यामुळे श्रमबळावरचा ताण कमी झाला आहे. यंत्राद्वारे धान कापणी केल्याने वेळ व खर्च वाचत असून, धानाची गुणवत्ता देखील टिकून राहत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी कापणीसाठी हार्वेस्टर यंत्रावर भर दिला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.