गोंदियामध्ये आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 'समर कॅम्प' चे आयोजन
आदिवासी जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून आदिवासी आश्रम शाळा चालविल्या जातात. याच आश्रम शाळांमधून आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
गोंदियाच्या देवरी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यलयाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील 11 आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी "उन्हाळी शिबिराचे" (summer Camp) आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत असून विविध कलागुण या शिबिरातून शिकत आहेत.
विद्यार्थी - विद्यार्थिनी हातात ब्रश घेऊन पेंटींग करताना दिसत आहेत. तर अनेक विद्यार्थी धनुष्यबाणाचे प्रशिक्षण, संगीताचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. इतकेच नव्हे मातीपासून मूर्ती, किल्ले बनविण्याचे काम, बांबूपासून विविध वस्तू, गोंडी पेंटिंग, मेहंदी बनविणे असे विविध प्रशिक्षण घेत आहेत. यामुळे विविध कला शिकल्यानंतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःचा व्यवसाय करता येणार आहे. यासाठी या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येत आहेत. या उन्हाळी शिबिरामुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून याचा फायदा होत असल्याचे सांगितले आहे.