सांगली, कुपवाडसाठी ४५५ कोटींच्या वारणा उद्भव योजनेस मंजुरी मिळावी: आमदार गाडगीळ यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली, कुपवाडसाठी ४५५ कोटींच्या वारणा उद्भव योजनेस मंजुरी मिळावी: आमदार गाडगीळ यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन.....



सांगली, कुपवाडसाठी ४५५ कोटींच्या वारणा उद्भव योजनेस मंजुरी मिळावी: आमदार गाडगीळ यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन....

          सांगली, दि. १६: सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ होत आहे. परिणामी सध्याची नळ पाणीपुरवठा योजना अपुरी ठरत आहे. त्यामुळेच सुधारित सांगली व कुपवाड नळपाळीपुरवठा योजनेस (वारणा नदी उद्भव ) शासनाने तातडीने मंजुरी द्यावी.तसेच या योजनेसाठी ४५५ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी विधिमंडळ  अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे केली.त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर या योजनेसंदर्भात सविस्तर चर्चाही केली.

आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, सांगली, कुपवाड परिसरात लोकसंख्या वाढीमुळे पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे होत नाही. यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत कार्यक्रमांतर्गत सुधारित सांगली व कुपवाड नळ पाणीपुरवठा योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.
या योजनेत सांगली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणा नदी हा उद्भव धरण्यात आला आहे. वारणा नदी ही प्रदूषण विरहित असल्याने सांगली व कुपवाड नळ पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना शुद्ध व भरपूर पाण्याचा पुरवठा होणार आहे.
आमदार गाडगीळ यांनी सांगितले की, सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीने प्रशासक ठराव क्रमांक३/२३५ अन्वये दि. १३ मार्च २०२४ नुसार ह्या योजनेला मान्यता दिली आहे. योजनेसाठी सन २०५७ ची ११ लाख २८ हजार लोकसंख्या गृहीत धरून  ४५५ कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला आहे. तरी या योजनेस मंजुरी देऊन तो निधीही तातडीने मंजूर करावा. त्यामुळे सांगली आणि कुपवाडमधील नागरिकांना पुरेसा आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकेल.
*४५ एमएलडीच्या एसटीपी प्लांटला मंजुरी द्यावी*
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या ४५ एमएलडीच्या एसटीपी प्लांट  बांधण्याच्या प्रस्तावास नगरोत्थान योजनेतून शंभर टक्के निधी देऊन मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
या योजनेसाठी ९३ कोटी ५१ लाख रुपयांचा सविस्तर प्रकल्प प्रस्ताव एक वर्षीपूर्वी शासनास सादर केला आहे व तो प्रलंबित आहे. त्यासही मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी केली.
आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे, की शेरीनाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळू नये म्हणून एसटीपी प्लांट उभारणे अत्यावश्यक आहे. कृष्णा नदीचे पाणी शेरीनाल्यामुळे दूषित होते. परिणामी हरित लवादाने महापालिकेस आज अखेर सुमारे पाच कोटी एवढा दंड ठोठावला आहे. अनेक वेळा हा विषय विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान नगरविकास मंत्री यांनीही या प्लांट बांधण्याच्या प्रस्तावास नगरोत्थान योजनेतून शंभर टक्के निधी देऊन मंजुरी देण्याबाबत सभागृहात आश्वासित केले आहे. त्यामुळे आता तातडीने या प्रस्तावास मंजुरी द्यावी... अशी मागणी आज करण्यात आली 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.