मारुती रोड - छपरांचा प्रदेश...
आज मारुती रोडचे रूप बघितले तर दुतर्फा चार मजली सिमेंट काँक्रीटच्या इमारती. रस्त्यावर माणसांची व वाहनांची प्रचंड गर्दी असते. माणसांपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे. त्यातच हातगाड्या, फेरीवाले यांची गर्दी. पायी चालणारा माणूस हा सगळ्यात तुच्छ व दुर्लक्षित आहे. रस्तारुंदी झाली आहे हे खरेही वाटत नाही.
प्रत्येक सणाला शहराचा सगळा बाजार मारुती रोडवर एकवटलेला असतो. जो तो उठतो, तो मारुती रोडवरच खरेदीला येतो. पण खरेदी रस्त्यावरच, दुकानात कोणी जात नाही. दुकानदार हताशपणे रस्त्यावरच्या गर्दीकडे नुसते पाहात असतात.
आज मी ज्या छपरांच्या प्रदेशाचे वर्णन करणार आहे. तो मारुती रोड हा नव्हे. तो पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीचा ! चार-पाच स्लॅबच्या (त्याही दुमजली ) इमारती सोडल्या तर बाकी सगळी एक मजली छपरांचीच दुकाने.
मारुती चौकातले ठोंबऱ्यांचे चिरमुऱ्याचे दुकान कौलारू एक मजली होते. मागच्या बाजूला भट्टी होती. तिथे सगळे पदार्थ तयार व्हायचे. दुकानात मालक गादीवर बसूनच सगळे व्यवहार करायचे.
दि. १२ जुलै, १९६१ ला (पानशेतचे धरण फुटले त्या दिवशी) सांगलीतही महापूर होता. रस्त्यावरच्या दुकानात पाणी शिरले होते. ठोंबऱ्यांनी पुराचे फोटो आपल्या दुकानात फ्रेम करून लावले. (अजूनही असतील.)
ठोबऱ्यांच्या शेजारीच असलेल्या स्टार हेअर कटिंग सलूनचे मालक अण्णा यांनी दुकानापुढे छाती एवढ्या पाण्यात उभे राहून काढलेला फोटो दुकानात लावला होता.
दि. १३ जुलै १९६१ च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकात पहिल्या पानावर 'मारुती रोडवरून नावा फिरत आहेत.' असा फोटो छापला होता. त्या फोटोत भाऊराव गाडगीळांच्या दुकानात पाणी शिरलेले दिसत होते. (हल्लीचे धनंजय स्टोअर्स) तो टाईम्सचा अंक भाऊरावांनी बरीच वर्षे जपून ठेवला होता.
२००५ व २००७ साली त्यापेक्षा मोठा पूर सांगलीत आला.
ठोंबऱ्यांच्या दुकानासमोर एक दुमजली स्लॅबची इमारत आहे. पूर्वी तेथे तळमजल्यावर एका गुजराती व्यापाऱ्याची स्टार डेअरी होती. डेअरी उत्तम चालली होती पण (बहुदा आर्थिक अडचणीमुळे) डेअरी एका रात्रीत बंद झाली व त्या जागी मधुसूदन डेअरी आली. तीही चांगली चालली आहे. वरच्या मजल्यावर छाया फोटो स्टुडिओ आहे व मालक (ऐनापुरे ? ) राहतात.
मधुसूदन डेअरी शेजारी बेस्ट रेस्टॉरंट होते. तिथे भजी चांगली मिळायची.
बेस्ट रेस्टॉरंटला लागूनच एक दुकानाचे छप्पर होते. ती जागा मोकळीच होती. तेथे कोणतेही दुकान चालत नाही. अशी त्या जागेची कीर्ती होती. ती जागा एका केरळी मुसलमानाने घेतली व बेकिंग अरोमा ही बेकरी सुरू केली व त्याचे नशीब फळफळले. दुकानाच्या पुढील भागात बेकरी (शॉप) व मागील बाजूस भट्टी होती. गिऱ्हाईक बाहेर ( रस्त्यावरच ) उभे राहून माल खरेदी करायचे. बेकरीच्या मालकाचे नाव ए. पी. अब्दुल कादर आहे असे मला बऱ्याच वर्षांनी समजले. मी विचारले, 'ए. पी. म्हणजे काय ? फुल फॉर्म काय?' त्यावर, 'माझे नाव ए. पी. असेच आहे!' असे उत्तर मिळाले.
स्टार सलूनमध्ये लहानपणी आम्ही केस कापायला जायचो. ते सकाळी साडेसात वाजता. साडेसात ते आठपर्यंत सिलोन रडिओवर 'पुराने फिल्मों के गीत' ऐकायची. तोपर्यंत आठच्या दरम्यान नंबर लागायचा.
स्टार लगत असलेल्या मनोहर स्टोअर्सची परिस्थिती बेकिंग अरोमा सारखीच होती. एक फळी आडवी ठेवलेली असायची. गि-हाईक बाहेर रस्त्यावर उभे असायचे. आपल्याला काय पाहिजे ते सांगितल्यावर नोकर पोत्याच्या रांगांमधून आत जात. गिन्हाईकाला पाहिजे ती वस्तू आणून देत.
बेकिंग अरोमा लगतच तीन-चार चपलांची दुकाने होती. त्यात गिऱ्हाईकांच्या चपलांचे (पायाचे) माप कागदावर घेऊन, त्याप्रमाणे चपला बनवून देणारे कारागीरही होते.
त्याच्या पलीकडे दत्त कोल्ड्रिंक हाऊस होते. तिथे दूध कोल्ड्रिंक व आईस्क्रीम चांगले मिळायचे. उंच, काळा, टकल्या मालक हाफशर्ट व पायजामा घालून काउंटरवर निर्विकार मुद्रेने बसलेला असे.
दत्त कोल्ड्रिंक बंद झाल्यावर त्या जागेत संगम फुटवेअर हे चपलांचे दुकान निघाले. तेही चांगले चालायचे. पण पुढे मालकाने चपलांचे दुकान बंद करून कापडाचे दुकान सुरू केले. तेही चांगले चालत होते. पण त्याच्या समाजातल्या लोकांनी त्याची चेष्टा करायला सुरुवात केली. 'लेका, चांभार असून तू कापड विकतोस होय ! तुला काही वाटते का?' असे म्हणू लागले. त्याबरोबर त्याने कापडाचे दुकान बंद करून पुन्हा संगम फुटवेअर सुरू केले.
मारुती रोडवर डाव्या बाजूच्या बोळातून आत गेल्यावर, डंकातल्या पटवर्धनांचे घर होते. त्यांचीच एक दुमजली चाळ होती. एक मोकळे पटांगण होते. चाळीत बाबुराव माने फोटोग्राफर व महादेव गोगटे (घड्याळवाले) यांची बिऱ्हाडे होती. पुढे ते आपापले बंगले बांधून तिथून गेले.
समोरच्या पटांगणात खवाटे यांची लाकडाची वखार सुरू झाली.
आता त्या सर्व जागेत चाफळकर कॉम्प्लेक्स हे मोठे अपार्टमेंट झाले आहे. सांगलीतल्या सुरुवातीच्या अपार्टमेंटसपैकी ते एक आहे.
रस्त्यावरच बोळाला लागून गावभागातील पैलवान जंबू पाटील यांची जागा होती. ती दुकानाला भाड्याने देण्यासाठी त्यांनी एक मजली इमारत बांधली.
पाच मारवाडी व्यापाऱ्यांनी भागीदारी करून तेथे पंचशील हे साड्यांचे दुकान सुरू करायचे ठरवले. पण जागा उंचावर होती. आत येताना तीन पायऱ्या चढून आत यावे लागे.
शेटजीनी सांगितले, ‘आम्हाला दुकान रस्त्याच्या लेव्हलला पाहिजे. दुकान कसे पाहिजे ? रस्त्यावरून सरळ दुकानात पाऊल टाकता आले पाहिजे !'
जंबू पाटलांनी सांगितले, 'जी काही दुरुस्ती करायची आहे. ती तुम्ही आपल्या खर्चाने करून घ्या. '
लगेच शेटजींनी कामाला सुरुवात केली. दुकानाची जागा तीन फूट खणून, फ्लोअरिंग करून दुकानाची सजावट केली व थाटात उद्घाटन केले.
त्यानंतर आठच दिवसांनी संध्याकाळी बेदम पाऊस पडला. पंधरा मिनिटात मारुती रोडवर व त्याचबरोबर शेटजींच्या पंचशीलमध्ये मांडीएवढे पाणी साठले !
काश्मीर प्रश्न, बेळगाव प्रश्न व शेरीनाला प्रश्न हे चिरंतन व शाश्वत न सुटणारे प्रश्न आहेत. या प्रश्नावर निवडणुका लढवता येतात व जिंकताही येतात. पण प्रश्न तसेच राहतात. या प्रश्नांच्या जोडीला आता मारुती रोड व शिवाजी मंडईत
साठणारे पाणी व तुंबणारे ड्रेनेज या प्रश्नांची भर पडली आहे !
प्रसाद मेडिको पुढे बऱ्याच वर्षांनी सुरू झाले. त्याला लागून नेमाण्णा शंभू शेटे यांचे धान्य व किराणा मालाचे दुकान होते. त्यांच्या शेजारी मध्यंतर हॉटेल सुरू झाले.
तात्या साळुंखे पैलवान होते. पूर्वी त्यांचे आनंद टॉकीजच्या आवारात छाया कोल्ड्रींक हाऊस होते. ते बंद करून त्यांनी मध्यंतर दुमजली हॉटेल बांधले. (पण वर छप्परच. )
मध्यंतरची मिसळ, शाबुवडे, मोहनवडा हे पदार्थ फार प्रसिद्ध होते. परगावाहून कामासाठी सांगलीत येणाऱ्यांच्या कामाच्या यादीमध्ये मध्यंतरमध्ये मिसळ खाणे एक महत्त्वाचे काम असे.
मध्यंतर हॉटेल उत्तम चालले होते. पण सोलापूर मेडिकलमध्ये शिकत असलेल्या तात्यांच्या मुलाचे अकाली निधन झाले. तात्यांचे धंद्यातले लक्ष उडाले. त्यांनी हॉटेल बंद केले.
पुढे काही वर्षांनी तात्यांनी चार मजली इमारत बांधली. तिला आपल्या दिवंगत मुलाचे सदाशिव असे नाव दिले.
त्या जागेत आता पाटणकरांचे विविधा हे दुकान आहे.
मध्यंतरच्या पलीकडे दोन-तीन होजिअरीची दुकाने, एक-दोन सलून, एक टिनमेकरचे दुकान, सह्याद्री ही शाकाहारी - मांसाहारी खाणावळ होती. अनेक वर्षे बाहेर मटणताट १० /- रु. व चिकनताट १२/- रु. असा बोर्ड लावलेला असे. कधी कधी हॉटेलवर धाड घालून दारूच्या बाटल्या जप्त होत असत. हॉटेल बाहेर पोलीस गाडी उभी असली की हॉटेलवर धाड पडली आहे हे ओळखावे.
स्वागत हॉटेल, श्रीराम जनरल स्टोअर्स व दीपा फोटो स्टुडिओ ही तीनही दुकाने एकाच (कौलारू छपराखाली नांदत होती. हॉटेल मालक सटाले यांची ती जागा होती. त्याबरोबर तेथे आणखी एक होजिअरीचे दुकान होते असे वाटते. नक्की आठवत नाही.
असत. हॉटेल मालक बाहेर कढई ठेवून सकाळी जिलेबी व संध्याकाळी भजी तळत.
दत्तोपंत मराठे यांच्या श्रीराम जनरल स्टोअर्समध्ये 'काहीही मिळते.' असा दुकानाचा लौकिक होता.
एकदा एका केमिस्टच्या दुकानात मी चौकशी केली, 'डीडीटी पावडर कुठे मिळेल?'
'श्रीराम जनरलमध्ये विचारा मिळेल!' ती मिळाली.
दुसऱ्या एका दुकानात विचारले,
'सुतळी आहे का?'
'श्रीराम जनरलमध्ये विचारा मिळेल!' मिळाली.
१९८८ साली भारतीय सिनेमाला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त दूरदर्शनने जुन्या चित्रपटांचा महोत्सव साजरा केला. राज कपूर, एस. एस. वासन (जेमिनी स्टुडिओ) व गुरुदत्त यांचे गाजलेले एकूण तेरा सिनेमे दाखवले. रात्री साडेअकराला सिनेमा सुरू व्हायचा व दीड पावणेदोनला संपायचा.
तेराव्या दिवशी गुरुदत्त यांचा 'साहिब बीबी और गुलाम' सिनेमा होता. रात्री पावणेदोनला सिनेमा संपला व सगळे झोपले.
पहाटे चार वाजता एकदम फटाक्यांचा कडकडाट सुरू झाला. आम्ही काय झाले ते बघायला तिसऱ्या मजल्यावर गेलो. पाहतो तर काय ? स्वागत हॉटेल व दोन्ही दुकानांना प्रचंड आग लागली होती! दिवाळीनिमित्त तीनही दुकानात फटाक्यांचा मोठा साठा करून ठेवला होता. तो सगळा एकदम पेटला. तीन दुकाने छपरासकट पंधरा मिनिटात भस्म सात झाली !
नवीन इमारत बांधल्यावर पुन्हा स्वागत हॉटेल ( आता नव्या रूपात) व दोन्ही दुकाने सुरू झाली. कालांतराने मराठे यांनी शेजारीच जागा खरेदी करून तेथे नवीन श्रीराम जनरल स्टोअर्स सुरू केले.
एका वर्षी दि. २५ जानेवारीला रात्री साडेआठला सांगलीवाडीचा एक दादा स्वागत हॉटेलमध्ये जेवायला एकटाच आला. तो जेवत असताना चौघे जण हॉटेलात आले व जवळच्या शस्त्राने त्या दादावर हल्ला केला. तो ठार झाला आहे याची खात्री करूनच चौघे तेथून निघून गेले.
एकच गोंधळ उडाला. पळापळ झाली. अनेक जण हॉटेलचे बिल बुडवून पळाले. पोलीस आले. पंचनामा झाला. तेथून बॉडी हलवेपर्यंत साडेदहा वाजले. नंतर सगळे हॉटेल धुऊन घेतले. रात्री दोन वाजता सगळी कामे आटोपली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ जानेवारीला पहाटे चार वाजता मालक हॉटेल बाहेर कढई घालून बसले व जिलेबी करायला सुरुवात केली !
आज तिथे रुचीसंगम भोजनालय आहे. तिथे आद्य मालकांचे सायकलचे व सायकल दुरुस्तीचे दुकान होते. त्यांनी तळमजल्यावर आपले दुकान तेवढे बांधले. पण लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे वरच्या सिमेंटच्या कठड्यावर सिमेंटमध्ये कोरलेली 'कल्लाप्पा शंकराप्पा खिलारे' अशी अक्षरे. तीन फूट उंचीची
पुढे खिलारे बंधू हॉटेल व्यवसायात शिरले व भोजनालयांची मालिका सुरू केली.
रुचीसंगमच्या जवळच डी. पी. परांजपे यांचे कोल्ड्रिंक हाऊस आहे. तेथे आईस्क्रीम, कोल्ड्रिंक तर होतीच. पण नाना पेय उर्फ मसाला डायजेस्ट ही त्यांची स्पेशालिस्टी होती. लिंबाचा रस, मीठ व हिंगाष्टकाचा मिश्रणावर सोड्याची बाटली ओतून ग्लास पुढे ठेवल्यावर ते फसफसणारे मसालेदार पेय पिताना इतका आनंद व्हायचा!
त्या पलीकडे दोन-तीन कॉस्मेटिकची दुकाने व दोन-चार फुलांची दुकाने होती. त्याच्या समोर बुट्टे यांचे वाद्याचे व वाद्याच्या दुरुस्तीचे दुकान होते. बुट्टे यांचा एक मुलगा श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टीच्या दिवशी बागेतल्या गणपतीला पोहत निघाला होता. त्याचा पुरात बुडून मृत्यू झाला.
हरभट रोडच्या चौकात गुरुनाथ कुलकर्णी यांचे भारत होजिअरी हे दुकान आहे. त्यांच्या वडिलांचे सीतारामपंत कुलकर्णी यांचे भारत कॅप मार्ट हे दुकान होते. लोक त्यांना टोपीवाले कुलकर्णी असेच ओळखत असत. त्यांचे बंधू काचवाले कुलकर्णी यांचे जवळच हरभट रोडवर दुकान होते. दोघा बंधूंचा पांढरा शर्ट, धोतर, काळी टोपी व सोनेरी फ्रेमचा चष्मा (कधीतरी कोट) असा सारखाच पेहराव असायचा.
असा हा मारुती रोड त्यावेळी फक्त तीस फूट रुंद होता. दिवसेंदिवस गर्दी व रहदारी वाढत होती. त्यामुळे रुंदीकरण लवकर करणे आवश्यक होते. पण या मार्गावर दावल मलिक व बालाजी मंदिर ही दोन धार्मिक स्थळे येत होती. त्यामुळे हा प्रश्न नाजूक व हुळहुळा झाला होता.
एके दिवशी सांगलीचे त्यावेळचे जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ यांनी रात्रीचे सिनेमे सुटल्यावर मारुती रोडकडे येणारे सर्व रस्ते बंद करून दोन तासात दावल मलिकचा पुढे आलेला भाग व भिंत पाडून टाकली. पुढे आठ दिवसात मारुती रोडवरच्या दोन्ही बाजूच्या इमारती व दुकाने दहा-दहा फूट पाडल्या.
दावल मलिक समोर खवाटे बिल्डिंग आहे. तळमजल्यावर चला सायकल मार्ट आहे. वरच्या मजल्यावर खवाटे राहतात. रस्ता रुंदीत बिल्डिंगचा पुढचा भाग पाडल्यावर खबाट्यांचे घर नाटकाचा पडदा उघडल्यावर जसे स्टेज दिसते तसे दिसू लागले. अनेक वर्षे (कौटुंबिक वादामुळे ?) ते तसेच ओपन स्टेज दिसत होते. सर्व दुकानदारांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून घेतली.
भारत होजिअरी, तात्या उदगावकर यांचे सांगली मेडिकल, सी. व्ही. गोखले, भगवानलाल कंदी, गोरे बंधू यांची दुकाने दहा-दहा फूट गेली. ज्यांच्या जागा पूर्ण गेल्या, त्यांना महापालिकेकडून पर्यायी जागा (गाळे) मिळाले. ज्यांची ऐसपैस दुकाने होती, त्या मालकांना स्टूल घेऊन बसण्यापुरती जागा मिळाली. गेलेल्या जागेबद्दल महापालिकेकडून दर चौरस फुटाला पंचावन्न पैसे इतकी नुकसान भरपाई मिळाली.
बालाजी देवस्थानने स्वतःहून रस्ता रुंदी साठी जागा सोडली व नवीन बालाजी मंदिर बांधले. मंदिराचे भाडेकरू बोडस वहीवाले, आपटे शिक्केवाले, खटावकर टोपीवाले यांना तुटपुंज्या जागा मिळाल्या.
अनेक व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा गेल्यामुळे धंद्याचे फार नुकसान झाले. कॅफे रॉयल हॉटेलची बरीच जागा गेली. पुन्हा हॉटेल सुरू झाले तरी पहिली शान राहिली नाही.
कॅफे रॉयलच्या शेजारच्या बोळात सदासुख थिएटर होते. कोणत्याही दिशेने आले तरी सदासुखमध्ये येण्यासाठी बोळातूनच प्रवेश आहे. ते एक सांगलीतले जुने थिएटर होते.
सदासुखमध्ये पूर्वी नाटकेही व्हायची. १९५७-५८ च्या सुमारास पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरची चार हिंदी नाटके सदासुखमध्ये झाली. रोज एक वेगळे नाटक. चार दिवस हाउसफुल्ल गर्दी झाली. पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र शम्मी कपूर व शशी कपूरही नाटकात काम करत असत.
सदासुख थिएटर त्यावेळी सांगलीतले एक आलिशान थिएटर समजले जायचे. जाहिरातीत सुद्धा थिएटरचा उल्लेख बादशाही सदासुख असा व्हायचा.
एक प्रेक्षक एकदा मॅनेजरकडे तक्रार करायला गेला.
'अहो, पायावर उंदीर नाचताहेत आमच्या! काहीतरी करा!' मॅनेजर म्हणाले, 'मग पाच आणे तिकिटात काय मोर नाचायला पाहिजे तुम्हाला?'
इतक्या सगळ्या छपरामध्ये सांगलीकरांचे लाडके छप्पर म्हणजे आनंद टॉकीज ! प्रेक्षकांनी आनंद टॉकीजवर मनापासून प्रेम केलं. मराठी चित्रपटांचे माहेरघर अशी आनंद टॉकीजची अभिमानाने जाहिरात केली. अनेक मराठी चित्रपटांनी रौप्यमहोत्सव केला. सांगते ऐका बत्तीस आठवडे चालला. इतके नव्हे तर रिपीट रनलाही सांगते ऐका पंधरा आठवडे चालला.
गणपती उत्सवात पाचव्या दिवशी सरकारी (संस्थानच्या) गणपतीची विसर्जनाची भव्य मिरवणूक निघते. ती पाहायला सबंध सांगली जिल्ह्यातून लोक येतात. त्या दिवशी आनंद टॉकीजमध्ये रात्रभर सिनेमाचे खेळ चालू असतात. तेही हाउसफुल होतात. पहाटेच्या खेळाला आलेले लोक मुरगाळून तेथे झोपायचे व सकाळ झाल्यावर आपापल्या गावी जायचे.
सांगलीचे राजेसाहेब श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी बळवंतराव आपटे यांना थिएटर बांधायला जागा दिली व आर्थिक मदतही केली. आनंद टॉकीजच्या प्रत्येक खेळा आधी राजसाहेब व राणीसाहेब यांचे छायाचित्र
( स्लाईड) दाखवायचे. नंतर राजेसाहेब प्रोजेक्टरचे बटन दाबून सिनेमा सुरू करीत आहेत, अशी स्लाईड दाखवायचे. त्यानंतर सिनेमा सुरू होई.
आनंद टॉकीज एक मजलीच होते. वर पत्र्याचे छप्पर होते. पाऊस सुरू झाला की तडतम तडतम असा ताशासारखा आवाज येई. त्या आवाजात सिनेमातले संवाद ऐकू येत नसत.
सिंगल मशीन असल्यामुळे तीन इंटरव्हल होत असत. टॉकीज जोरात असल्याने भेळवाले, वडेवाले, सोडा वॉटरवाले, काळा बाजारवाले असे खूप व्यवसायही जोरात असत.
*डॉ. शरद पटवर्धन* यांच्या लाईफ विदाऊट वाईफ
यांच्या पुस्तकातून साभार.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
___________________________________________________
50 वर्षे मागच्या आठवणी जाग्या झाल्या... मारुती रोड आमची कर्मभूमी.. सुरुवातीस आमची रिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असायची... परत टेम्पो घेतल्यानंतर सुद्धा याच भागात आमच्या टेम्पो ऊभ्या रहायच्या... तो एक काळ वेगळा होता.. साहेब ...आठवणी जाग्या झाल्या डोळे भरून आले...
सलीम नदाफ: संपादक ; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली / मुंबई.
8830247886