तुंग ता. मिरज येथील भूमी ग्रीन वेस्ट टू एनर्जी कचऱ्यापासून वीजनिर्मिती. गंभीर पर्यावरणीय धोका

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तुंग ता. मिरज येथील भूमी ग्रीन वेस्ट टू एनर्जी कचऱ्यापासून वीजनिर्मिती. गंभीर पर्यावरणीय धोका


       लोकसंदेश न्यूज सांगली प्रतिनिधी 
तुंग ता. मिरज येथील भूमी ग्रीन वेस्ट टू एनर्जी कचऱ्यापासून वीजनिर्मिती. गंभीर पर्यावरणीय धोका-   सुनीती सु. र. 

भूमी ग्रीन एनर्जी प्रकल्पामुळे तुंग व परिसरात होत असलेल्या कथित प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 2 जुलै 2026 रोजी कष्टकऱ्यांची दौलत, पंचमुखी मारुती रोड, सांगली येथे तुंग गावातील ग्रामस्थ, पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीचे आयोजन जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे सांगली जिल्ह्यातले प्रतिनिधी हिंद मजदूर सभेचे विकास मगदूम व राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.



 बैठकीपूर्वी जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या कार्यकर्त्यांनी तुंग गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली व प्रकल्पाच्या परिसराची पाहणी केली. या पाहणीची निरीक्षणे व भूमिका जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय समन्वयक सुनीतीताई सु.र. यांनी बैठकीच्या सुरुवातीला मांडून या गंभीर पर्यावरणीय धोक्यासंदर्भात सांगलीतील सजग नागरिकांनी भूमिका घेण्याचे आवाहन केले. तुंग गावातील प्रकल्पग्रस्त नागरिक दिनकर कदम आणि मनोज बिरनाळे यांनी स्थानिक परिस्थिती आणि आपली व्यथा मांडली.



प्लास्टिक प्रदूषण अभ्यासक चैतन्य यांनी वेस्ट-टू-एनर्जी तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या धोकादायक वायू, राख व सांडपाण्याचे दुष्परिणाम स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान अत्यंत जुने असून अनेक विकसित देशांनी अशा प्रकल्पांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे हे प्रकल्प भारतात उभारले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
NAPM चे पर्यावरण कार्यकर्ते वैभव राऊत, सुजय मोरे, रोहिणी सिडाम यांनी भूमी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचा केलेला अभ्यास वैभव राऊत यांनी मांडला. परवाने देताना व त्यानंतरच्या देखरेखीमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमित तपासणी होत नसल्याचा,ऑनलाईन उत्सर्जन माहिती उपलब्ध नसल्याचा, तसेच हवा व पाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.



बैठकीत भूमी ग्रीन एनर्जी प्रकल्पामुळे परिसरातील शेती, पर्यावरण, भूजल, हवा आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्प तात्काळ बंद करण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली.
तसेचआजपर्यंत प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांचे झालेले आर्थिक, शेती व पर्यावरणीय नुकसान याची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.बैठकीत प्रकल्प परिसरातील हवा, पाणी, माती व राखेची त्रयस्थ मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेमार्फत स्वतंत्र वैज्ञानिक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक ठिकाणी धोकादायक राखेचा भराव टाकल्याने भूजल व पाणी प्रदूषित होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परिसरातील भाजीपाल्यामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण (मायक्रोप्लास्टिक) आढळत असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. यामुळे अन्नसाखळी व कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. बैठकीत तुंगसह परिसरातील गावांमध्ये जनजागृतीसाठी गावबैठकांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रकल्पाविरोधातील वैज्ञानिक पुरावे संकलित करून शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि न्यायालयासमोर सादर करण्याबाबतही एकमत झाले.
बैठकीतील प्रमुख निर्णय :*
भूमी ग्रीन एनर्जी प्रकल्प तात्काळ बंद करण्याची मागणी.
शेतकरी व नागरिकांचे झालेले शेती, आरोग्य व पर्यावरणीय नुकसान भरून देण्याची मागणी.
हवा, पाणी, माती व राखेची त्रयस्थ मान्यताप्राप्त संस्थेमार्फत वैज्ञानिक तपासणी.
परिसरातील प्रत्येक गावात जनजागृती व ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय.
प्रदूषणासंदर्भातील पुरावे संकलित करून पुढील कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्धार.
या सर्व कार्यासाठी उपस्थित सहभागींनी उत्स्फूर्तपणे ' पर्यावरण संरक्षण समिती ' ची स्थापना केली. या समितीच्या वतीने येत्या मंगळवारी सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चेसाठी वेळ मागण्यात येईल.

बैठकीस विकास मगदूम, सतीश साखळकर, संदीप राजोबा, सदाशिव मगदूम, नामदेव कस्तुरे, डॉ. रवींद्र व्होरा, हणमंत पवार, ज्योती अदाटे, शाहीन शेख, प्रवीण शिंदे, रामदास कोळी, रोहित शिंदे, शीतल कदम, मनोज बिरनाळे, दिनकर कदम, राजेंद्र खोत, सचिन चौगुले, डॉ. सुहास खांबे, प्रमोद माळी यांच्यासह तुंग, कसबे डिग्रज व परिसरातील ग्रामस्थ तसेच जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते रोहिणी सिडाम उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
Tags