सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्यावतीने २१ जून 2022 रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि पदाधिकारी नगरसेवक यांच्या उपस्थितीत योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला बालकल्याण समिती सभापती सौ. गीतांजली ढोपे पाटील आणि क्रीडाधिकारी महेश पाटील यांनी दिली.
शासनाच्या वेळोवेळी होणाऱ्या सुचनेनुसार व परिपत्रकान्वये सन २०१५ पासून दि २१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. यावर्षी दि. २१ जून २०२२ रोजी ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्याने आयुष मंत्रालयामार्फत देशभरातील ७५ प्रसिध्द स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे योजले आहे.
योग शास्त्र ही भारतीयाची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, ला थॉयराईड वृध्दी, मनोविकार, सांध्यांचे विकार तसेच सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार, योग करण्यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोग मुक्त होण्यामध्ये मदत होते. तसेच सकारात्मक उर्जा मिळते.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभाग व क्रीडा विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केलेले आहे. सदर योग दिन कार्यक्रमाचे उदघाटन महापौर द्विग्वीजय सुर्यवंशी यांचे हस्ते व आयुक्त नितीन कापडनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून सदर योग दिन कार्यक्रमास महापालिकेचे सर्व पदाधिकारी व सर्व सन्मा.सदस्य सहभागी होणार आहेत.
सदर योग दिनाचे आयोजन नेमिनाथ नगर कल्पदृम क्रीडांगण सांगली या ठिकाणी सकाळी 6.30 वा. केले आहे. सदर कार्यक्रमास शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एनएसएस, एनसीसी, पोलिस,योग संस्था, नेहरू युवा केंद्र, सेवा भावी संस्था, क्रीडा मंडळे व मनपा क्षेत्रातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.