MUMBAI "मुगल-ए-आझम' या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहा बाहेर जमली होती.......

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI "मुगल-ए-आझम' या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहा बाहेर जमली होती.......
MUMBAI  
'मुगल-ए-आझम' या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहा बाहेर जमली होती. उच्चभ्रू प्रतिष्ठितांना राजांच्या खलित्यासारखे, उर्दू निमंत्रण फर्मान धाडण्यात आले होते. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहा बाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता.


'मुगल-ए-आझम' बनवण्यासाठी के.असिफ यांना असंख्य अडी अडचणी येत राहिल्या. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली. प्रदर्शीत झाल्यावर मात्र या चित्रपटाने अक्षरश: इतिहास घडवला. तिकीट खिडकीवरचे सर्व उच्चांक या चित्रपटाने मोडीत काढले. या चित्रपटाचे निर्माते शापूरजी पालनजी आणि दिग्दर्शक के.असिफ होते.चित्रपटाचे चित्रीकरण इतके खर्चिक होते की, निर्मात्याचे दिवाळे वाजते की काय, अशी स्थिती अनेकदा निर्माण होई. यामधील युद्धाच्या चित्रीकरणासाठी २००० उंट, ४०० घोडे आणि ८००० सैनिकांचा वापर केला गेला होता. मधुबालाने घातलेले साखळदंड खरेखुरे होते. जोधाबाईंच्या महालातील कृष्णजन्म सोहळ्यासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली.


सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच मुळी सुमारे १ तासाची होती. ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शीशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता. अभिनय, कलावंताची निवड, भव्य सेटस्, रंगभूषा, वेषभूषा,अप्रतिम संगीत व गाणी, दमदार संवाद, युद्धाचे भव्य प्रसंग यातील अनेक सैनिक हे भारतीय खरेखुरे सैनिक होते.पार्श्व संगीत, पटकथा, सिनेमाटोग्राफी, दिग्दर्शन, सर्वच बाबतीत हा चित्रपट हिन्दी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरला. यात वापरण्यात आलेली प्रत्येक वस्तू खरी होती. दागिने, साड्या, तलवारी, तोफा, साखळदंड, संगीत साहित्य, शीस महल सर्व काही अस्सल होते. अमान (झिनत अमानचे वडील), कमाल अमरोही, वजाहत मिर्झा, एहसान रिझवी यांनी त्यातील बहुतांशी संवाद उर्दूत लिहले होते. त्याकाळी व आजही हे संवाद समजायला अवघड वाटत असले तरी चित्रपट बघताना कुठेही बाधा येत नाही.एका गाण्यात एकाचनवेळी पार्श्वगायनासाठी १०० लोकांनी कोरस दिला होता. कलकत्त्याच्या एकाच सिनेमागृहात हा चित्रपट वर्षभर चालला होता. चित्रपट गृहाच्या बाहेर लावलेले भलेमोठे पोस्टर्स व बॅनर्स बघायला प्रचंड गर्दी होत असे. त्याकाळात १५ मिलीयनचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने ५५ मिलीयनचा व्यवसाय केला. नंतर २००५ मध्ये हा चित्रपट रंगीत प्रिंट मध्ये कनव्हर्ट करून पुन्हा प्रदर्शीत करण्यात आला.

           अवघे ४९ वर्षे जगलेल्या के.असिफ यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या २६ वर्षाच्या काळात फक्त साडेतीन चित्रपट तयार केले. त्यांचा 'लव्ह अण्ड गॉड' हा अर्धवट चित्रपट १९८६ ला प्रदर्शीत झाला होता. या चित्रपट निर्मितीची पण वेगळी कथा आहे (लैला मजनूची कथा) आणि त्यांनी ज्या तरूणाला आपल्या चित्रपटात संगीतकार म्हणून बोलावण्याचे वचन दिले होते तेही पूर्ण केले. ते म्हणजे संगीतकार नौशाद अली.

खरं तर मुगल-ए-आझम हा काही ऐतिहासिक चित्रपट नव्हता. अनारकली हे इतिहासातील एक संदीग्ध पात्र आहे. 


अनेक इतिहासकार अनारकली ही गोष्टीतली होती असे मानतात कारण ती असल्याचे पूरावे सापडत नाहीत. पण अस्सल ऐतिहासिक वाटावा अशी पार्श्वभूमी यात होती. त्यामुळे अनारकली ही खरोखरीच होती असे या चित्रपटामुळे ठाम समजूत आजही आहे.

‘मुगल ए आझम’ या चित्रपटाचं त्याकाळी हिंदी व्यतिरिक्त अन्य दोन भाषांमध्ये डबिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी दिग्दर्शकांना हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि इंग्रजी भाषेमध्येही या चित्रपटाची निर्मिती व्हावी असं वाटतं होतं. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं सांगण्यात येतं.


मुगल ए आझम’ या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे २ कॅट्स पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. या पत्त्यांमध्ये, एका कॅट मधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले होते. चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली होती, तर पत्र्याच्या डब्यावरही या दोघांचे एक चित्र होते.
आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राणींच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर (पृथ्वीराज कपूर) आणि जोधाबाई (दुर्गाबाई खोटे) यांचे चेहेरे छापले होते. कॅट मधील दोन जोकरवर ‘मुघल ए आझम’ असे छापले आहे.

सौजन्य....

संजीव वेलणकर, पुणे

संदर्भ : इंटरनेट/मकरंद करंदीकर

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई