SANGLI : तंबाखू नियंत्रण चळवळ लोकाभिमुख करून प्रभावी जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : तंबाखू नियंत्रण चळवळ लोकाभिमुख करून प्रभावी जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी




SANGLI 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

तंबाखू नियंत्रण चळवळ लोकाभिमुख करून प्रभावी जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 16, : तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याने युवकांमध्ये मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी तंबाखू नियंत्रण चळवळ लोकाभिमुख करून तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत प्रभावी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.


जिल्हा रुग्णालयाचा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विभाग प्रमुख व अधिकारी यांच्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा 2003(कोटपा 2003) बाबत अंमलबजावणी व माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद राज्याधिकारी जिया शेख उपस्थित होते.


       जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा  व सर्व अधिकारी यांना कोटपा कायद्याची माहिती देऊन प्रशिक्षित करावे. त्याचबरोबर ही चळवळ गतिमान करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून ग्रामसभेमध्ये तंबाखूमुक्त गाव करण्याबाबत चर्चा करून ठराव करावा. कार्यालयाच्या बाहेर, शाळा परिसर, धार्मिक क्षेत्र तंबाखू निषेध क्षेत्र असल्याचे फलक लावून प्रभावी अंमलबजावणी करावी. कोटपा कायद्याच्या कलम 4 व 6 अंतर्गत दंडाबाबत तरतूद आहे, त्याचे आदेश काढावेत. तालुका पातळीवरील समित्यांची बैठक घेवून सदस्यांना प्रशिक्षण द्यावे. तंबाखू सेवनापासून लोकांना परावृत्त करण्याबाबत प्रभावी प्रयत्न करावेत. तंबाखुमुक्त जिल्हा, देश करण्याचा संकल्प घेवून पुढे जावूया व ही मोहिम यशस्वी  करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


           जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून तरुणांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढत आहे. कायद्याचा धाक दाखवण्याऐवजी जनजागृती करून तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती सर्वसामान्यापर्यंत दिली तर ही तंबाखू नियंत्रण चळवळ अधिक गतिमान होईल असे त्यांनी सांगितले. 
      जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी अभिजीत सिघंयी, राज्याधिकारी जिया शेख यांनी कोटपा कायद्यांच्या विविध कलमांच्या माहितीचे सादरीकरण केले. 

      यावेळी सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे व संवेदना फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष रोनक शहा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी केले तर आभार मालतेश तांदळे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समुपदेशक अभिजीत पाटील, ज्योती पाटील, गणेश उगले, ओंकार उगले यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली