भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर : पाच हजार वर्षाचा जुलमी इतिहास पन्नास वर्षात बदलणारा भारताचा बलाढ्य मानवतावादी महानेता..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..🙏
आज भारतीय संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस घराघरातून श्रध्देने अभिवादन केले जात आहे.
राजसत्ता, अर्थसत्ता आणि धर्मसत्तेपासून घाम गाळणारा नाहीरे वर्ग वंचित राहिल्याने हजारो वर्षे हा समाज गरीब राहिला.. माणूस म्हणून त्याचे निसर्गदत्त मूलभूत हक्क हिरावून घेतले गेले होते.. त्यांना कोणीच वाली नव्हता.. अशा हतबल, अगतिक झालेल्या वंचित वर्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने महानेता लाभला.
भारतातील गरीब, अस्पृश्य, वंचित लोकांचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास हा राजकिय, सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्यानेच होऊ शकतो अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आणि सलग सुमारे पन्नास वर्षे या देशात परिवर्तनाची चळवळ यशस्वी करून दाखविली. भगवान गौतम बुद्धांची धर्मसत्ता ही गरिबांना दुःखमुक्त करणारी होती म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.भ.बुध्दांचा मानवतावाद,प्रज्ञा, करुणा, मैत्री, शील आणि अहिंसक मार्ग मानवाचे कल्याण करु शकतात म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता व बंधुता व न्याय ही मूल्ये बौद्ध धर्मातून घेतल्याचे स्पष्ट करतात.
देशातील अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा हस्तक्षेप हवा.. मोठे उद्योग व सेवा व्यवसाय हे राष्ट्राच्या मालकीचे हवेत.. शेतीला प्रमुख उद्योगाचा दर्जा हवा असे त्यांनी आग्रहाने मत मांडले होते.
राष्ट्रीय संपत्तीचा विनियोग गरिबी हटविण्यासाठी झाला पाहिजे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले होते.ते स्वतः अर्थशास्त्रज्ञ होते त्यामुळे नाहिरे वर्गाच्या विकासाचा अर्थशास्त्रीय सिध्दांत त्यांना चांगलाच ठाऊक होता.
राजकारणात तत्त्वनिष्ठ लोकप्रतिनिधी हवेत.. लबाड, जनतेची लूट करणार्या लफंग्याना निवडून देऊ नका.
वंचित, मागास लोकांचा प्रतिनिधी म्हणून निवडून येणार्याला त्या समाजाचे प्रश्न सोडविणे व दुःख निवारण करण्यासाठी या समाजाचा राजकिय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनाचा परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो घरातील चुली पेटविल्या, मोडून पडलेले संसार उभे केले.. माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली.. स्वाभिमान जागा केला.. लोकांना हक्कांची जाणीव करून दिली.. संविधानातून भारत सुरक्षित व मजबूत केला. कामगार कल्याण, स्त्री उन्नती, धरणे, नद्या जोड प्रकल्प, भारतीय रिझर्व्ह बॅंक स्थापना, विद्युत जोड प्रकल्प, मध्यवर्ती सिंचन प्रकल्प, वित्त आयोग स्थापना, स्त्री पुरुष समानता इ. बाबतीत भरीव कामगिरी केली आहे. भारताच्या सुदैवाने आणि अमेरिकेच्या दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतात जन्मास आले..
आता नवी पिढी नाचणारी नको तर वाचणारी झाली पाहिजे तरच ती वाचेल.. चंगळवादी होण्यापेक्षा सुसंस्कृत, नीतीमान व विचारवंत होण्यासाठी सज्ज व्हावे हेच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल..जय भीम 🙏
प्रा. नेमिनाथ धनपाल बिरनाळे
कार्याध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल
८८८८४७५५५२
दि.६. १२.२०२२
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.