लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १४९ वी जयंती ..!! त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...आज शाहूरायांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होतो......

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १४९ वी जयंती ..!! त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...आज शाहूरायांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होतो......लोकसंदेश न्यूज नेटवर्क

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १४९ वी जयंती ..!! त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

आज शाहूरायांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होतो.. सामाजिक न्याय हा शासन व जनतेकडून कृतीशील विचार झाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा..!


२६ जून १८७४ रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म लक्ष्मीविलास पॅलेस, बावडा, कोल्हापूर येथे झाला
छ. शाहू महाराजांचा जन्म हा जरी राजवाड्यात झाला असला तरी राजवाड्यापेक्षा त्यांना बाराबलुतेदार अठरापगड जातीजमातींचे समाजवाडे अधिक प्रिय होते. १७ मार्च १८८४ दत्तक विधान... २ एप्रिल १८९४... गव्हर्नर लाॅर्ड हॅरिस यांच्या हस्ते राज्यकारभाराची सूत्रे स्वीकारली.. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जनकल्याणाची ग्वाही देणारा पहिला आताच्या भाषेत '' सेवा हमी '' जाहिरनामा प्रसिद्ध केला. लागलीच 'दिवाणी न्यायालयाने शेतकऱ्यांच्या गुरांचा लिलाव करु नये'' अशी राजाज्ञा काढून लोकराजाचा झंझावात काय असतो हे ब्रिटीशासह साऱ्यांना दाखवून दिले.


छ. शाहू महाराजांनी राजवाड्यात बसून फारसा कारभार केला नाही.. छ. शिवबांनी निवडक मावळ्यांसह वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली.. तेच धाडस आणि कर्तबगारी छ. शाहू महाराजांनी दाखविली आहे.या जगात अन्याय, जुलूम, शोषण याविरुद्ध सामान्य लोकांनी क्रांती केली.. परंतु जनता सुखी व्हावी, त्यांचे दारिद्र्य नष्ट व्हावे, समता प्रस्थापित व्हावी, अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एका राजाने क्रांती केली हे फक्त छ. शाहू महाराजांनी करुन दाखविले आहे. समतेची प्रतिष्ठापना करताना विषमतेचा विकृत विचार चारीमुंड्या चित करण्याचे बलाढ्य धाडस त्यांनी केले.. ही सामान्य गोष्ट नाही.


राज्यकारभाराची सुत्रे हाती घेण्यापूर्वी १६ नोव्हेंबर १८९० ते २४ डिसेंबर १८९२ या सुमारे दोन वर्षाहून अधिक काळात त्यांनी एकदा दक्षिण व दोनदा उत्तर हिंदुस्थानचा दौरा केला होता.त्यांच्या बरोबर त्यांचे शिक्षक व पालक स्टुअर्ट मिंटफोर्ड फ्रेजर व कांही सहाध्यायी होते. जनतेची कामे व्हावीत म्हणून प्रामाणिक पणे निवडून विधानपरिषद व विधानसभेवर पाठविलेल्या आमदार खासदारांनी छ. शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा अभ्यास जरुर करावा, केवळ वातानुकूलित मंत्रालयात बसून महाराष्ट्र प्रगत होणार नाही तर छ. शाहू महाराजांप्रमाणे सह्याद्रीच्या कडेकपारीत, डोंगराळ व आदिवासी भागात, शहरी व ग्रामीण भागातील वंचित लोकांच्या वस्तीत जाऊन त्यांची गार्‍हाणी ऐकून त्या सोडविणाऱ्या लोकराजा छ. शाहूंची कार्यप्रणाली अवलंबणे ही महाराष्ट्राची खरी गरज आहे.एप्रिल १८९४ मध्ये या लोकराजांने पन्हाळपेट्यातील जंगली जमातींना भेटून त्यांच्या अडचणी व गार्‍हाणी ऐकल्या. आता जसे आपले मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी सत्तेची सूत्रे हाती घेताच कोरोनाचा सामना करावा लागत आहे.. तसेच छ. शाहू महाराजांना देखील १८९८ मध्ये प्लेग व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी भुदरगड, गडहिंग्लज, रायबाग, कटकोळ, व पन्हाळपेट या भागाचा दौरा करून उच्च प्रतीचे आपत्ती व्यवस्थापन केले होते. कोल्हापूर आयसोलेशन हाॅस्पिटलची निर्मिती ही याच काळात त्यांनी केली आहे. प्लेग मदत कार्यात वेग यावा म्हणून त्यांनी कोल्हापूर व पन्हाळ्याचा राजवाडा आणि ब्रिटिश राजप्रतिनिधी यांचे कार्यालय दूरध्वनीने जोडले होते. शाहुपुरी व्यापारी केंद्र स्थापन केले. सबंध सह्याद्री पर्वत रांगातील प्रदेशातील गावा गावातील, वाड्यावस्त्यावरील गरीब, गरजू, वंचित लोकांना भेटून त्यांच्या अडचणी व गार्‍हाणी ऐकून त्या सोडविल्या आहेत.. त्यांच्या प्रजाहिताच्या कामाची नोंद घेऊन राणी व्हिक्टोरिया कडून त्यांना '' महाराजा '' ही पदवी बहाल करण्यात आली होती.


त्यांनी कोल्हापूर व नाशिक येथे भिन्न जाती धर्माच्या मुलांसाठी वसतिगृहे काढली.. वसतिगृहातील मुलांना प्राधान्याने शाळा महाविद्यालयात प्रवेश देण्याची राजाज्ञा काढली. मागासलेल्या जातीजमातीसाठी सरकारी नोकरीत ५०% राखीव जागा ठेवल्याचे करवीर गॅझेट केले. १९०२ सालात ते साडेतीन महिने इंग्लंड व युरोप दौऱ्यावर होते.. त्यावेळी ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या त्या आपल्या करवीर संस्थानात आणल्या.. राधानगरी धरणाची निर्मिती ही यातूनच झाली आहे. युरोप दौऱ्यावरुन परत आल्यावर समुद्र पर्यटन प्रायश्चित्त न घेता त्यांनी भवानी माता व अंबाबाईंचे दर्शन घेऊन अंधश्रध्देला सुरुंग लावला होता. शिरोळ व कोल्हापूरातील शाहू मिल काढून विणकरांच्या असोसिएशनला जागा व आर्थिक मदत केली. पाटील शाळा सुरू केली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. फासेपारधी लोकांसाठी गृहनिर्माण योजना राबविली. गाव तेथे शाळा ही मोहीम सुरू केली, आज करवीर संस्थामध्ये गावागावात ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत त्याची मूळ प्रेरणा व प्रारंभ हा छ. शाहू महाराज यांच्या अलौकिक कार्यात दडलेले आहे. दि किंग एडवर्ड मोहमेडियन एज्युकेशन सोसायटी काढली ज्याचे ते स्वतःअध्यक्ष होते. हिंदुस्थानचा सहकारी सोसायटी कायदा संस्थानला लागू करुन कोल्हापूर अर्बन को - आॅप. सोसायटी ही पहिली सहकारी संस्था काढली. मराठा, लिंगायत, जैन, सारस्वत ब्राह्मण, मुस्लिम, मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृहे काढून त्यांना सढळ हाताने मदत केली. कार्यालयीन पत्रव्यवहार बालबोध मराठीत सुरू केला. बलुतेदारी पध्दत बंद केली.कुस्तीला वैभव मिळवून दिलेल्या या छत्रपतींनी विजयी मल्लाबरोबर पराभूत पहिलवानालाही रोख बक्षिसे देऊन गौरविले.. छ. शिवाजी महाराजांच्या लोकशाहीला आणि म.जोतिबा फुले व क्रांतीमाता सावित्रीबाई यांच्या अक्षर सामर्थ्याला बहुजनांच्या दारात नेण्याचा महापराक्रम या महाराजांनी केला हे त्यांचे मानव जातीवरील अनंत उपकार आहेत.उठसूठ जातीपातीचे राजकारण करुन लोकशाहीला वेठीस धरणाऱ्या आणि स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या दांभिकानी छ. शाहू महाराजांचे विचार व कार्य अभ्यासणे आवश्यक आहे.. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी रयत शिक्षण संस्था म्हणजे छ. शाहू महाराजांचे जीवंत स्मारक आहे असे लोकराज्यच्या अंकात नमूद आहे.
सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. जातवार स्वतंत्र मतदार संघ मागणीवर भारतमंत्री माँटेग्यू व गव्हर्नर जनरल चेम्सफोर्ड यांच्याशी वाटाघाटी केल्या.मिश्र व आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देणारा कायदा केला. कुलकर्णी वतने रद्द केली. प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायत योजना राबविली.हरीजनांवर कामाची सक्ती न करणे व त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याचा कायदा केला. अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करणे व त्यांना मानवी स्वातंत्र्याचे हक्क देणारा कायदा केला, गुन्हेगारी लोकांची हजेरी पद्धत बंद केली.
अस्पृश्य बुद्धिमान तलाठ्यांना कारकून व अव्वल कारकून पदावर प्रमोशन देण्याचा हुकुम दिला.
प्राथमिक, माध्यमिक व कॉलेज शिक्षणातील अस्पृश्य मुला मुलींना सवर्ण मुलां मुलीसारखी समानतेची वागणूक देण्याची राजाज्ञा १५ जानेवारी १९१९ रोजी दिली. स्त्रियांचा छळ व घटस्फोट संरक्षण देणारा कायदा केला. अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्या. सरकारी शाळेत सर्व जातीधर्माच्या मुलामुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.. शाळेतील शिवाशीव पद्धत बंद करण्याचा कायदा केला. मागासवर्गीय मुली व स्त्रियांना शिक्षण मोफत केले. सरकारी व सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांना खुली केली. अस्पृश्यता न पाळण्याचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. जोगीणी /देवदासी प्रथा निर्मूलन काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांना मदत केली. हरीजनांना पूर्णपणे गुलामगिरीतून मुक्त केल्याचा जाहिरनामा काढला.
छ. शाहू महाराज हा अखंड वाहणारा माणुसकिचा झरा आहे. तो कायम निर्मळपणे वहात राहणार.. आज छ. शिवाजी महाराज आणि छ. शाहू महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विधिमंडळात लोकराजा छ. शाहूंची गरज आहे.. त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी लोकराजेंनी आपल्या सर्वांवर टाकली आहे. ही जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याची प्रतिज्ञा आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त करु या. लौकिक अर्थाने ते निघून गेले परंतु ते अजरामर आहेत.

शेतकऱ्यांना हमीभाव... सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा..पटसंख्येअभावी राज्यातील कोणतीही शाळा बंद करु नये. हे प्रश्न सोडविले तर छ. शाहू महाराजांच्या कार्याला सलाम आणि त्यांचे श्रध्दापूर्वक स्मरण केल्याचे समाधान महाराष्ट्राला लाभेल.आज महाराष्ट्र शासनाला आम्ही छ. शाहू महाराजांना त्रिवार वंदन करताना दोन सूचना करतो....महाराष्ट्र शासनाने जरुर विचार करावा.
१)गावचा पाटील हा लोकशाही शासन व्यवस्थेत महत्वाचा घटक आहे.. महाराष्ट्रातील सर्व पाटलांचे जिल्हानिहाय शासकीय प्रशिक्षण आयोजित करावे..
२)महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या पाटलांना महसूल विभागनिहाय लोकराजा छ. शाहू आदर्श पाटील पुरस्काराने सन्मानित करावे.
३)पूर्व प्राथमिक ते वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या समस्यांवर चिंतन करुन शिक्षण क्षेत्र समस्यामुक्त होण्यासाठी शासनाने जिल्हानिहाय '' लोकराजा छ. शाहू महाशिक्षण परिषद'' आयोजित करावी.

प्रा. एन.डी.बिरनाळे
कार्याध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभाग
८८८८४७५५५२
दि. २६ जून, २०२३

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई