महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा... पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आवाहन: जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा... पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आवाहन: जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ



महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा...
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


        सांगली,  : महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या शासकीय कामांशी थेट जोडलेला विभाग आहे. यासाठी महसूल विभागाने सामान्य माणसाच्या कामांप्रती अधिक संवेदनशील  राहून महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख,  प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी विकास खरात, बी. आर. माळी, वर्षा शिंगण, राजीव शिंदे,  विजया पांगारकर, रघुनाथ पोटे, स्नेहल कनिचे यांच्यासह महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


            पालकमंत्री म्हणाले, शासनाच्या सर्व योजना राबविण्यात महसूल विभाग आघाडीवर असल्याने या विभागाची नाळ सामान्य माणसाला जोडलेली आहे. महसूल विभागानेही सामान्य माणसाची कामे गतीने करून त्याला शासन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आग्रही भूमिका बजावावी. या पुढील काळात महसूल विभागाने जनतेची कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


            जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी म्हणाले, महसूल विभागाने आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूर, आपत्ती, दुष्काळ, निवडणूक आदि कामांमध्ये या विभागातील अधिकारी कर्मचारी झोकून देऊन काम करतात. लोकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणारा हा विभाग आहे. यापुढेही विभागाने आपल्या चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करावी.

            महसूल विभाग हा शासनाच्या सर्व खात्यांना एकत्र घेऊन काम करणारा विभाग आहे. विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करावी असे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी सांगितले.

            उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, तहसीलदार प्रदीप उबाळे, तलाठी शुभांगी थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये तहसीलदार प्रदीप उबाळे, निवास ढाणे, नायब तहसीलदार विनायक महाजन, अव्वल कारकून आशिष देशिंगे, श्रीमती हेमा साबळे, मंडळ अधिकारी तानाजी पवार, फैयाज मुल्ला, महसूल सहाय्यक दिपक माने, श्याम ठाकूर, तलाठी श्रीमती शुभांगी थोरात, गणेश क्षीरसागर, वाहन चालक उत्तम जगताप, शिपाई दत्ता शिंगे, अंकुश खोत, माणिक माळी,  कोतवाल विकास काळबागे,  भीमराव हत्तीकर, गुरुदास माळी, अल्फास मुजावर, पोलीस पाटील श्रीमती अनिता पाटील आणि पहारेकरी या संवर्गात राजकुमार लोटके यांचा समावेश आहे.

            प्रारंभी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली