माझं काही खरं नाही ??? जयंत पाटील यांची गुगली...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातुन जाणाऱ्या नियोजीत शक्तीपिठ महामार्गाच्या विरोधात मुंबईत शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनात बोलताना 'माझं काही खरं नाही ' असं मिस्किल विधान प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी करताच पुन्हा भाजपमधले खुषमस्करे कुजबुज मोहिमेत सक्रिय झाले आहेत .
विक्रमी बहूमत मिळूनही भाजपला राज्यातील सत्ता अळणी मिठासारखी लागते आहे . जयंतराव पाटील यांनी वरील विधान करुन पुन्हा त्यांच्या तोंडाला पाणी सोडलंय .
शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार,जातीयवाद,शेतीमालाचा भाव अशा असंख्य मुलभूत प्रश्नांवरती महाराष्ट्र राज्य ढवळून काढल्यानंतरही मतदार भाजपच्या जातीयवादाला मतदान करत असल्याने जयंतराव पाटील नाराज आहेत ..या प्रश्नावरून त्यांनी अनेकवेळेला उघड नाराजीही व्यक्त केलेली आहे .
सिंधुदुर्ग मधील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा अल्पावधीत कोसळल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या सोबत जयंतराव पाटील घटनास्थळी गेले होते . तिथं आमदार नितेश राणे यांनी दादागिरी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे विरोधक आक्रमक झाले नाहीत त्यामुळेही जयंतराव पाटील नाराज होणं स्वाभाविक आहे . हातकणंगले लोकसभा मतदारसंघातुन राजु शेट्टी यांनी खासदारकीसाठी प्रतिसाद दिला नाही . परिणामी वाळवा विधानसभा मतदारसंघात जयंतराव पाटील यांना काठावरचं बहुमत मिळालं ही बाब कुणालाही नाराजीत नेणारीच आहे पण जयंतराव पाटील हा एका धोतरानं म्हातारा होणारा नेता नाही . भाजपला जयंतराव पाटील यांची विकेट पाडून शरद पवार यांना गारद करायचं आहे आणि जयंतराव पाटील नाईट वॉचमन म्हणुन मैदानात उतरुन एकाकी खिंड लढवताहेत त्यामुळे भाजपची झोप उडाल्या .
अजित पवारांनी शरद पवार यांच्या पाठीत वार केल्यानंतर भाजपने आपल्या मांडीखाली दाबुन त्यांचा कानुला केला हे जयंतराव पाटील यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेलं नाही .
आपलाही भाजप भातुकलीचा खेळ करणार हे जयंतराव पाटील यांनी पक्कं ओळखलंय . जयंतराव पाटील यांना भाजपमध्ये घेऊन जयंतराव पाटील यांनी शरद पवार यांच्या साठी ढाळलेले ते अश्रू मगरीचे होते हे भाजपला दाखवून द्यायचं आहे आणि जयंत पाटील त्यांची डाळ शिजू देत नाहीत अशी सध्याची स्थिती आहे . शरद पवार यांना भाजपमध्ये घेऊन महाराष्ट्रातील राजकीय विरोधक नेस्तनाबूत करायचा म्हणून भाजपने अजित पवार यांना पहिल्या दिवसापासून वापरून घेतलंय पण त्याला अपेक्षित यश येत नाही त्यामुळे भाजपचा जळफळाट वाढलाय .
जयंतराव पाटील यांनी डायट सुरू केलंय . त्यांचा सध्या सुका मेव्यावरती जोर आहे . जयंतराव पाटील हे शरद पवार गटाचा चेहरा आहेत . जयंत पाटील यांच्या सर्व सहकारी संस्था सध्या सुस्थितीत आहेत त्यामुळे त्यांना भाजपमध्ये लगेच गेलंच पाहीजे अशी निकडही नाही . जयंत पाटील भाजपमध्ये गेले तर अजित पवार , भुजबळ असे त्यांना अनेक शत्रू आहेत जयंत पाटील यांनी सर्व मंत्रीपदं भोगलेली आहेत आता सि एम पद हे एकच पद त्यांच्यासाठी बाकी आहे . आमदार गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा विधासभेत प्रश्न उपस्थित करायला लावुन जयंत पाटील यांना वठणीवर आणण्याचा देवेंद्र फडणवीस अटोकाट प्रयत्न करत असले तरी चुकीच्या वेळी त्यांनी भरलेला हा दारुगोळा त्यांच्याच हातात फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही .
जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर त्यांच्या निकिटवर्तीय कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता ' साहेबांनी एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा 'अशी भावना व्यक्त करण्यात आली .
तथापि भाजपच्या या अघो-या स्वप्नाला जयंत पाटील असं सहजासहजी मोक्ष मिळवून देणार नाहीत . खेळवुन -खेळवुन मारणं हा खेळ म्हणजे जयंतराव पाटील यांच्या डाव्या हाताचा मळ आहे आणि सध्या या खेळाचा ते आनंद लुटत आहेत इतकंच !!!
---- बाळासाहेब ल.पाटील
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.