LOKSANDESH NEWS
नेरूरमधील रोंबाट (मांड) उत्सव अलोट गर्दीत संपन्न, शिमगोत्सवातील अनोखी परंपरा
- होळी सणानिमित्त कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात सायचे टेंब येथे मांड उत्सव प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रोंबाट व पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य-दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती, देखावे साकारण्यात आले.
हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यांतून नागरिकांनी गर्दी केली होती. या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी-परंपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत हे विशेष आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे.
विशेष म्हणजे गावची ग्रामदेवताच श्री देव कलेश्वर असून या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण होय. होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात. या गावातील होळी सणानिमित्त असणारे रोंबाट हे खास आकर्षण असते. रसिक नागरिक या रोंबाटाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी आना मेस्त्री, विलास मेस्त्री, कृष्णा मेस्त्री ग्रुपने पौराणिक भव्य-दिव्य देखावे सादर केले होते. तारकासुरवध, पंचमुखी शंकर, वीरभद्र, नंदी, गणेश अवतार हे भव्य दिव्य देखावे सायचे टेंब नेरुरच्या मांड उत्सवाचे आकर्षण ठरले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली