LOKSANDESH NEWS
कर्नाटकच्या तरुणांनी बिबट्याला पकडले जिवंत, लोणी - मणअंकलगी शिवारात घडला थरार
दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सीमावरती भागात महिन्याभरापासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेर बंद करण्यात यश आलं आहे. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी - मणअंकलगी शिवारात जीवाची परवा न करता तरुणांनी धाडसाने बिबट्याला जिवंत पकडल्याची चित्तथरारक घटना घडलीय. या बिबट्याला पकडण्यात सिंहाचा वाटा असलेल्या हलसंगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पकडलेल्या बिबट्याला विजयपूर वन विभागाने ताब्यात घेतले आहे
विजापूर जिल्ह्यातील लोणी (बीके) येथील शेतात असलेले कल्लाप्पा कोट्याळ यांच्यावर हल्ला करून बिबट्या पळून गेला. ही माहिती समजताच लोणी - मणअंकलगी येथील तरुणांनी बिबट्याचा शोध सुरू केला. मणअंकलगी येथील योग्यप्पा निलप्पा उटगी यांच्या द्राक्ष बागेत हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ड्रोन दिसला. या बिबट्याला पकडण्यासाठी लोणी - मणअंकलगी येथील ग्रामस्थांनी विजयपूरच्या वन विभागाला कळवले. तसेच हलसंगी येथील वैदू समाजाच्या धाडसी तरुणांना बोलावले. संतोष बजरंगी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बाबू बजरंगी, गुंडू हलसंगी, इराप्पा बजरंगी, मलकप्पा बजरंगी, पिंटू कळळी यांच्यासह वीस ते पंचवीस तरुण आले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्ष बागेच्या एका बाजूस जाळे लावले.
यावेळी लोणी (बिके), मणअंकलगी, हलसंगी आणि गोट्याळ येथील २०० तरुण ग्रामस्थांनी या द्राक्ष बागेला वेडा घातला. हालसंगीच्या तरुणाने जिथे जाळी लावली होती. त्याच बाजूला बिबट्या पळत आला आणि जाळ्यात अडकला. तेव्हा धाडस दाखवत तरुणांनी जाळीत अडकलेल्या बिबट्याला काठी आणि हाताने दाबून जागचा हलू दिला नाही. दोरीने त्याचे पाय बांधले. बिबट्याला पकडण्याच्या या झपापटीत पाच ते सहा जण जखमी झाले. त्यामध्ये अर्जुन केसुगोळ, राजू म्हेत्रे आणि शिवराज पाटील हे लोणी येथील तिघे तसेच मणअंकलगी आणि गोट्याळ येथील दोघे जखमी झाले आहेत. दरम्यान विजयपूरहून वनविभागाच्या पथक घटनास्थळी आले. पकडलेल्या या बिबट्याला तरुणांनी उचलून वन विभागाच्या पिंजऱ्यात घातले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी या बिबट्याला विजयपूरला घेऊन गेले.
हलसंगी येथील वैदु (गोल्लार) समाजाच्या धाडसी तरुणांचे अनेकांनी कौतुक केले. या तरुणांमुळे लोणी (बिके), मणअंकलगी आणि गोट्याळ गावचे अनेकजण बिबट्याला पकडण्यास धाडसाने पुढे आले. युवकांनी असामान्य शौर्य दाखवून बिबट्याला जेरबंद केले. सध्या कर्नाटकातील समाज माध्यमावर बिबट्या पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमावरती भागातील इंडी चडचण आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात याचीच चर्चा रंगली आहे.